काळ सोकावतो आहे?

पंधरा वयोगटातल्या मुलांनी एका यंत्रणेला केवळ कुणाच्या सांगण्यावरून किंवा स्वतःच्या अकलेने कुणालातरी हिरो किंवा मसीहा समजून शह देण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ युवाशक्ती सारासार विचार न करता एका भरकटलेल्या विचारधारेला आपलेसे करते आहे आणि हीच आपली हार आहे. आदर्शवाद आणि सामाजिकवाद यांची सांगड बिघडली की अशी परिस्थिती निर्माण होणारच! चंगळवादी संस्कृतीला हळूहळू आपण शरण तर जात नाही आहोत ना? अशी एक शंका उगाचच माझ्या मनात येते आहे.

 दहावीत शिकत होतो तेव्हाची गोष्ट. मराठीचा तास सुरु होता. आमचे तत्कालीन मुख्याध्यापक तावडे सर शिकवत होते. साने गुरुजींच्या भाषणाचा संदर्भ किंवा कुठला तरी पाठावर चर्चा होत होती. कामगार वस्तीतल्या ह्या काळातल्या शाळेत शिकणाऱ्या आमच्या सारख्या मुलांचे सामाजीक शिक्षण तेव्हा पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून घडत होते. कुमारांपुढील कार्य हे युवा साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून साने गुरुजींनी केलेले भाषण सर शिकवत होते. तेजस्विता, तपस्वीता आणि तत्परता हे तारुण्यातील तीन त कार या गुरुजींच्या एका वाक्यावर सर पुढील कित्येक तास बोलत होते. साने गुरुजींनी कुमारांपुढील कार्य इतक्या प्रभावीपणे लिहिलेलं की गेली कित्येक वर्षे त्यांचा प्रभाव कित्येकांवर का राहिला याची उत्तरे सहज मिळत गेली. पुढील निदान महिनाभर गुरुजींचे त कार आम्ही सगळे मित्र आचरणात आणत होतो. तेव्हा आमचं वय काय असेल तर पंधरा वर्षे. मनोमन साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव पटकन मनावर कोरला गेला. ते वय संस्कारक्षम वय होतं, त्या एका धड्यामुळे पुढे सगळं साने गुरुजींचे लेखन वाचत गेलो. राष्ट्रभक्तीचे धडे त्या संवेदनशील वयात आपोआप घडत गेले. पुढे आयुष्याची गणित इतकी बदलली की औद्योगिकरण, यांत्रिकीकरण यात मीच नाही, तर सगळं जग बुडालं. नव्वदीच्या सुरुवातीच्या काळात समाजमाध्यमे नव्हती. व्यक्त होण्याचे माध्यम म्हणजे मित्र आणि त्यांच्याबरोबर बसण्याचा नाका.

जातीय दंगे पेटून सुद्धा ”खराची एक तो धर्म ...” ही शिकवण आमच्यातील सगळ्यांना प्रिय वाटत होती. पंधरा-सोळाव्या वर्षात झालेले संस्कार पुढील कित्येक वर्षे असेच रक्तात भिनून राहिले होते. हे सगळं आता आठवायचे कारण म्हणजे आजच्या पंधरा सोळा वर्षाच्या मुलांना ज्या पद्धतीने संस्कारित केलं जात आहे आणि ज्याप्रकारे मुलं व्यक्त होतं आहेत ते बघून पुढील हाका काही चांगल्या शकुनच्या आहेत अस मला वाटतं नाही. एखाद्या धैर्यापासून जेव्हा मुलं स्वतःला परावृत्त करून धोपटमार्गी यश मिळवण्याचा प्रयत्न करायची जेव्हा मुलांमध्ये इच्छा निर्माण होते तेव्हा पुढचा सामजिक स्तर नक्कीच चांगला नसेल याची जाणीव होते आणि हीच खरी शोकांतिका वाटू लागते. काल मुलांनी परीक्षा घ्यायची असेल तर ती ऑनलाईन घ्या यासाठी जे आंदोलन केलं ते पाहून काळ खरच सोकावला की काय अशी शंका निर्माण व्हायला लागली आहे. कुठल्यातरी सपक माणसाला नेता मानून त्याच्यामागे जेव्हा हा जथ्था निघाला तेव्हा आपण किती झपाट्याने मागे जातो आहे याची जाणीव झाली. यामागे कितीतरी यंत्रणा कार्यरत असेल पण आपण कुणाला दावणीला जुंपतो आहोत याची जाणीव कोणाला नाही का?. ज्या मुलांना बौद्धिक कष्ट घेऊन यश मिळवा हे सांगून त्यांच्याकडून तशाप्रकारे कष्ट करून त्यांना सामाजिक आणि पर्यायाने एका प्रवाहाची जाणीव करून द्यायची असाच प्रघात आपण इतकी वर्षे त्यांना देत आलो आहोत, लगेच ह्या मुलांनी एका अशा व्यक्तीला आपला नेता बनवून काय साध्य केलं? आपण समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जातो आहोत याची जाणीव कोणाला आहे का? समाजमाध्यमे आणि दुखाऊपणा इतका जवळचा वाटू लागला का? ज्या देशात पस्तीस टक्केहून अधिक लोकसंख्या ही युवकांची आहे, त्या देशाला ही बाब नक्कीच काळजी करायला लावणारी आहे.

