भगवंतापासून विभक्त नाही, तोच खरा भक्त

समर्थ म्हणतात, हे मना! राघवाची भक्ती कर. भक्ती म्हणजे भगवंताशी एकरूप होणे. जो भगवंतापासून विभक्त नाही, वेगळा नाही तोच खरा भक्त. जो स्वतःचा अहंकार सोडून भगवंताला शरण जातो तोच खरा भक्त. अशी भक्ती समर्थांना अपेक्षित आहे. स्वतःचा कर्तृत्वभाव मनुष्याने भगवंताला अर्पण करावा. भगवत कृपेने हा दुर्लभ नरदेह मिळालेला आहे. सर्व कमेंद्रिये, सर्व ज्ञानेंद्रिये कार्यक्षम असणे ही भगवंताची मोठी कृपाच आहे. त्या इंद्रियांचा सुयोग्य वापर करून आपली विहित कर्मे करणे म्हणजे धर्मपालन-धर्माचरण.
 श्रीराम
देहे रक्षणाकारणे यत्न केला।
परी शेवटी काळ घेवोनी गेला।
करी रे मना भक्ती या राघवाची।
पुढे अंतरी सोडी चिंता भवाची श्रीराम २६
मनुष्याची जीवनभर धडपड असते ती देहाच्या रक्षणासाठी. अगदी तान्हे बाळसुद्धा भूक लागली की रडते. शी-शू ने ओले झाले की, शरीराला अस्वस्थ वाटले की रडते. कळायला लागल्यापासून तर मनुष्य सतत आपल्या देहाची काळजी घेत असतो. त्याला जास्तीत जास्त आराम, सुख कसे मिळेल यासाठी प्रयत्न करतो. पण या नादात देहाचे फाजील लाड होऊन देह सुखलोलूप होतो. देहाला योग्य प्रमाणात कष्ट दिले नाहीत, ऊन-वारा-पाऊस सोसायला लावला नाही तर देह निर्बल होतो. कोणत्याही परिस्थितीला कणखरपणे सामोरे जाण्यास अक्षम ठरतो. खाऊन पिऊन सुखी असणारे शरीर आरोग्यपूर्ण असतेच असे नाही. कोणत्याही वातावरणात टिकाव धरणारे शरीरच खऱ्या अर्थाने सशक्त, बलवान म्हटले पाहिजे.

त्यासाठी शरीराची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. पण काळजी घेण्यापेक्षा काळजी करण्याकडेच आपला कल जास्त असतो. हे शरीर जास्तीत जास्त कसे टिकवता येईल यासाठीच चिंता करत, प्रयत्न करत मनुष्य जगत राहतो. पण देहाचे रक्षण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी एक दिवस मृत्यू त्या देहाचा नाश करणारच आहे हे मात्र आपण विसरतो. देह नाशवंत आहे. आपल्या आधी लोकांचे मृत्यू झालेले आपण पाहतो. एक दिवस आपल्यालाही त्याच मार्गाने जायचे आहे हे आपल्याला समजते. पण या सत्त्याचा स्वीकार करणे आपल्याला जमत नाही. म्हणून त्या अटळ सत्याकडे डोळेझाक करून आपण जगामध्ये असे गुंतून जातो की आपण इथे कायमस्वरूपी राहणार आहोत. त्याच दृष्टीने आपण धनाचा, वस्तूंचा, व्यक्तींचा संग्रह करत राहतो. पण यातील कोणतीही वस्तू, व्यक्ती, कितीही धन आपल्याला मृत्यूपासून वाचवू शकत नाही.

