पळसफुल : निसर्गाचा रंगोत्सव

पळसांची फुले अचानक मार्च, एप्रिलमध्ये नष्ट होऊन वाळलेल्या फुलांचा खच झाडाखाली पडल्यामुळे केसरी गालीचा अंथरल्याचा भास होतो. पळसाची शेंग किंवा फळ चपटी असते, त्यातील बी तांब्याच्या पैशासारखी वर्तुळाकार वाटोळी असते. या शेंगेला पळस पापडी म्हणतात. बी कडवट तुरत असते. संतती नियंत्रणासाठी पळसाच्या डिंकाचा वापर प्राचीन काळात केला जात असे. डॉक्टर राणी बंग यांनी गोईन नावाच्या पुस्तकात वनपरीक्षेत्रातील लोकांच्या औषधोपचाराचा उल्लेख केलेला आहे.

वऱ्हाडातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर फुल कोणते? असा फाल्गुन महिन्यात कुणी प्रश्न विचारला तर ग्रामीण भागातील, निसर्गाच्या सानिध्यात राहणारे शेतकरी, वनवासी यावर एकच उत्तर देतात आणि ते म्हणजे पळसफुल! ग्रामीण भागातील लोकांनी दिलेले हे उत्तर खरोखरच निसर्गाशी नाते  जोडणारे असते. पौष महिन्यातील धुकं ओसरले की माघ महिन्यातील सुखा-मुका तपकीरपणा सर्वत्र जंगलात, परिसरात पसरत असतो. जंगलात सर्वत्र पानगळ सुरू होते. हिरवीकच्च असलेली सागाची झाडे, बेहडा सर्वप्रथम पानगळ होऊन बोडखी होतात. वऱ्हाडात एप्रिल, मे महिन्यात कडक तापणाऱ्या उन्हाची जाणीव या पानगळीतून होते. आठ महिन्यापासून शेत परिसरात, हिरव्याकच्च, विविध रंगाने नटलेल्या परिसरात सर्वत्र तपकिरी, पिवळा रंग पसरलेला असतो. बांधावरले हिरवे कच्चे गवत कधीच संपलेले असते. नांगरणी करीत असताना दोन-तीन महिन्यापूर्वीच हिरवी शालू पांघरलेली जमीन काळी ठिक्कर पडत असलेली जमीन हळव्या शेतकऱ्याला दुःखी कष्टी करते. शेताच्या बांधावर असलेल्या विविध झाडांवरील रानवेलीची पाने सुकून, त्या कोलमडून पडतात. बांधावर, झाडांवर उडणारे, शीळ घालून एकमेकांना साद देणारे विविध पक्षी दिसेनासे होतात. अशा वेळेस दुःखी कष्टी व भावनिक झालेल्या ग्रामीण भागातील अबालवृद्धांना एका वृक्षाची फुले भुरळ घालून मन प्रसन्न करतात. ती फुले म्हणजे पळसाची फुले. पोपटाच्या चोचीसारखी केसरी दिसणारी पळसाची फुले गुच्छ स्वरूपात पळसाच्या डालीवर असतात. झुंबरासारखी लटकलेली ही फुले संपूर्ण जंगल परिसर नटवून टाकतात. शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर असलेला एकमेव पळस कष्टाने थकलेल्या त्याच्या शरीर व मनाला नवी उभारी देऊन आपल्या केशरी रंगाच्या माध्यमातून त्यागाची शिकवणूक देतो.

   पळसाचे झाड साधारणतः खडकाळ, हलक्या व रानमाळात मोठ्या संख्येने उगवते. झाडाचा बुंधा खरबडीत, त्याची तीन पाने हाताच्या पंजाएवढी असतात, पत्रावळी वृक्ष म्हणून संपूर्ण भारतात तो वृक्ष परिचित आहे. आजही गाव खेड्यात पळसांच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळीवर जेवणावळी केल्या जातात. अस्ताव्यस्त वाढलेला हा वृक्ष अनेक कीटक, पक्षांचा निवारा असतो. आग्नेय वऱ्हाड, सातपुडा पर्वतरांगात या वृक्षाची प्रचंड संख्या आहे. एरवी दुर्लाक्षित असलेला पलाश फाल्गुन महिन्यात सर्वांचे लक्ष आपल्या सौंदर्याने आकर्षित करतो. ऋग्वेदिक साहित्य, कालिदास कृत मेघदूत, शाकुंतल, राजा हालकृत गाथा सप्तसती, बौद्ध साहित्य, संत साहित्य यात या वृक्षाचे वर्णन मिळते. आयुर्वेदिक ग्रंथात पळसाला पालाश म्हणतात तर इंग्रजांनी फायर पलेम ऑफ फॉरेस्ट असे वर्णन पळसाचे केले आहे. फुलावर असताना एखादा वृक्ष पेटला की काय असे दृश्य इंग्रजांनी पाहिल्यामुळे त्यांनी नवलाने ही उपमा या झाडाला दिली.