  गेली कित्येक वर्षे मी ह्या वयोगटातील मुलांमध्ये वावरतो आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड उर्जा असते किंवा आहे. ही उर्जा एका दुधारी शस्त्राप्रमाणे आहे. ती सकारात्मक विचारांना आणि नकारात्मक विचारांनादेखील चालना देऊ शकते. मला वाटतंं कालच्या आंदोलनाची हीच खरी गोम होती. पंधरा वयोगटातल्या मुलांनी एका यंत्रणेला केवळ कुणाच्या सांगण्यावरून किंवा स्वतःच्या अकलेने कुणालातरी हिरो किंवा मसीहा समजून शह देण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ युवाशक्ती सारासार विचार न करता एका भरकटलेल्या विचारधारेला आपलेसे करते आहे आणि हीच आपली हार आहे. आदर्शवाद आणि सामाजिकवाद यांची सांगड बिघडली की अशी परिस्थिती निर्माण होणार यात शंका ती काय? चंगळवादी संस्कृतीला हळूहळू आपण शरण तर जात नाही आहोत ना? अशी एक शंका उगाचच माझ्या मनात येते आहे.

पंधरा वर्षाच्या शाळकरी पोरांची हिंमत फार तर शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून कसली तरी तक्रार करून आपली बाजू मांडण्याची एवढीच अपेक्षित!. मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा विक्रोळीसारख्या कामगार वस्तीत होती. स्वतःची ईमारत नसलेली ही शाळा सगळ्यांच्या कौतुकाचा विषय होती. हौसिंग बोर्डाने दिलेल्या रहिवासी इमारतीच्या तळमजल्यावर आमची शाळा भरायची. पावसाळा सुरु झाली की शाळेच्या भिंतीवर गोगलगाई यायच्या. भिंतीना ओल लागायची. ह्या सगळ्या प्रकाराने एक दिवस आम्ही दहावीच्या तिन्ही तुकड्यांनी मिळून मुख्याध्यापकांना एक तक्रारीचे पत्र दिलं आणि वर्गात न जाता बाहेर उभे राहिलो. तातडीने मुख्याध्यापक आले. त्यांना वर्गात काय परिस्थिती आहे याची जाणीव होती. त्यांनी आमचं आंदोलन मोडून काढलं नाही. उलट आपल्या प्रश्नांना सनदशीर मार्गाने वाचा फोडता येते याची जाणीव करून दिली, त्यानंतर सगळे वर्गात गेलो आणि नियमित तास सुरु झाले. तेव्हापासून मात्र आमच्यातल्या कोणीच असली आंदोलनं करण्याच्या भानगडीत पडला नाही. पुढची पिढी कुठल्यातरी अनुभवाच्या जोरावर हे सगळे सांगते तेव्हा त्यात बराच तथ्यांश असतो हे नक्की.

