हळदी कुंकू समारंभ - स्त्री प्रबोधनाचे व्यासपीठ व्हावे !

यावर्षी मकरसंक्रांत ते रथसप्तमी असा सुमारे १ महिन्याचा कालावधी आल्याने सार्वजनिक हळदी कुंकू साजरा करणाऱ्यांसाठी बराच अवधी मिळाला आहे. यावर्षी लोकसभा निवडणूकाही असल्याने महिला मतदारांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी समस्त पक्ष कामाला लागले आहेत. त्यासाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करून मोठमोठे इव्हेन्ट भरवले जात आहेत. पक्षाचे नियोजित उमेदवार या इव्हेंटचा सारा खर्च उचलत आहेत. भावी उमेदवाराच्या छायाचित्रासह पक्षाचे चिन्ह असलेले लेबल लावून वाण म्हणून महिलांना भेटवस्तू दिल्या जात आहेत. सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था यांच्या वतीनेही दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आयोजकांकडून स्त्रियांच्या मनोरंजनासाठी गाण्यांच्या भेंड्या, संगीत खुर्ची, नाव घेण्याच्या स्पर्धा, होम मिनिस्टर यांसारखे खेळ ठेवले जात आहेत. रोजच्या दगदगीतून विरंगुळा म्हणून यासर्व गोष्टी ठीक वाटत असल्या तरी यातून मनोरंजनाखेरीज अन्य काहीच साध्य होत नाही हेही खरे.

         सध्याची सामाजिक स्थिती पाहता स्त्रियांवरील अत्याचाराचा आलेख दिवसागणिक चढतो आहे. ६ महिन्याच्या कोवळ्या बालिकेपासून ८० वर्षाच्या वयोवृद्धाही वासनांधांच्या क्रूरकर्मांना बळी पडत आहेत. मुलींच्या हाती आलेले स्मार्ट फोन्स आणि त्यामध्ये मिळणारा अमय्राादित इंटरनेट पॅक यांचा सदुपयोगापेक्षा दुरुपयोग अधिक होऊ लागला आहे. हल्लीचे चित्रपट आणि वेब सिरीज यांमध्ये खुलेआम दाखवली जाणारी अतिरंजित प्रणयदृश्ये, अनैतिक संबंधांना खतपाणी घालणारे कथानक, यांतील अभिनेत्रीचा तोकड्या कपड्यांतील मुक्त वावर, स्टाईल स्टेटमेंट म्हणून अभिनेत्रींकडून सहजपणे केले जाणारे मद्यपान आणि धूम्रपान, रात्री अपरात्री बार आणि पबमध्ये थिरकणे, एका बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करून दुसरा बॉयफ्रेंड पकडणे, विवाहाआधी शारीरिक संबंध ठेवणे, पदोपदी शिव्यांचा स्वैर वापर या सर्वांचा परिणाम हल्लीच्या पिढीतील मुलींवर पडू लागला आहे. या सर्व गोष्टीप्रतीचे आकर्षण मुलींमध्ये वाढू लागले आहे. चित्रपटांतील अशा दृश्यांवर आणि प्रसंगांवर सेन्सॉर बोर्ड कात्री न लावता ‘अ'प्रमाणपत्र (प्रौढांसाठी) देऊन आपली जबाबदारी झटकते आहे.

वेब सीरिज तर सेन्सॉर बोर्डाच्या अखत्यारीतच येत नाही. त्यामुळे आपल्या घरच्या मुलींना या सर्वांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यावर पुरेसा धाक ठेवणे आज पालकांचे कर्तव्य बनले आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे सध्याच्या मुली भारतीय संस्कृतीपासून दुरावू लागल्या आहेत. कपाळावर कुंकू किंवा टिकली लावणे, मनगटांत बांगड्या घालणे ओल्ड फॅशन वाटू लागले आहे. हल्ली तर गळ्यातले मंगळसूत्र हातात बांधण्याची फॅशन हळूहळू जोर धरू लागली आहे. आजमितीला वासनांधांच्या वखवखलेल्या नजरा चोहोबाजूंनी फिरत आहेत, हिंदूंचा वंशविच्छेद करू पाहणारे लव्ह जिहाद सारखे संकट प्रत्येक क्षेत्रात सावज शोधत आहे. अशावेळी स्त्री शक्तीचा केवळ मनोरंजनामध्ये अपव्यय करण्याऐवजी स्त्रियांना सर्वार्थाने सक्षम होण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या कार्यक्रमाचे हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने आयोजन करणे काळाची गरज बनली आहे.
 हळदी कुंकू हा जसा स्त्रियांच्या संघटनशक्तीचा कार्यक्रम आहे तसा स्त्रीमधील शक्तीच्या पूजनाचा धार्मिक कार्यक्रमही आहे. स्त्रीच्या भ्रूमध्यावर हळद कुंकू लावणे म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीचे पूजन करणे. त्यामुळे या धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिंदू धर्माची आणि प्राचीन अशा भारतीय संस्कृतीची महती सांगणारी व्याख्याने, धार्मिक कृतींचे महत्व सांगणारी प्रवचने आणि संकटकाळात स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ बनण्यास शिकविणारी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके यांसारख्या उपयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करायला हवे, पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी गेल्यामुळे स्त्रियांचे होणारे नुकसान, भोगवादाचे दुष्परिणाम, भारतीय इतिहासात अजरामर झालेल्या पराक्रमी स्त्रियांची चरित्रे यांविषयी माहिती देणारी व्याख्याने यानिमित्ताने आयोजित केली जावीत. छत्रपती शिवाजी राजे पुन्हा जन्माला यावेत असे प्रत्येकाला वाटते, मात्र शिवाजी महाराज जन्माला येण्याआधी समर्थ अशा जिजाऊ जन्माला येणे आवश्यक आहेत. यासाठी प्रत्येक स्त्रीने जिजाऊंचा आदर्श घेणे आणि त्यांचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपावणेही तितकेच गरजेचे आहे. स्त्री ही साऱ्या कुटुंबाची जननी असते त्यामुळे त्या स्त्रीमध्ये जसे संस्कार असतील, तसेच ते पुढे निपजतील. यासाठी स्त्रीने आपले दायित्व समजून घेऊन आपल्या पाल्यांवर तसे संस्कार करणे गरजेचे आहेत. हळदी कुंकू समारंभ अशा विचारांची देवाणघेवाण करणारे एक चांगले व्यासपीठ आहे त्याचा केवळ मनोरंजनासाठी अपव्यय होऊ नये.  - सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला