हळदी-कुंकू कार्यक्रमांतील धार्मिकता जोपासा  !

बजेट ठरवून वाण म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये फण्या, प्लास्टिकचे डबे, प्लॅस्टिकच्या डिशेश, स्टीलच्या वाट्या, साबण, साबणघर यांसारख्या असात्त्विक वस्तू असतात. सुवासिनीला हळद कुंकू लावताना आदिशक्ती म्हणून तिचे पूजन केले जाते अशा आदिशक्तीला असात्त्विक वस्तू वाण म्हणून देणे अयोग्य आहे. हळदी कुंकू हा धार्मिक कार्यक्रम असल्याने वाण म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूही सात्विक असायला हव्यात. उदबत्या, उटणे, कापूर, वाती, पोथी, देवतांच्या कथा आदी सात्विक वस्तू भेट म्हणून द्याव्यात. 

हिंदू धर्मातील केवळ एक सण वगळता सर्व सण हे प्राचीन कालगणनेनुसार कोणत्या ना कोणत्या तिथीला येतात. सौर कालगणनेनुसार येणारा  एकमेव हिंदू सण म्हणजे मकर संक्रांत. सूर्य या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. दरवर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला साजरी करण्याचा प्रघात आहे. सुर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी काही वेळा संक्रांत एक दिवस पुढे ढकलली जाते म्हणजे १५ जानेवारीला असते. यंदाची मकर संक्रात सुद्धा १५ जानेवारीला साजरी केली जाणार आहे. एकमेकांमधील हेवेदावे विसरून तिळगुळ खाऊन गोड बोलण्याचा संदेश देणारा हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा सण आहे. संक्रांतीला हिंदू धर्मात देवता मानले जाते. या देवतेने संकरासुर नावाच्या दैत्याला ठार मारले  तो दिवस संक्रांत आणि दुसऱ्या दिवशी किंकरासुराला ठार केले तो दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो.  या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरु होते. उत्तरायणात मृत्यू येणे अधिक चांगले समजले जाते. शरशय्येवर ५८ दिवस पडून असलेल्या पितामह भिष्मांनी सुद्धा उत्तरायण सुरु झाल्यानंतर देहत्याग केला.

          संक्रातीच्या दिवसापासून पुढे रथ सप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकू घालण्याचा प्रघात आहे. एरव्ही एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी न सोडणाऱ्या स्त्रिया शेजार पाजरच्या सुवासिनींना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू कावतात आणि वाण म्हणून एखादी वस्तू देतात. सुवासिनीच्या रूपात साक्षात देवीचे घरी आगमन झाले आहे या भावाने आलेल्या सुवासिनीला हळद कुंकू लावून तिचे पूजन केले जाते. फुल, गजरा किंवा वेणी देऊन तिला नमस्कार केला जातो. तिला वाण दिले जाते. वाण देणे हे त्यागाचे प्रतीक आहे. घरी आलेल्या दुर्गारूपी सुवासिनीच्या पूजनानंतर तिला तन  मन धन समर्पित करत आहोत या भावाने प्रतीकात्मक वस्तू म्हणून वाण दिले जाते. गेल्या काही वर्षांपासून हळदी कुंकूंचे कार्यक्रम सार्वजनिकरीत्याही साजरे केले जाऊ लागले आहेत. हौसिंग सोसायट्या, सार्वजनिक उत्सव मंडळे, महिला बचत गट, मंदिर समित्या, राजकीय पक्ष, संघटना यांच्यावतीने प्रतिवर्षी हळदी कुंकूंचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्ताने काहीना काही वस्तू वाण म्हणून दिली जाते. बजेट ठरवून वाण म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये बऱ्याचदा फण्या, प्लास्टिकचे डबे, प्लॅस्टिकच्या डिशेश, स्टीलच्या वाट्या, चमचे, साबण, साबणघर यांसारख्या असात्त्विक वस्तू दिल्या जातात. सुवासिनीला हळद कुंकू लावताना आदिशक्ती म्हणून तिचे पूजन केले जाते अशा आदिशक्तीला असात्त्विक वस्तू वाण म्हणून देणे अयोग्य आहे. हळदी कुंकू हा धार्मिक कार्यक्रम असल्याने वाण म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूही सात्विक असायला हव्यात. उदबत्या, उटणे, कापूर, वाती, पोथी, देवतांच्या कथा आदी सात्विक वस्तू भेट म्हणून द्याव्यात.

         गेल्या काही वर्षांपासून हळदी कुंकू सारख्या धार्मिक कार्यक्रमाचाही इव्हेन्ट केला जाऊ लागला आहे. राजकीय पुढाऱ्यांकडून आलिशान सभागृह किंवा मोठे मैदान बुक करून महिलांसाठी हळदी कुंकूंचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले आहेत. महिलांना आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमांना चित्रपटांतील आणि मालिकांतील अभिनेत्रींना सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलावले जाते, महिलांच्या मनोरंजनासाठी होम मिनिस्टर' किंवा अन्य विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, नृत्यासाठी वाद्यवृंदाची व्यवस्था करण्यात येते. काही ठिकाणी तर आलेल्या महिलांच्या जेवणाचीही सोय आयोजकांनी केलेली असते. यंदा लोकसभा निवडणूक असल्याने अशा प्रकारचे समारंभ यावर्षी अनेक ठिकाणी पाहायला मिळतील. यानिमित्ताने आयता महिला समूह मिळाल्याने नेत्यांच्या प्रचाररूपी भाषणांचे कार्यक्रमही यानिमित्ताने पार पडतील हे वेगळे सांगायला नको. नवरात्री, दहीहंडी प्रमाणे आता हळदी-कुंकूसारख्या धार्मिक कार्यक्रमांचा इव्हेन्ट होत असलेला पाहून मनाला वेदना होतात. - सौ. मोक्षदा घाणेकर. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

दृश्य विश्वाची आसवती हे असमाधाचे कारण