वृद्धाश्रम

वृद्धाश्रम

नेहाचा फोन आला. राज कसा झाला कार्यक्रम? लवकर परत या, मी आणि मुले तुझी आणि आई-बाबांची वाट पाहत आहोत आणि हो, येताना शिरवळला आईंची आवडती भजी आणि बाबांचा आवडता बटाटेवडा खायला विसरू नका. नेहाचे फोनवरील बोलणे ऐकल्याने झालेला गोंधळ मिटला होता. नेमका काय गोंधळ झाला होता। कुणाला वृध्दाश्रमात ठेवण्याची योजना होती?

मागच्याच आठवड्यात आबासाहेब आणि आईंच्या लग्नाचा ५१ वा वाढदिवस राज आणि नेहाने मोठ्या उत्साहात साजरा केला. दुसऱ्याच दिवशी नेहा आणि तिची दोन्ही मुले नेहाच्या माहेरी गेली. राजने आई-वडिलांना मॉलमध्ये नेले, त्यांच्यासाठी कपडे, चपला, चष्मा एवढेच काय अगदी टुथ ब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले. छानशा हॉटेलमध्ये जेवण, त्यानंतर मराठी सिनेमा, संध्याकाळी बागेतील फेरफटका, भेळ, आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले. एकंदरीत दिवस खूपच छान गेला. दोन दिवस आपल्याला महाबळेश्वरला जायचेय आणि त्यानंतर साताऱ्याला, राजने त्याचा प्लॅन आई-बाबांना सांगितला. पुढील दोन दिवस राज, आई आणि बाबा पाचगणी आणि महाबळेश्वरला मनसोक्त भटकले. रात्री न राहवून आईने विचारले राज आता उद्या साताऱ्याला कशासाठी जायचे? आईच्या या प्रश्नाला उत्तर देणे राजने शिताफीने टाळले. उद्या लवकर निघायचे आहे असे म्हणून राज त्याच्या रूममध्ये गेला.

तितक्यात फोन वाजला. राज त्याचा फोन आई-बाबांच्या रूममध्ये विसरला होता. फोन नेहाचा होता. राज, ठरल्याप्रमाणे शॉपिंग झाले, महाबळेश्वर दर्शनही झाले आता पुढचा प्लॅन म्हणजे आई-बाबांना उद्या सकाळी साताऱ्याच्या वृद्धाश्रमात नेणे. सकाळी १० वाजता पोहोचायचे आहे; पण त्यांना शेवटपर्यंत कसलीही कल्पना येऊ देऊ नकोस. नेहाने फोन ठेवला.

नेहा जे बोलली ते खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित होते. अचानक असा निर्णय का? कशासाठी? आपलं काही चूकलं का? निर्णय पोटच्या गोळ्याचा की सुनेचा? असंख्य, अनुत्तरित प्रश्न. "आलिया भोगासी असावे सादर” म्हणत आबा आणि आईंनी मनाशी गाठ बांधली की राज आणि नेहाचा प्लॅन अर्थात्‌ कट आपल्याला समजला आहे हे अजिबात दाखवायचे नाही. जे होतेय त्यात समाधान मानायचे.

साताऱ्याला जाताना, राज छान मूडमध्ये होता आणि बरंच काही बोलत होता, आई बाबा मात्र गप्प गप्पच. वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी राज, आबासाहेब आणि आईंचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. संपूर्ण वृद्धाश्रमाला एक राऊंड मारून ते सर्व मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये विसावलेत. वार्षिक फी १ लाख प्रत्येकी, समोरच्या बोर्डवर लिहिले होते. चहा पिता पिता मॅनेजर साहेब म्हणालेत, सर्व तयारी झाली आहे चला आपण जाऊया. आई बाबांनी मन घट्ट केले. एका छानशा हॉलमध्ये २५-३० लोक जमले होते. राज पुढे आला आणि म्हणाला, हा वृद्धाश्रम माझ्या आई बाबांना खूप आवडला. हो ना? राजने आई-बाबांकडे पाहिले, त्यांनी यांत्रिकपणे मान डोलावली, डोळ्यातले अश्रू लपवत. राजने दोघांना पुढे बोलावले आणि त्यांच्या हातून मॅनेजर साहेबांना दोन लाख रुपयांचा चेक दिला. मॅनेजर साहेब, निघतो. राज म्हणाला.

राज, सावकाश जा, आई बाबा म्हणाले.
हे काय? मला एकट्यालाच पाठवतात? राजने विचारले.
आम्हीही यायचे? खात्री करून घेण्यासाठी आई-बाबांनी विचारले.
अर्थातच, राज उत्तरला.
आणि ते २ लाख रुपये,वृद्धाश्रमाच्या फी चे?

 छे, छे, ते तर तुमच्या लग्नाच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या हस्ते वृद्धाश्रमाला दिलेल्या देणगीचे. चला, आपल्याला परत पुण्याला जायचेय.

आई बाबांसाठी हा सुखद धक्का होता. परतीचा प्रवास सुरू झाला आणि तितक्यात नेहाचा फोन आला. राज कसा झाला कार्यक्रम? लवकर परत या, मी आणि मुले तुझी आणि आई-बाबांची वाट पाहत आहोत आणि हो, येताना शिरवळला आईंची आवडती भजी आणि बाबांचा आवडता बटाटेवडा खायला विसरू नका. नेहाचे फोनवरील बोलणे ऐकल्याने झालेला गोंधळ मिटला होता. परतीचा प्रवास खूपच सुखकर होता. नातवांपासून ताटातूट होणार नव्हती, घर सुटणार नव्हते, सुनेचा नी मुलाचा सहवास लाभणार होता. हरवेल असे वाटणारे सुख अबाधित होते. - दिलीप कजगांवकर, पुणे. 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 खलनायक.. एक प्रवृत्ती