लेक वाचवा अभियानाच्या बळकटीकरणाची गरज

 गर्भलिंग चाचणीवर कायद्याने बंदी घातली आहे तरीही ह्या चाचण्या चोरून होतातच हे आजच्या अनुभवांतून स्पष्ट झाले. म्हणून लेक वाचवा अभियान आणखी गतिमान करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आजही गरज आहे. काही सुशिक्षित जोडपे एक मुलगी अपत्यावर थांबतात;  पण काही मात्र वंशाचा दिवा पाहिजे म्हणून कितीतरी निष्पाप मुलींना जन्माआधीच मारतात, हे वास्तव फारच दाहक आहे.

काल परवा दोन दिवस नॅकची टिम महाविद्यालयास भेट देऊन गेल्यामुळे दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात शांतता होती.  प्राचार्यानी सर्व शिक्षकांनी विनंती करूनही दुसऱ्या दिवशी सुट्टी न दिल्याने  मला सकाळी ८ः५० च्या टी.वाय. बी. एस्सी. च्या तासिकेसाठी महाविद्यालयात जावेच लागले. अंगात दोन दिवसाचा थकवा होताच. शिवाय मला वातावरणातील बदलाने घशात खवखव होती.  मुलांनी मात्र आज सुट्टी घ्ोतली होती. मी थोडा वेळ विद्यार्थ्यांची वाट पाहीली पण कोणीही आले नाही. मलाही अचानक अंग गरम वाटू लागले.

थोड्याच वेळात मला चांगलाच ताप भरला होता. लगेच मी घरी आलो व  मिनाक्षीला सोबत घ्ोऊन शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो. दवाखान्यात कोव्हीड-१९ नंतर पहिल्यांदा गेलो होतो.  तेथे डॉक्टर असतील की नसतील हेही माहिती नव्हते.  तेथे गेल्यावर आरोग्य केंद्रात  डॉ. वडजे साहेब होते तेव्हाचे दिवस आठवले. दवाखान्यात अचानक गेले तर, तास-दोन तास रांगेतून जावे लागत होते. तेव्हा नंबर येत असे. म्हणून आम्ही नेहमी  डॉ. वडजे साहेबांना फोन करूनच दवाखान्यात जात  असू.  ते होते तेव्हा हा सरकारी दवाखाना कधी वाटलाच  नाही. त्यांनी दवाखान्याला चांगला कार्पोरेट लुक दिला होता. पण आज तशी शांतता वाटत होती. मीमिनाक्षीला नंबरला बसवून केस पेपर खिडकीजवळ केस पेपर काढण्यासाठी गेलो.  दोन खिडकीच्या मिळून माझ्या पुढे तीन महिला उभ्या होत्या. दोन केस पेपर खिडकीत आणि एक औषध गोळ्या घ्ोण्याच्या खिडकी जवळ उभ्या होत्या. आत डोकावून पाहीले तेव्हा आतही एकच महिला दोन्ही खिडक्यांचे काम सांभाळत असल्याचे दिसले. तेवढ्यात कानावर एक संवाद पडला की, मला नाही माझ्या सासूला हावाय मुलगा.र् qल्दू;मला मोठी मुलगी आहे. आणि आता साडेतीन महिन्याची मी गरोदर आहे. यावेळी मला मुलगा असेल तरच गर्भ वाढवायचा आहे. तेव्हा आतल्या कर्मचारी महिलेचा आवाज ऐकायला आला की साडेतीन महिन्याचा गर्भ असल्याने तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे ती महिला कर्मचारी तिला एकदम सौम्य भाषेत समजून सांगत होती.

