मुले, फुले, पाढे आणि क्रिटिकल थिंकिंग

सृष्टीला सहजपणे सुंदर सजवणारी फुले, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मनावरही तेवढ्याच सहजपणे भुरळ घालतात. मग मुलांनाही वाटतं, ही सुंदर फुलं आपणही आपल्या जवळच्या, आपल्यावर प्रेम करणाऱ्या कुणाला तरी द्यावीत आणि आपल्या माणसाच्या आयुष्यातील काही क्षण सुंदर सजवावेत.

फुले आणि मुले यांच्यामध्ये कितीतरी गोष्टी समान आहेत. फुलांप्रमाणे मुलेदेखील हसरी असतात, जेव्हा ती वेलीवर खेळत असतात. फुलांना जसे विविध रंग असतात तसे मुलांमध्ये  विविध  भाव असतात.  मुलांमधील  सगळे भाव सृष्टीच्या पंचतत्वाप्रमाणे पवित्र असतात. जीवनाच्या अंगणात, आनंदाचा सडा शिंपण्याचे काम मुलांमधील हे भाव करत असतात अगदी निरहेतुक भावनेने. जसे फुले सुगंधाची उधळण करतात तसे. सृष्टीची दैवते असलेल्या फुलांचे आणि मुलांचे वेगळे नाते नुकतेच एका  शाळेत अनुभवायला मिळाले.

दोन वर्ग खोलण्याची इमारत असलेली पहिली ते चौथीपर्यंतची शाळा. मुख्य रस्त्यापासून थोडी उंचावर, जणू काही आकाशाशी नाते शोधणारी ही शाळा. रस्त्याला लागून रस्त्याच्या समपातळीवर शाळेचे मैदान. मग दुसऱ्या टप्प्यावर चार-पाच पायऱ्यांच्या उंचीवर शाळेचे अंगण, तेही शेणाने सारवलेलं. अजून तीन-चार पायऱ्यांच्या वर शाळेची ओसरी (वरांडा.) मैदानात दिवसभर सावली नांदत असते. रस्त्याला लागून उभी असलेली झाडे प्रखर सूर्यप्रकाशाला मैदानावर येऊ देत नाहीत. भर दुपारी अंगण मात्र तापत असतं. शाळेची ओसरी मात्र खूपच सुखी आहे. कारण सदाफुली, शेवंती अशी फुलझाडे तिला लागूनच उभी आहेत. अंगणातून पायऱ्या चढून ओसरीत जाताना या झाडांवरची फुले आपले हसत हसत, रंगांची उधळण करून स्वागत करतात. शाळेची पायरी चढताना प्रत्येक मूल एक क्षण या फुलांकडे पाहतं आणि मग शाळेत पाऊल टाकतं.

त्यादिवशी ही फुलं चांगलीच फुलली होती. थोडा वाराही सुटला होता. वाऱ्याची झुळूक आली की फुलं इकडे तिकडे झुलायची. अशी झुलणारी फुले मुलांना आकर्षित करू लागली. एक एक मूल शाळेत यायला लागलं. येताना फुलांकडे बघायला लागलं. डुलणाऱ्या, झुलणाऱ्या फुलांकडे बघून मुलांच्या मनात आनंद नाचू लागला. मुलांना वाटलं, ही सुंदर फुलं आपल्या बाईंना भेट म्हणून द्यावीत. आपण दिलेली फुले बाईंना आवडतील. त्यांनाही छान वाटेल असा सुंदर विचार मुलांनी मनात केला. बाईंना भेट द्यायची तर ती सुंदर रंगांची, सुंदर सुगंधाची असाच तो सुंदर विचार होता. फुलांचा रंग आणि गंध मनात जपत मुले बाईकडे गेली आणि म्हणाली, ‘बाई, आम्ही तुम्हाला फुले आणून देऊ का?' बाईंच्या मनात सारवलेले अंगण आणि त्या सुंदर अंगणाची शोभा वाढवणारी छोटी छोटी फुलझाडे आली. बाई म्हणाल्या, ‘फुलं झाडावरच असूद्या  तिथेच ती सुंदर दिसतात.' मुलांना थोडसं वाईट वाटलं. त्यांची नाराजी त्यांच्या डोळ्यात दिसू लागली. आपल्या बाईंना सुंदर फुलांची भेट आपण देऊ शकलो नाही याचे त्यांना वाईट वाटले. पण क्षणभरातच मुले ते सारं विसरून गेली आणि सर्व मुलांनी बाईंची आज्ञा पाळली. शाळेचा परिपाठ सुरू झाला. एका सुरात सर्वांनी राष्ट्रगीत गायले. मंगल वातावरणात प्रार्थना गायली. शाळेचे कामकाज सुरू झाले. बाहेर फुले हसत होती आणि वर्गात मुले.

