मुशाफिरी

 पाच वर्षात मुंबई पारबंदर सामुद्री मार्ग अर्थात अटल सेतू बांधून पूर्ण झाला..आणि १९९० साली कागदावर आखणी केलेल्या उरणपर्यंतच्या रेल्वेमार्गाचेही लोकार्पण एकदाचे झाले. पण गेली अनेक दशके वापरात असलेल्या मुंबई-गोवा मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे काय? जानेवारी २०१० मध्ये या कामाची सुरुवात झाली. तेव्हापासून गेल्या चौदा वर्षात महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री पाहिले. तारखांवर तारखा पडत राहिल्या; काम अजूनही पूर्ण झालेले नाही. याहुन कमी काळात उत्तर प्रदेशात अनेक शहरे चकाचक करण्यात आली; रस्ते, विमानतळ, रेल्वे स्थानके उभारण्यात आली. त्यांना हे कसे बरे शवय झाले आणि महाराष्ट्रात नेमक्या मुंबई-गोवा मार्गावरच अनंत अडचणी का येत आहेत?  

 कोणत्याही भूभागावर एकदा का उपनगरीय रेल्वेसेवा सुरु झाली की त्या परिसराचा झपाट्याने विकास व्हायला सुरुवात होते हा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या बाबतीत तसे होतेच असे नाही. कारण त्या गाड्या नुसत्याच सुसाट धावतात. ज्या रेल्वे स्थानकांवर त्या थांबत नाहीत, त्या परिसरातील लोकवस्तीला त्यांचा काहीही फायदा नसतो. परिणामी रेल्वे खाते त्या रेल्वे स्थानकांचाही विकास करीत नाही. मुंबई, वसई, ठाणे, पनवेल येथून पुढे गोवा, केरळकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांच्या बाबतीत असे पाहायला मिळते. कोकणातील अनेक रेल्वे स्थानकांत धड फलाट नाही, फलाट असले तर त्यावर शेड नाही, प्रवाशांसाठी प्रसाधनगृहे नाहीत अशी अवस्था आहे. या देशाने अनेक रेल्वेमंत्री पाहिले, विविध राजकीय पक्षांची सरकारे पाहिली. पण कोकणातल्या छोट्या रेल्वेस्थानकांची सुधारणा करावी असे कुणालाच वाटले नाही, अशी ही सार्वत्रिक उदासिनता आहे.

   १९९० सालापासून उरणकडे जाणारी रेल्वेसेवा सुरु व्हावी यासाठी आखणी सुरु झाली. यात अनंत अडचणी आल्या. राज्यात, केंद्रात अनेक सत्तापालट झाले. या मार्गाला मंजूरी मार्च १९९६ साली मिळाली व तो पूर्ण करण्याची तारीख मार्च २००४ अशी मुक्रर करण्यात आली होती. त्यानंतरही जवळपास वीस वर्षांनी अखेर १२ जानेवारी २०२४ चा मुहुर्त साधून हा रेल्वेमार्ग सुरु झाला. उरण हे उत्तर कोकणात येणारे माझ्या पूर्वजांचे गाव आहे. दि.१३ ऑक्टोबर २०२३ च्या दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये या गावाबद्दलचा माझा एक लघुलेख ‘हिरवाईने नटलेलं उरण' हा शीर्षकाखाली प्रसिध्द झाला होता. अजूनतरी उरण बऱ्यापैकी हिरवेगार आहे, पण पुढे ते तसेच राहिल याची काहीच शाश्वती नाही. १२ जानेवारी २०२४ रोजी शिवडी ते न्हावा शेवा अटल सेतू या भारतामधील सर्वाधिक लांबीच्या सागरी मार्गाचेही पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले. या पुलामुळे आता दादर, शीव, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, वाशी, सीबीडी, पनवेल परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास बऱ्यापैकी मदत होईल हे खरे. पण यातील बरीचशी वाहतुक आता ‘हिरवाईने नटलेल्या उरण' तालुवयातून जाईल व तिथले प्रदूषण वाढवील हेही वास्तव आहेच! डी.एस.भिडे या कोपरखैरणे येथील एका पत्रलेखकाने दै.महाराष्ट्र टाईम्स (दि.१६ जाने.२४) मध्ये एक पत्र लिहुन या पुलासाठी एमएमआरडीने एवढा अवाढव्य खर्च करत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वाकड उड्डाण पुल (पुणे) हे पूर्वीच्या रस्त्याचे १४६ किमीचे अंतर १४२ किमीवर आणले व प्रवासासाठी लागणारा वेळ जवळपास सारखाच; मग यातून काय साधले, असा सवाल उपस्थित केला आहे. दादरच्या पलिकडे राहणाऱ्यांना या पुलाचा काहीही फायदा नाही असेही भिडे यांनी नमूद केले  आहे.  