 समाजात सतत असुरक्षित, असहिष्णू वातावरण निर्माण करून आम्ही कुठली महासत्ता घडवणार आहोत ह्याचा मला प्रश्न पडला आहे. ह्यात प्रसारमाध्यमे देखील अग्रस्थानी आहेतच की. कुठल्यातरी घटनेचा बाऊ करून समाजात दुही निर्माण करून धार्मिकतेचा बाऊ करून काहीतरी सतत धगधगत ठेवणारे वातावरण असेच तयार होत राहिले तर पुढची वाट काय? लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी अनेक कलाकार जमले होते. जो तो सद्गतीसाठी प्रार्थना करत होता. आयुष्यभर केवळ संगीताची उपासना करणाऱ्या ह्या महान गायिकेला मानवंदना देणं हे अपेक्षित होतेच. त्यातही ह्या घटनेत कुठे खोट काढून धार्मिक वातावरण कसे दुषित करता येईल याचीच लोक वाट पहात होते. ह्या लोकांनी ”फुंकला” आणि तर ”थुंकला” यावर दिवसभर किती चर्चामंथन केलं. प्रसंग कोणता? आपण करतो काय? याचे भान लोकांना नसते का? केवळ धार्मिकतेचा रंग चढवून एखादी घटना कशी रचता येईल याची लोकांना फार लवकर जाणीव होऊ लागलीय. अशा अनेक घटना आजूबाजूला घडत असताना आपण स्वस्थ बसू शकत नाही. आपल्या सामाजिक घटना बोथट होत चालल्या आहेत हे मात्र खरं. जेष्ठ कवी अनिल धाकू कांबळी जेव्हा ”मुसलमानात राहून....” ही कविता लिहितो तेव्हा तो आजूबाजुचा समाजाचे अवलोकन करत असतो. जर आपण सगळे इतक्या मनमोकळेपणे एकमेकात मिळून मिसळून रहात असू तर ही धार्मिकतेची बोंब उठते कुठून?. समाजमाध्यमे इतकी बोकाळली आहेत की कुठल्या घटनेला कुठला रंग देऊन सामाजिक अस्थिरता कशी निर्माण करता येईल आणि जेणे करून समाजस्वास्थ कसे बिघडवले जाऊ शकते याचे गणित आता अनेकांना व्यवस्थित जमू लागले आहे.  

घडणाऱ्या ह्या गोष्टी काही समाजकारणाला नक्कीच पोषक नाहीत. हातात आयुष्यभरासाठी घेतलेली वाळू दिवसेंदिवस आपल्या हातून एकेका कणाने निघून जाते आहे याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. समाजमन कुठेतरी व्यथित होत आहे आणि तिथल्याच वातावरणात आपण इतकी वर्षे रहातो आहोत आणि पुढे रहाणार आहोत. ह्या सगळ्या प्रकाराने रात्रीची झोप मात्र उडाली आहे. ह्यापुढे काय होणार या एका प्रश्नाने फक्त सिलिंगकडे डोळे लागतात. समाजात ही कीड नक्की कोणी आणि केव्हा पसरवली हे आता नक्की कसे सांगता येईल? तरी हा प्रश्न नक्की कसा सोडवता येईल हे सांगता येणार नाही. रात्री कधीतरी झोप लागली की हे सगळे प्रश्न आठवत झोप लागते. ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून स्वप्नात देखील ह्याच घटना क्रमाने येतात. रात्री कधीतरी पटकन जाग येते. सगळीकडे धुकधुक, तशातच मग स्वप्नात देखील कोणीतरी पटकन आपल्याला सांगत की ह्या सगळ्याचा विचार तू कशाला करतोस. अरे!, भौतिकशास्त्रासारखा चांगला विषय हाताशी आहे तर ह्या सगळ्या संवेदनशील गोष्टी काढून ठेव. मस्त  मोठ्या शिकवण्या घे. सोमवार ते शुक्रवार जोरदार काम कर आणि शनिवार-रविवार कुठेतरी रिसोर्ट बुक करून कुटुंबाबरोबर मजा कर, निदान मॉलला जाऊन मनसोक्त भटक. यातलं काहीच तुला जमत नसेल तर निदान घरात झोप; पण पुन्हा पुन्हा समाज असा झालाय तसा झालाय. संदेवना नष्ट झाल्यात म्हणून उगाच गळा काढून रडत बसू नको. काळाबरोबर चालता येत नसेल तर उगाच काळ सोकावत चालला आहे म्हणून रात्रीची झोप हरवू नकोस. ह्या कोणा अज्ञात आवाजाच्या बोलण्याने पुन्हा धीर येतो. रात्री झोप लागते. सकाळी उठल्यावर पुन्हा रहाटगाडगे मागे लागते. काळ सोकावत चालल्याची अनेकवेळा जाणीव होत रहाते. - वैभव रामचंद्र साटम. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भगवंतापासून विभक्त नाही, तोच खरा भक्त