थोड्या वेळाने पोषण आहार शिजवणाऱ्या ताई वर्गामध्ये आल्या. त्या आनंदी होत्या. त्यांच्या  चेहऱ्यावर हास्य होते. त्यांच्या हातात फुले होती. वर्गात येताच त्या  बाईंना म्हणाल्या, ‘बाई, मी तुमच्यासाठी फुलं आणलीत, घ्या ही फुलं, खूप सुंदर आहेत.' बाईंची नजर फुलांकडे गेली. सगळा वर्ग शांत झाला. सर्व मुलं एकाच नजरेने फुलांकडे आणि बाईंकडे बघू लागली. बाईंच्या आणि मुलांच्या मनात थोड्या वेळापूर्वीच्या वाक्याचा ‘फुलं झाडावरच सुंदर दिसतात' प्रतिध्वनी घुमू लागला. पोषण आहार शिजवणाऱ्या ताई पुन्हा म्हणाल्या, बाई, घ्याना फुलं. मुलं शांत होती. बाईसुद्धा शांतपणे उभ्या होत्या. सर्वांच्या मनावर कसलं तरी अनामिक दडपण जाणवत होते. मगाशी बाईंनी आपल्याला ‘फुले तोडू नका' असे सांगितले. आता तोडलेल्या फुलांचे बाई काय करणार? कदाचित हा विचार मुलांच्या मनात असावा. एवढ्यात अत्यंत शांतपणे बाई म्हणाल्या, ‘ताई, मी मगाशीच मुलांना फुलं तोडू नका असं सांगितलं आहे, त्याचं मुलांना खूप वाईट वाटलं आणि तीच फुलं तुम्ही तोडलीत, आता मी मुलांना काय सांगू? ती माझ्या डोळ्यात बघत आहेत,  पुन्हा नका तोडू अशी फुलं ती झाडावरच राहू दे.' ताई वर्गातून बाहेर गेल्या, पण त्याच क्षणाला बाईंनी मुलांच्या डोळ्यात समाधानाचे झाड पाहिले. अचानक वर्गातील शांतता अंतर्धान पावली आणि मुलांचे सूर वर्गात घुमू लागले. पुन्हा एकदा बाहेर फुलांचा सुगंध दरवळला आणि वर्गात मुलांचा आनंद पसरला.