मृत्यूवर मात करण्याचा एकच उपाय म्हणजे त्याच्या भयापासून मुक्त होणे आणि मृत्यूचे भय नाहीसे करण्याचा एकच उपाय म्हणजे भगवंताची भक्ती. म्हणून समर्थ म्हणतात, हे मना! राघवाची भक्ती कर. भक्ती म्हणजे भगवंताशी एकरूप होणे. जो भगवंतापासून विभक्त नाही, वेगळा नाही तोच खरा भक्त. जो स्वतःचा अहंकार सोडून भगवंताला शरण जातो तोच खरा भक्त. अशी भक्ती समर्थांना अपेक्षित आहे. स्वतःचा कर्तृत्वभाव मनुष्याने भगवंताला अर्पण करावा. भगवत कृपेने हा दुर्लभ नरदेह मिळालेला आहे. सर्व कमेंद्रिये, सर्व ज्ञानेंद्रिये कार्यक्षम असणे ही भगवंताची मोठी कृपाच आहे. त्या इंद्रियांचा सुयोग्य वापर करून आपली विहित कर्मे करणे म्हणजे धर्मपालन-धर्माचरण. देह हे पुरुषार्थाचे साधन आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ इत्यादी आश्रमातील अपेक्षित कर्तव्यकर्मे योग्य प्रकारे करता यावीत यासाठी देहाचे योग्य प्रकारे पालन-पोषण- रक्षण करणे हे योग्यच आहे. मनुष्याचे मुख्य ध्येय किंवा साध्य आहे ते ‘आत्मकल्याण'. त्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी देह हे साधन आहे. मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी साधनाची जेवढी काळजी घेणे आवश्यक आहे तेवढीच काळजी या देहाची घ्यावी. बाकी सर्व भार देवावर टाकून निश्चित रहावे. हे खऱ्या भक्तीचे लक्षण आहे.

आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे, भगवंताला शरण जावे आणि निर्भय होऊन, निःशंक होऊन समाधानाने जीवन व्यतीत करावे.या देहाची, प्रपंचाची फार काळजी करू नये. कारण कितीही काळजी केली आणि कितीही काळजी घेतली तरी जे घडणार आहे ते घडतेच. जे प्रारब्ध घेऊन आपण जन्माला आलो आहोत ते भोगावेच लागते. फरक एवढाच असतो की भगवत्‌भक्तीचा भक्कम आधार असेल तर धक्का कमी बसतो. बसलेला धक्का सोसायला बळ मिळते. लवकर सावरता येते. तोल ढळत नाही. मन लवकर स्थिर होते. हिंमतीने पुढचे मार्गक्रमण करता येते. अन्यथा मनुष्य खचून जातो. निराश होतो. जसा दुःखाने मनुष्य खचतो तसाच सुखाने तो उन्मत्त होतो. प्रारब्धाने वारेमाप ऐश्वर्य मिळाले तरी मनुष्याच्या तोल ढळतो. पण भक्तीची जोड असेल, भगवंताप्रती शरणागत भाव असेल, तर वैभवामुळे माणसाचे अधःपतन होत नाही. त्या वैभवाकडे तो भगवंताची कृपा म्हणून बघतो. भगवंताने लोकांच्या कल्याणासाठी त्याच्याकडे दिलेली ती ठेव आहे अशा अनासक्त भावाने तो संपत्तीचा विनीयोग करतो. ”माझे धन, माझे धन” अशा स्वार्थी वृत्तीने तो त्या धनाच्या रक्षणाचा अनाठायी प्रयत्न, अनावश्यक चिंता करत नाही. मनुष्य सुख टिकवण्याची किंवा दुःख निवारण करण्याची चिंता करण्यातच लाख मोलाचे आयुष्य, हा दुर्लभ मनुष्य जन्म वाया घालवतो. अशा व्यक्तीला समर्थांनी आत्महत्यारा म्हटले आहे. आत्महत्या हे पाप आहे. म्हणूनच समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात की राघवाची भक्ती करा. व्यर्थ चिंता करू नका. भगवंत सर्वशक्तिमान आहे, दयाळू -कृपाळू आहे. त्याच्या कृपेने सर्व चिंता शमतील. जगण्याचे सामर्थ्य मिळेल. परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल असो भक्तिमुळे जगण्यातील आनंद कायम राहील. शाश्वत समाधानाचा लाभ होईल.
जय जय रघुवीर समर्थ
आसावरी भोईर. 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वृद्धाश्रम