   पाच वर्षात हा मुंबई पारबंदर सामुद्री मार्ग विविध नैसर्गिक आपत्तींशी सामना देत बांधून पूर्ण तरी झाला. पण गेली अनेक दशके वापरात असलेल्या मुंबई-गोवा मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे काय? जानेवारी २०१० मध्ये या मार्गाच्या कामाची सुरुवात झाली. तेव्हापासून गेल्या चौदा वर्षात महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले व सार्वजनिक बांधकाम मंत्रीही पाहिले. नुसत्याच तारखांवर तारखा पडत राहिल्या; काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या सर्व काळात या मार्गावरील अपघातांमध्ये जवळपास तीन हजारांहुन निष्पाप नागरिकांचा मृत्यु झाला. अनेकांना अपघातांनंतर कायमचे अथवा अंशतः अपंगत्व आले. या रस्त्याच्या पुर्ततेसाठी सर्वसामान्य नागरिकांपासून महिला, वकील, पत्रकार, वाहनचालक या साऱ्यांनी आंदोलने केली. न्यायासाठी कोर्टातही धाव घेतली. तरी प्रशासन ढिम्मच आहे व रस्त्याचे काम कासवगतीने सुरु आहे. याच्याहुन फार कमी अवधीत तिकडे गुजरातेत विविध कामांचा तडाखा लावला गेला, उत्तर प्रदेशात अनेक शहरे चकाचक करण्यात आली, रस्ते, विमानतळ, रेल्वेस्थानके उभारण्यात आली. त्यांना हे कसे बरे शक्य झाले आणि महाराष्ट्रात नेमक्या मुंबई-गोवा मार्गावरच अनंत अडचणी का येत आहेत? याबाबत आपल्याकडील सत्ताकारण्यांनी-राजकारण्यांनी आत्मचिंतन करायला हवे.

   उरण-पनवेल परिसराबाबत बोलायचे झाल्यास ‘लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' या भागात उभारले जात असल्याने तेथे आता रस्ते, पुल, पुलावर पुल, बोगदे, भुयारी मार्ग, रेल्वेमार्ग यांचे जाळे विणले जात आहे. हे जाळे इतके घनदाट आहे की रस्त्यावरील एखाद्या पाटीकडे थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी भलतीकडेच जाण्याची शवयता असते. चार-सहा महिन्यांच्या कालांतराने उरणकडे जाणे झाले तरी एखादा मार्ग बदललेला असतो. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला टर्मिनस, मुंबई सेंट्रल, चर्चगेट ही  महत्वाची रेल्वे स्थानके एकीकडे आहेत व छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळ हे दुसरीकडे आहे. मात्र दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच रेल्वेस्थानक, बस थांबे, नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतुकीचा मार्ग असल्याने रस्ता, रेल्वे, जल व हवाई अशा दळणवळणाच्या चारही मार्गांनी हा सारा परिसर आता देशाशी व परदेशांशीही जोडला जाणार आहे.

   प्रगती, विकास, शहरीकरण, उद्योगीकरण याचे जसे लाभ असतात, तसेच त्याचे तोटेही असतातच. एवढ्या गतिमान नागरीकरणामुळे उरण-पनवेलचे ‘गावपण' संपणार आहे, स्थानिकांची अस्मिता हळुहळू  पुसट होत जाणार आहे, तेथील आगरी-कोळी-कराडी-पाचकळशी-चौकळशी या व अशा  पूर्वापार वास्तव्य करणाऱ्या स्थानिक-मूलनिवासी भूमिपुत्र जनसमुहांचा एकजिनसीपणा आता विरळ होत जाऊन तेथे अमराठीयांची भेसळ वाढणार आहे. आत्ताच परप्रांतीयांपैकी अनेकांनी उरणकडील काही रेल्वेस्थानक परिसरात अनधिकृतरित्या शहाळी, पाणीपुरी, वडे-समोसे, कपडेविक्री, चणे-शेंगदाणे, रसविक्री करणारे स्टॉल्स उभारण्यासाठी हळूहळू अतिक्रमणांना सुरुवात केली आहे. ‘जा मराठीमे नही बोलेगा, जो करना है वो करले' असे ऐकवणारे परप्रांतीय महाराष्ट्रात वाढत आहेत आणि मनसेवाले त्यांना चोपून काढत आहेत, तरीही त्या लोकांची मग्रूरी कमी होत नाही.