थोड्या वेळाने पहिलीच्या वर्गातील मुलांसोबत गप्पा मारायची संधी मला मिळाली. मुलांची वाचनाची तयारी चांगली होती. योग्य गतीने, समजपूर्वक वाचन मुले करत होती. शब्दांचे अर्थ सांगत होती. मला मुलांचे खूप कौतुक वाटले. आपल्या बाईंना फुलांची सुंदर भेट देऊ इच्छिणाऱ्या मुलांना आपणही काहीतरी भेट  द्यायला पाहिजे हा विचार माझ्या मनात आला. म्हणून मी माझी बॅग उघडली. त्या दिवशी बॅगेमध्ये सात गोळ्या होत्या आणि पहिलीच्या वर्गात सहा मुलं होती. त्यामुळे माझ्या पुढील वाटणी कशी करायची हा प्रश्न मिटला. कारण सर्व मुलांनी सुंदर वाचन केले होते त्यामुळे प्रत्येकाला एक एक गोळी मी देऊ शकणार होतो. सर्वांना गोळी मिळायलाच हवी होती. म्हणून मी सर्व मुलांना माझ्याजवळ बोलावले. त्यांच्या वाचनाचे कौतुक केले. ते कौतुक करत असतानाच एकविसाव्या शतकातील ‘क्रिटिकल थिंकिंग', हे कौशल्य मुलांमध्ये कितपत रुजले आहे हे पाहण्यासाठी मी मुलांना प्रश्न विचारला, ‘बाळांनो तुम्ही सर्वांनी छान वाचन केलं आहे माझ्याकडे आता सात गोळ्या आहेत तर मी प्रत्येकाला किती गोळ्या देऊ?' सर्व मुले एका सुरात म्हणाली,  ‘एक एक द्या.' मी त्यांना म्हटलं, ‘तुम्ही खूपच छान वाचन केले  आहे, त्यामुळे माझी इच्छा आहे तुम्हाला प्रत्येकाला दोन दोन गोळ्या द्याव्यात.' मुलं शांत झाली. काहीच बोलली नाहीत. मी त्यांना विचारलं, ‘तुम्हाला प्रत्येकाला दोन दोन गोळ्या देता येतील का?' तेव्हा मुलं म्हणाली, ‘नाही.' पण मी पुन्हा विचारलं, ‘जर मला तुम्हाला प्रत्येकाला दोन गोळ्या द्यायच्या असतील तर माझ्याकडे किती गोळ्या असायला हव्यात?' सर्व मुले एकमेकंाकडे बघू लागली. विचार करू लागली. काही हसू लागली. पण ती काहीच बोलत नव्हती. मी त्यांना सांगत  होतो, ‘पटकन सांगा, माझ्याकडे किती गोळ्या हव्यात म्हणजे तुम्हाला दोन दोन देता येतील? तेवढ्यात अन्वी म्हणाली, ‘बारा गोळ्या पाहिजेत.' पहिलीतल्या मुलीचा तार्ककि विचार ऐकून मला खूप बरे वाटले. मग मी अन्वीला  जवळ घेऊन विचारले, ‘बारा हे उत्तर तू कसे काढलेस?' अन्वी काहीच बोलली नाही. तिला पुन्हा विचारले. अन्वी अजूनही शांतच होती. मग बाईंनी अन्वीला जवळ घेऊन विचारले. तेव्हा अन्वी म्हणाली, ‘मी दोन चा पाढा सहापर्यंत मोजला.' अन्वीचे हे उत्तर ऐकून तिच्यामध्ये एकविसाव्या शतकातील ‘क्रिटिकल थिंकिंग' हे कौशल्य रुजले आहे याचा मला प्रत्यय आला. पुढची गंमत म्हणजे ‘मला फक्त दोनचाच पाढा येतो' असे अन्वीने बाईंना सांगितले. खरे तर अन्वीला किती पाढे येतात हे महत्त्वाचे नाही तर जेवढे पाढे येतात तेवढ्या पाढ्यांचा उपयोग करून तिला तिच्या समस्या  सोडवता येतात हे महत्त्वाचे आहे. सहा मुलांना सहा गोळ्या देऊन राहिलेली एक जादाची गोळी मी अन्वीला दिली.

शाळेतून बाहेर पडताना एक एक पायरी उतरत होतो. अंगणाच्या शेजारी उभ्या असलेल्या फुलांकडे बघत होतो. मला फुलांऐवजी मुले दिसू लागली. एक दीर्घ श्वास घ्ोतला आणि अन्वीचे उत्तर फुलांच्या सुगंधाप्रमाणे मनात साठवून, एकविसाव्या शतकातील कौशल्य मुलांमध्ये रुजत आहेत हा भाव मनात घेऊन मी मला स्वतःला पाढ्यांचा उपयोग करून मला माझ्या समस्या सोडवता येतात का? याचा विचार करू लागलो. - अमर घाटगे, केंद्र प्रमुख रत्नागिरी. 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 काळ सोकावतो आहे?