स्क्रिप्ट आणि मधुमती

सिनेमा केवळ तांत्रिक दृष्टीने उजवा असला म्हणजे यश मिळते हे फसवे आहे. मागील काळातले अनेक सिनेमे चकचकित होते; पण खिडकीवर सपशेल आदळले. सिनेमाची खरी ताकद त्याची कहाणी होय. मधुमती चित्रपटाकरिता कवी शैलेंद्रजी यांनी लिहिलेली अर्थपूर्ण गाणी ज्यास संगीतमय करण्यांत पूर्ण यशस्वी ठरलेले संगीतकार सलील चौधरी यांना बिमल रॉय यांनी  स्वातंत्र्य दिले. म्हणून मधुमती सिनेमा हा संगीतमय कलाकृतीचा अस्सल नमुना ठरला. कृष्णधवल सिनेमा असूनही ह्याची फोटोग्राफी अप्रतिम आहे. पहाडी अरण्याची पार्श्वभूमी लाभलेल्या या कथेवर चित्रित करताना छायाचित्रकाराने आपला तिसरा डोळा योग्य वापरला आहे. पहिली फ्रेम ते शेवटच्या फ्रेममध्ये दिसणारी पीडित नायिका (वैजयंती माला) ही स्क्रीनवर आत्माच तर नसावी? असे अधूनमधून वाटत राहते.

हिंदी सिनेमाची व्यावसायिक व्याख्या तशी कधीच करता आली नसेल, कित्तीतरी अनुभवी धुरीणांनी तसा प्रयत्न केलाही असेल; पण मेरा नाम जोकर खिडकीवर  का व कसा आदळला हे गुपित आजही कुणी सांगू शकलेले नाही. त्याचप्रमाणे सी क्लासचे सिनेमे अगदी त्याचवेळी अपेक्षेपेक्षा जास्त गल्ला का करू शकले, ह्याची कारणं अनेक असू शकतील..पण  याला टायमिंग हे एकमेव कारण असावे, असे आजही  बोलले जाते. दारासिंग, विश्वजीत, जॉय मुखर्जी इत्यादी कलाकारांना घ्ोऊन सिनेमा का केला गेला असेल? ह्याची कारणं त्यावेळचे वितरण क्षेत्रातील तज्ञ सांगू शकतील.

तिसरी मंझिल हा सस्पेन्स हिंदी सिनेमा त्यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त चालला! ह्याची कारणं अनेक असतील. पण विजय आनंद  हे यशाचे पहिले मानकरी!  दुसरे त्या सिनेमाची स्क्रिप्ट इतकी चाबूक होती की कथेतला खलनायक तोच खुनी असूनही शिवाय प्रेक्षकांना ते ठाऊक असूनही पुढे काय होईल?' ह्याची उत्कंठा शेवटपर्यंत लागून राहते. का? तर सिनेमा कागदावर व्यवस्थित लिहिला गेला व स्क्रिप्ट एव्हढी चविष्ठ बनली की दिग्दर्शकास यश खेचून आणण्यास सोपं झालं

त्याशिवाय त्या सिनेमाचे संगीत! होय, काळाच्या  दोन दशकं पुढचा संगीतमय माहोल तयार करण्यांत राहुलदेव बर्मन यांना शक्य झाले व शम्मी कपूर हा त्यावेळी  मुळातच स्टाइलिश नायक म्हणून ख्यात झालेला असल्याने  तरुणाईने तिसरी मंझिल हा रंगीत  सिनेमा हिट ठरवला. अर्थातच नायक-नायिके व्यतिरिक्त इतर सर्व कलाकारांची निवड योग्य वाटली...हे नाकारता येणार नाही. त्यावेळी रेडिओवर त्या सिनेमाची गाणी लावली जाऊ नयेत म्हणून नासिर हुसेनला (निर्माते म्हणून) तसे रेडिओला लिखित कळवावे लागले..असं कुठेतरी वाचनात आले होते...का? तर प्रेक्षकांना त्यातील सर्व गाणी सिने गृहात येऊन एन्जॉय करता यावीत म्हणून व रेकॉर्डस (तबकड्या) ची विक्री व्हावी म्हणून!
लगान हा सिनेमा जेव्हा टॉकीजमध्ये प्रदर्शित झाला त्यावेळी प्रॉडक्शन विभागच काय, तर सर्व देशभरातील वितरकांची झोप उडालेली असणार! तद्‌नंतरचा किस्सा इतिहास घडवणारा ठरला. हे वेगळं सांगायला नकोय. क्लायमॅक्स  तर  चक्क २०-२० क्रिकेट मॅच सारखा चित्रित करण्यात आलेला होता. ज्या देशात सचिन तेंडुलकर सारखा क्रिकेट  क्षेत्रातील जगविख्यात देव राहतो त्या काळात सिनेमॅटिक क्रिकेट मॅच कोण व कशासाठी पाहणार? अशा विचित्र कात्रीत फसलेला तो सिनेमा आजही प्रेक्षक वेळ देऊन पाहतात अगदीं टीव्हीवरील पकाव जाहिराती सोसून..! कारण ह्या सिनेमाची स्क्रिप्ट घोड्याच्या लगामीगत ताठ  कसलेली होती. इंग्रजीत ज्यास पलॉलेस प्रॉडक्शन म्हणतात, ती म्हणजे लगान.