याचाच अर्थ ती तिला धीर देत तिच्या बोलण्याचे समर्थन करीत होती. मला  या प्रसंगी शांत ऐकून घ्यावे असे वाटले नाही.  याअशा संवेदनशील विषयावर दोन महिलांच्या बोलण्यात पुरूषांनी बोलायची गरजन सतांना मी बोललो.  या ठिकाणी हा विषय बोलण्याचा नाही. शिवाय आपण सुशिक्षित आहेत तरीही मुलींबाबतीत असा विचार करीत आहेत याचे  मला फार वाईट वाटत आहे. तेव्हा त्या माऊली मला बोलल्या की, मला काहीपण चालणार आहे, माझ्या नवऱ्याला पण काहीच प्रॉब्लेम नाही;  पण सासूबाई बोलत आहेत घरी येतांना नातूच सोबत असायला हवा. तेव्हा मी म्हटले की, हे बरोबर नाही. स्त्री असून स्त्री विषयी आज २१व्या शतकातही घृणा? तुम्ही सासूबाई विरुद्धपोलीस स्टेशन मध्ये तक्रार करा. पण आपण हा गर्भ  वाढवा. हा सल्ला दिला.त्या क्षणीतरी त्यांनी  माझे बोलणे ऐकून घ्ोतले होते. माझ्या बोलण्याला त्यांनीनकार दर्शाविला नाही. शिवाय त्यांना असलेल्या विविध आजाराविषयी त्या बोलत होत्या. हे बोलणे चालू असतांना आतील कर्मचारी महिलेने मला  सर नाव सांगा. म्हणजे त्या महिला औषधे देऊन केस पेपरच्या जागी खिडकीत येऊन  बसल्या होत्या. मी हो म्हटले व नाव, वय इ. सांगून केस पेपर हातात घ्ोतला व मागे वळलो. तेवढ्या वेळात  ती माऊली तिथून निघून गेली होती.

काहीही ओळख नव्हती. तरीही  माझ्या मनात  तिच्या विषयी विचारांचे चक्र सुरू झाले होते. त्याक्षणी वाटले की, आपण संगणकीय युगातील २३ वर्ष पूर्ण केली पण माणसातील मानसिकता मात्र बदलू शकलो नाही. याचे जास्त  दुःख वाटत होते. कोकणातील लोकांमध्ये याची चांगली जागृती झालेली आहे. येथे  हुंडा पद्धत नसल्याने लग्नकार्यात तेवढ्या अडचणी येत नाहीत. यामुळे मुलगा-मुलगी हा भेदभाव जास्त दिसत नाही. परंतु महाराष्ट्र राज्यातील इतर भागात आजही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे म्हणून हट्ट धरला जातो. यातून बऱ्याच वेळा महिलांचा तिच्या इच्छेविरुद्ध  गर्भपात केला जातो. या सर्व घटनांना अद्ययावत तंत्रज्ञान काही अंशी कारणीभूत मानले तरी चालेल. पण हे तंत्रज्ञान विकसित करताना चांगला हेतू होता. गर्भामध्ये काही व्यंग किंवा काही गुंतागुंत आहे का,  हे माहिती व्हावे यासाठी  हे तंत्रज्ञान विकसित केले गेले. पण जास्त पैसे कमावण्यासाठी डॉक्टरांकडून नियमांची पायमल्ली झाली आणि लिंग चाचणी करण्यास सुरुवात झाली. महिला डॉक्टरसुद्धा या  मोहाच्या बळी पडतात

लिंग चाचणीवर कायद्याने बंदी घातली आहे तरी ही ह्या चाचण्या चोरून होतातच हे आजच्या अनुभवांतून स्पष्ट झाले. म्हणून लेक वाचवा अभियान आणखी गतिमान करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आजही गरज आहे. काही सुशिक्षित जोडपे एक मुलगी अपत्यावर थांबतात;  पण काही मात्र वंशाचा दिवा पाहिजे म्हणून कितीतरी निष्पाप मुलींना जन्माआधीच मारतात, हे चित्र फार भयानक आहे. पण यावर प्रभावी अंमल बजावणी केली, तर चांगले परिणाम दिसायला वेळ लागणार नाही.
 -प्रा. डॉ श्रीकृष्ण दिगंबर तुपारे, नागोठणे. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ः मराठी भाषेचे संगोपन करण्याची वेळ