   नेरुळ/बेलापूर ते उरण हा रेल्वेमार्ग तर सुरु झाला..पण उरणहुन थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस, ठाणे, पनवेल येथे जाण्याचे काय, हा प्रश्न उरतोच. उरणकरांनी अजूनही नेरुळ/बेलापूरला उतरुन तेथे भरुन येणाऱ्या रेल्वेगाडीत बसून उभ्यानेच प्रवास करावा किंवा तेथून सुटणाऱ्या गाडीची वाट पाहात टाईमपास करावा असेच रेल्वे खात्याला वाटत असावे. या रेल्वेमार्गावर प्रवास करणारे वाढत आहेत, रेल्वेची तिकीटे वाढत्या संख्येने काढली जात आहेत. यामुळे उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा, रांजणपाडा या रेल्वेस्थानकांपर्यंत प्रवाशांना घेऊन जाणाऱ्यांना स्थानिक रिवशावाल्यांनाही भाड्यासाठी नवे पर्याय उपलब्ध होत आहेत. नवी मुंबई परिवहन उपक्रमाने आता उरणकडे जाणाऱ्या विविध रेल्वेस्थानकांपर्यंतही  प्रवासी सेवा पुरवून आपला महसुल वाढीचा उद्देश मार्गी लावला पाहिजे. रात्रीचे दहा वाजले की बहुतांश एनएमएमटी बसगाड्या तुर्भे, आसुडगाव अशा बस आगाराकडे (मुक्कामासाठी?) रिकाम्या निघतात आणि नवी मुंबईतील विविध बसथांब्यांवर जिकडेतिकडे प्रवासी बिचारे ताटकळत राहतात व बृहन्मुंबई महापालिकेच्या बेस्टच्या बसगाड्या त्यांना केवळ पाच रुपयात जागोजागी पोहचवत आपला महसुल नवी मुंबईतूनही सतत वाढवीत असतात. या बेस्टने आता उरणकडे शिरकाव केला तर नवल वाटायला नको.

   नवी मुंबई, उरण, पनवेल परिसरातील जमिनमालकांना सिडकोने संपादित केलेल्या जमिनींचा योग्य तो मोबदला मिळवण्यासाठी प्रखर आंदोलन केलेले रायगडचे तत्कालिन खासदार लोकनेते स्व. दि.बा.पाटील यांची जयंती १३ जानेवारीस असते. त्यांच्या आंदोलनाला १६-१७ जानेवारीस ४० वर्षे पूर्ण झाली. त्या उग्र आंदोलनात स्वतः दि.बा. जखमी झाले. त्यावेळी करण्यात आलेल्या गोळीबारात नामदेव शंकर घरत (चिर्ले), रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम), कमलाकर कृष्णा तांडेल, महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील (पागोटे) या पाचजणांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या समर्पणाचा, त्यागाचा लोकांना लवकरच विसर पडला, त्यांच्या वारसांना वाऱ्यावर सोडण्यात आले, ही त्यांचे कुटुंबिय व्यक्त करत असलेली भावना नजरेआड करण्यासारखी नाही. दिबांचे नाव तर विमानतळाला हवेच; पण त्या हुतात्म्यांचे पुतळेही विमानतळ परिसरात हवेत ही मागणीही गैर नव्हे. पंतप्रधानांसमोर केलेल्या भाषणात अनेकांना दिबांचाच विसर पडल्याचे दिसले याबद्दल नामकरण संघर्ष समितीच्या अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. ह्यासाठी जो काही जोर लावायचा तो आत्ताच. कारण येणाऱ्या पिढीतील अनेकांना लोकनेते दि.बा.पाटील साहेब तसेच त्यांच्या आंदोलनासाठी प्राणार्पण केलेल्यांबद्दल तितकीशी माहिती, आत्मीयता असेलच असे नाही आणि हे विमानतळ, सुरु झालेला अटल सेतू, नेरुळ/बेलापूर रेल्वेसेवा, जलवाहतुक यामुळे उपलब्ध होणाऱ्या सुखसोयींचे लाभ जे या भागात मोठ्या प्रमाणावर राहायला येणारे परप्रांतीय घेणार आहेत त्यांना तर या सगळ्यांच्या प्रति आत्मीयता, कृतज्ञता, आपुलकी, आदर असण्याची शक्यता तर अत्यंत कमीच!- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर.

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुले, फुले, पाढे आणि क्रिटिकल थिंकिंग