    पळसाच्या मुळ्या खोदून त्याचा वाक काढला जातो व त्यापासून दोरखंड बनवण्याची प्रथा पूर्वी होती. याच वाकाचा उपयोग बांधणीसाठीसुद्धा करीत. सुगीच्या दिवसात ज्वारीचे खळे बनविताना खळ्याच्या मधोमध पळसाची मेढ उभी केल्या जात असे.  अनेकविध रोगात आजारात पळसाच्या उपयोग होतो असा आयुर्वेदिक ग्रंथात उल्लेख मिळतो. पळसाला तीनच पान ही वऱ्हाडातील म्हण प्रसिद्ध आहे. लोक व्यवहारात या म्हणीचा ग्रामीण भागात सर्रासपणे उपयोग केला जातो. असे असले तरीही पळसाच्या झाडाला चार पाने सुद्धा येतात ..या पानाचा उपयोग पोळ्याच्या वेळेस बैलांच्या खांदा शेकण्यासाठी केल्या जातो.

     वर्षभर दुर्लाक्षित असलेला पळस मात्र फेब्रुवारी, मार्च महिन्यात सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतो. होळीला ग्रामीण भागातील मुले पळसाची फुले गोळा करून ती खलबत्त्यात कुटतात. त्यापासून तयार केलेला केसरी रंग धुळवळीत वापरण्याची प्रथा प्राचीन काळापासून भारतात आहे. प्राचीन व मध्ययुगीन काळात रंगारी पळसाची फुले एकत्रित करून त्यांना सुकवीत, मोठ्या पातेल्यात या पळसाच्या फुलाचा अर्क बनवून त्यात मीठ मिसळीत. तयार झालेल्या द्रावणात पटके, शेले, विविध प्रकारची कापड रंगवीत. दुर्लक्षित असलेला पळस मात्र लोकांच्या जीवनात रंग भरण्याचे महत्त्वाचे कार्य करीत असे. पळसाला फुले आल्यावर हजारो पळस मैना थव्या थव्याने झाडावर बसून पळस फुलांच्या मकरंद खाताना परिसरात दिसतात. त्यांचा किलबिलाट सामूहिक गायनाची आठवण करून देतो. आग्नेय आशियाई देशात केवळ भारतातच पळस वृक्षाचे मोठ्या संख्येने अस्तित्व दिसते केशरी फुले, पिवळी फुले व क्वचित प्रसंगी पांढरी फुले असलेले पळसाचे झाड निसर्गात विविध रंग उधळताना दिसतात. पांढऱ्या पळसावर वीज कोसळत नाही हे समजूत आजही ग्रामीण भागात दिसून येते. या पळसाची फुले घरी आणल्यास त्यांना धनवैभव लाभते अशी समजूत मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात असल्यामुळे परिसरात पांढरा पळस दिशेनासा झाला. पळसांची फुले अचानक मार्च, एप्रिलमध्ये नष्ट होऊन वाळलेल्या फुलांचा खच झाडाखाली पडल्यामुळे केसरी गालीचा अंथरल्याचा भास होतो. पळसाची शेंग किंवा फळ चपटी असते, त्यातील बी तांब्याच्या पैशासारखी वर्तुळाकार वाटोळी असते. या शेंगेला पळस पापडी म्हणतात. बी कडवट तुरत असते. संतती नियंत्रणासाठी पळसाच्या डिंकाचा वापर प्राचीन काळात केला जात असे. डॉक्टर राणी बंग यांनी गोईन नावाच्या पुस्तकात वनपरीक्षेत्रातील लोकांच्या औषधोपचाराचा उल्लेख केलेला आहे. दुर्गाताई भागवत, डॉक्टर राणी बंग,मारुती चित्तमपल्ली, डॉक्टर सलीम अली या निसर्ग लेखकांनी पळस फुले म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेला केशरी उपहार असे संबोधले आहे. तिबेटियन संस्कृतीमध्ये कालचक्र नावाचा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या महोत्सवात आठ दहा दिवस भिक्षू सुंदर गोल आकाराची कालचक्र नावाची रांगोळी रेखाटतात. त्यावरील नक्षीकाम अतिशय आकर्षक असते. अचानक एवढी सुंदर रांगोळी जिला रेखाटण्यास आठ दहा दिवस लागलीत ती शेवटच्या दिवशी क्षणात मिटवून टाकली जाते. मानवी जीवनही याच प्रकारे आहे असा या मागचा संदेश असतो. पळस फुलही असाच संदेश देतात. अचानक मार्च-एप्रिलमध्ये पळस फुले गळून पडून त्याचे रूपांतर पोपटी शेंगात होऊन नंतर ह्या पापड्या तपकिरी पिवळट रंगाच्या पडतात. कालचक्र रांगोळी प्रमाणे! मानवी जीवन क्षणभंगुर आहे असा कदाचित संदेश देत असाव्यात.

    माणूस हा शहरी असो की ग्रामीण त्याला निसर्गाबद्दल प्रचंड आकर्षण असते. नागरी भागातील पर्यावरण तपासून पाहिल्यास या भागातील बहुतांश झाडे ही शहरी माणसांनी लावली. फक्त दुःखाने एवढेच म्हणावसे वाटते की यात ग्रामीण, डोंगरी भागातील झाडांची संख्या नाममात्र असते व त्यातही पळसांच्या झाडाची संख्या नगण्य आहे.  -  प्रा.डॉ. ज्ञानेश्वर वारंगे अमरावती. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी