दृश्य विश्वाची आसवती हे असमाधाचे कारण

श्रीराम

सुख काही कायमस्वरूपी मिळत नाही. बघता बघता सुखाचा काळ संपून जातो आणि दुःख समोर उभे ठाकते.  समाधान नाहीसे होऊन अस्वस्थता, अशांती, क्षुब्धता येते. जीवन हे असेच असते. परिस्थिती सतत बदलत असते. सुखामागून दुःख, दुःखामागून सुख ही साखळी सुरूच राहते. सुखात असताना ते सुख निसटून तर जाणार नाही ना याची चिंता वाटते. दुःखाच्या काळात हे दुःख कधी संपेल, कसे संपेल याची चिंता लागून राहते. एकूणच मनाला समाधान काही लाभत नाही. असमाधानाचे कारण अर्थातच दृश्य विश्वाची आसक्ती हेच आहे.

मना वीट मानू नको बोलण्याचा।
पुढे मागुता राम जोडेल कैचा।
सुखाची घडी लोटता सूख आहे।
पुढे सर्व जाईल काही न राहे  । श्रीराम।

श्रीसमर्थ मनाला भगवंताला धरून राहण्याविषयी पुन्हा पुन्हा सांगत आहेत. जगाचे अशाश्वतपण, जगाचे दुःखदायक असणे,त्यातच गुंतून राहिले तर पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकणे, याविषयी समर्थ पुन्हा पुन्हा बोलत आहेत. या श्लोकात समर्थ म्हणतात, ”हे मना! माझ्या या बोलण्याचा तू कंटाळा मानू नकोस. तुझ्या हितासाठीच मी हे बोलत आहे. दृश्याच्या आसक्तीतून तू बाहेर पडला नाहीस तर रामाची भेट कशी होईल?” अर्थात्‌ मनुष्याला आपल्या मूळ स्वरूपाची ओळख कशी होईल?आत्मज्ञानाचा साक्षात अनुभव कसा येईल? मोक्ष प्राप्ती कशी होईल? मनाला दृश्यात रमण्याची जन्मोजन्मीची सवय आहे. विषयांचा उपभोग घेण्यात मनुष्याला सुख वाटते. जास्तीत जास्त संपत्ती मिळवणे, त्यातून अनेकानेक साधन सुविधा मिळवणे, देह सुखासाठी ती संपत्ती जास्तीत जास्त खर्च करणे, यातच खरे सुख आहे असे त्याला वाटते. ऐषोआरामात राहणे यातच जीवनाची इती कर्तव्यता आहे असे मनुष्य मानतो. त्यासाठीच जीवनभर दिवस-रात्र धडपड करीत राहतो. पण सुख काही कायमस्वरूपी मिळत नाही. बघता बघता सुखाचा काळ संपून जातो आणि दुःख समोर उभे ठाकते. अनुकूलता संपून प्रतिकुलता येते. समाधान नाहीसे होऊन अस्वस्थता, अशांती, क्षुब्धता येते. जीवन हे असेच असते. परिस्थिती सतत बदलत असते. सुखामागून दुःख, दुःखामागून सुख ही साखळी सुरूच राहते.

 सुखात असताना ते सुख निसटून तर जाणार नाही ना याची चिंता वाटते. दुःखाच्या काळात हे दुःख कधी संपेल, कसे संपेल याची चिंता लागून राहते. एकूणच मनाला समाधान काही लाभत नाही. असमाधानाचे कारण अर्थातच दृश्य विश्वाची आसक्ती हेच आहे. जे विश्व स्वतःच नाशवंत आहे, अशाश्वत आहे, ते शाश्वत सुख-समाधान कसे देऊ शकेल? त्यासाठी शाश्वताचाच आधार घ्यायला हवा. आणि शाश्वत, नित्य असा एक भगवंतच आहे. पण तोदिसत नाही. म्हणून मनुष्य सहजी त्याचा आधार घेत नाही. तो जे सहज दिसते त्या जगातील वस्तूंचा, व्यक्तींचा आधार घ्यायला बघतो. म्हणूनच पुन्हा पुन्हा त्याला सांगावे लागते की खरा आनंद त्या न दिसणाऱ्या पण नित्य असणाऱ्या आणि अत्यंत जवळ असणाऱ्या परमात्म्यातच आहे. तो आनंदस्वरूप भगवंत तुझ्या अगदी निकट आहे आणि सदासर्वदा तो सोबत आहे.त्याचा शोध घे. चांगली सवय लावण्यासाठी, चुकीची सवय घालवण्यासाठी लहान मुलाला जसे वरचेवर, परत परत तेच तेच सांगावे लागते. तसेच नाठाळ मनाला दृश्याची आसक्ती सोड, भगवंताशी स्वतःला जोड, असे परत परत वरचेवर सांगावे लागते. लहान मुलांना जसा आईच्या त्याच त्याच सूचनांचा कंटाळा येतो तसाच मनाला कल्याणकारक उपदेशाचा कंटाळा येतो. जगात रमण्यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत. पण भगवंतप्राप्तीच्या साधनेत शरीराला आणि मनाला कष्ट होतात. हा कष्टाचा मार्ग अवलंबण्यासाठीचा उपदेश मनाला रुचत नाही. पण संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठीच अवतरलेले संत सद्गुरु उपदेश करतच राहतात.

समर्थ माऊली अगदी प्रेमाने मनाला सांगत आहेत की या हितकार उपदेशाचा कंटाळा मानू नकोस. अरे, या जगातील सर्व वस्तूंचा नाश होणारच आहे. व्यक्तींचा नाश होणारच आहे. भोवतालच्या परिस्थितीचाही नाश होणार आहे. आता आहे त्यातील काहीच नंतर शिल्लक असणार नाही. तुझ्या प्रिय अशा देहाचाही नाश होणार आहे. हा दुर्लभ नरदेह परत कधी मिळेल याची शाश्वती नाही. मोक्ष प्राप्तीची संधी पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही. म्हणून लवकरात लवकर त्या रामाची भेट घे. शरीर स्वास्थ्यासाठी जसे रोज रोज पौष्टिक अन्न खाणे आवश्यक असते तसेच मनाला रोज रोज हितकारक उपदेश करणे आवश्यक असते. औषध कितीही कडू असले तरी रोगाचा नाश होऊनआरोग्यप्राप्तीसाठी ते घ्यावेच लागते तसेच भवरोगातून सुटण्यासाठी अध्यात्म श्रवण करावेच लागते. बरे होईपर्यंत औषध घ्यावेच लागते. व्यथा असून जो औषध घेत नाही तो एक मूर्ख असे समर्थ म्हणतात. जोपर्यंत मनातील वासनांचा लय होत नाही, बर्हिमुख असलेले मन अंतर्मुख होऊन भगवंताशी एकाग्र होत नाही, तोपर्यंत पुन्हा पुन्हा अध्यात्म श्रवण केल्याशिवाय उपाय नाही. बघता बघता देहाचा एक एक अवयव क्षीण होत जातो. आयुष्य संपत जाते. म्हणून मनुष्याने लवकरात लवकर जागे होऊन आपल्या हिताचा विचार करायला हवा हीच समर्थांची तळमळ आहे. आपणही शहाण्या मुलांसारखे सद्गुरु माऊलींचे ऐकायला हवे. आत्मकल्याण साधायला हवे. जय जय रघुवीर समर्थ. -आसावरी भोईर. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

स्क्रिप्ट आणि मधुमती