देशातील विविध ठिकाणच्या नाट्य विभागात ट्रेनिंग घेऊन जे कलाकार मुंबापुरीत  दाखल झाले त्यातील विशेष नावं म्हणजे ओम पुरी, नसिरुद्दीन शाह, दीप्ती नवल, शबाना आझमी, स्मिता पाटील  इत्यादी होत. मुळातच अंगी कला ठासून भरलेली असल्याने त्यांना हिंदी सिनेमातील मिळालेल्या संधीचे सोनं करण्यांत यश मिळाले. अर्थातच यथावकाश! मात्र पुण्याच्या टेलिव्हिजन अँड फिल्म इन्स्टिट्यूटचा प्रवास त्यांना पूर्ण करावा लागला. त्यावेळेस थिएट्रिकल मेलोड्रामा हा जास्त प्रख्यात होता. प्रेक्षकांना तो आवडत असे.  दिलीप कुमार हे अदाकारीच्या क्षेत्राततले शेवटचे नाव समजले जायचे. त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला जे काही दिले, त्याचे प्रमाण म्हणजे ही आजची पिढी होय. सिनेमा केवळ तांत्रिक दृष्टीने उजवा असला म्हणजे यश मिळते ही फसवी बाजू होय. गतकाळातले असे अनेक सिनेमे चकचकित होते; पण खिडकीवर सपशेल आदळले. हा इतिहास आहे. सिनेमाची खरी ताकद त्याची कहाणी होय. ज्याला ह्याची  जाण राहिली तो सहृदय सिनेमा निर्मितीत गुंतला म्हणून समजा. राज कपूरने आवारा श्री ४२०  सारखी काळजाला जाऊन भिडणारी कलाकृती बनवली. ती यशस्वी झाली. त्यातले विषय त्यावेळी प्रेक्षकांना आपलेसे वाटले. म्हणूनच राज कपूर हा एकमेव ‘शोमन' हिंदी चित्रपट निर्मिती क्षेत्रात वावरला. जबरदस्त आवारा फेम कलाकार!


दिलकी बात कहे दिलवाली
सीधीसी बात न मिर्ची-मसाला, कहके रहेगा कहनेवाला
कवी शैलेंद्र यांचे किती सहज आणि सोपे शब्द हे, यांस मन्ना डे यांनी स्वर दिला. हे गाणं ऐकण्यापेक्षां स्क्रीनवर पाहण्यात खूप मजा आहे.

मधूमती गतकाळातला (१९५८) सिनेमा होय. बिमल रॉय हे हिंदी चित्रपट क्षेत्रातले जाणकार नाव. त्यांचे अनेक सिनेमे आले. पण त्यांनी निर्माण केलेला मधुमती हा सिनेमा एकदम हटके! त्यावेळीं तो खिडकीवर खूप चालला. त्यांस पुरस्काराने गौरविण्यात आले. पण ह्याचे श्रेय जाते त्या सिनेमाच्या स्क्रिप्टला! रित्विक घटक यांनी लिलिलेल्या कथेवर बेतलेला हा काहीसा सस्पेंस सिनेमा मूळ पुनर्जन्मावर आधारित आहे. अर्थात आजच्या युगात हे सर्व मान्य करण्यास तरुण पिढीला वेळच कुठे आहे? असो. पण दिग्दर्शक म्हणून बिमल रॉय यांनी आपल्या प्रॉडक्शनला नामांकित करण्यांत यश मिळवले. त्यांस अनेक कारणं असतील. मुळात कृष्णधवल सिनेमा असूनही ह्याची फोटोग्राफी अप्रतिम आहे. पहाडी अरण्याची पार्श्वभूमी लाभलेल्या या कथेवर चित्रित करताना  छायाचित्रकाराने आपला तिसरा डोळा योग्य वापरला आहे. पहिली फ्रेम ते शेवटच्या फ्रेममध्ये दिसणारी पीडित नायिका (वैजयंती माला) ही स्क्रीनवर आत्माच तर नसावी? असे अधूनमधून वाटत राहते. गाणी म्हणताना, नायकासमवेत (दिलीप कुमार) व इतर ठिकाणी ‘ती' खरंच मृतात्मा नसेल ना? अशी मनोमनी भीती वाटत राहते. म्हणून हा भयपट आहे असे मुळीच नाही. हा खराखुरा नायिकाप्रधान सिनेमा असूनही इतर पात्रांचे अस्तित्व कायम शाबूत राहतं. सिनेमा १७ रीळांचा आहे, याला त्यावेळचे सिने संकलक (एडिटर) ऋषिकेश मुखर्जी हे तज्ञ जबाबदार होत. कात्रीचा योग्य तो उपयोग करण्यांत  त्यांना बिमल रॉय यांनी कुठेच अडविले नाही. तोच प्रकार संगीत क्षेत्रात घडला.

जुलमी संग आंख लडी
मैं तो कबसे खडी इस पार
दय्या रे दय्या डस गयो बिछुवा
दिल तडप तडप के
सुहाना सफर और ये मोसम
घडी घडी मेरा दिल
टूटे हुए खाबोने
कवी शैलेंद्रजी यांनी लिहिलेली अर्थपूर्ण गाणी ज्यास संगीतमय करण्यांत पूर्ण यशस्वी ठरलेले संगीतकार सलील चोधरी यांना आपली कला सादर करण्याचे स्वातंत्र्य बिमल रॉय यांनी दिले. म्हणून मधुमती सिनेमा हा संगीतमय कलाकृतीचा अस्सल नमुना ठरला. विविध सार्वजनिक ठिकाणी आजही कार्यक्रमात या सिनेमातील गाण्यांवर नृत्य सादर केली जातात. मुकेश, रफी, मन्ना डे, लता अशी तगडी कलाकार मंडळी त्यावेळी पौर्णिमेच्या चंद्रागत यशस्वितेच्या शिखरावर तळपत होती. सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी अजरामर झाली, आणि सिनेमा हिट करण्यात गीत-संगीत  क्षेत्रातील द्वयीचा सिंहाचा वाटा होय.. तेव्हढंच श्रेय या गायक महामेरुना जाते. हे सर्वज्ञात आहे. मुळात या सिनेमाचे  कथानक असे आहे ज्यामध्ये काम करणाऱ्या संपूर्ण टीमला ह्याचे श्रेय दिले पाहिजे.

मधुमती म्हणजे एक अशी कलाकृती ज्यामध्ये सस्पेंस आहे, फाईट्‌स आहेत, कॉमेडी आहे, संगीत आहे, प्रेम आहे,  नृत्य आहे, कसदार अभिनय आहे....आणि म्हणूनच हा सिनेमा ऑल टाईम हिट सिनेमा होता आहे अन राहणार. तरुणांनी आवर्जून हा हिंदी सिनेमा पहावा, असा आहे.

सिनेमाला यशस्वी करण्यासाठी तगडी स्टार कास्ट करून नाही जमणार. पूर्णपणे काम करण्यांत आलेल्या कथेवर तितकीच तगडी स्क्रिप्ट पाहिजे! तरच सिनेमा मधुमती सारखा अप्रतिम होऊ शकेल. -इक्बाल शर्फ मुकादम, तळोजे, ता.पनवेल. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

लेक वाचवा अभियानाच्या बळकटीकरणाची गरज