मुशाफिरी

अप्रसिध्दांप्रति संवेदना, सहवेदना कधी जाग्या होणार?

 सुप्रसिध्द, कर्तृत्ववान, गाजलेल्या लोकांच्या निधनानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया, शोकसंदेश विविध प्रसारमाध्यमांतून प्रसिध्द केले जात असतात. त्या व्यक्तीचा सहवास, वर्तन, दातृत्व हे सारे त्यातून मांडले जात असते. त्यांचे काम नवकीच काबिलेतारीफ असणार! पण अनेक अज्ञात, अपरिचित, बिनचेहऱ्याच्या, अजिबातच कसलीही प्रतिष्ठा-नावलौकिक न लाभलेल्या व्यक्तीही देशासाठी, समाजासाठी मनापासून तितकेच योगदान देत असतात. त्यांच्यापैकी कुणाचा अपघाती, आकस्मिक मृत्यु झाल्यास त्याची दखल मोजकेच लोक घेतात. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाचे कसे चालले असेल, शिक्षण घेत असणाऱ्या मुलांवर काय प्रसंग गुदरला असेल याबद्दल जाणून घेण्यास कुणालाही वेळ नसतो. त्यासाठी वर्तमानपत्रांना आवाहन करावे लागते.

   नुकताच कुठे २०२४ या इंग्रजी वर्षाला सुरुवात झाली आहे.  प्रत्येक दिवस तसा नवनवी आव्हाने घेऊनच येत असतो. शहरी लोकांना नववर्ष पार्टी, सरत्या वर्षाला निरोप, हॉटेले, फार्म हाऊसेस, रिसॉट्‌र्स, अम्युझमेन्ट पावर्स यांचे आकर्षण! पण अशा ठिकाणी काम करणाऱ्यांचे नव वर्ष कसे साजरे होत असेल? खोपोलीजवळ ॲडलॅब्ज इमाजिका हे अम्युझमेन्ट पार्क आहे, त्याआधी कित्येक वर्षे मुंबईत एस्सेलवर्ल्ड, ठाण्यात टिकूजीनी वाडी, अंबरनाथ जवळ आनंद सागर ही आणि अशी ठिकठिकाणी वेगवेगळ्या शहरात, गावांजवळ चार घटका सशुल्क करमणुकीची सोय करुन देणारी मनोरंजन केंद्रे उभारण्यात आली आहेत. अर्थात ती अनेकदा बिगरमराठी लोकांची, परप्रांतीयांचीच असतात. तेथे जाऊन मौजमस्ती करणारे लोक मात्र मराठी..त्यातही नवश्रीमंत गटातले सर्वाधिक पाहायला मिळत आहेत. तेथे काम करणारे बहुतांश कर्मचारी हे स्थानिक मराठीजन आहेत. तेथे जेवणासाठी मिळणाऱ्या तांदळाच्या भाकरी, कॅन्टीन-उपहारगृहासाठी गरजेच्या अन्य बाबी, दळणवळणाची साधने हे पुरवणारे स्थानिक मराठीजनच असल्याचे दिसून येते. पण हे मराठी, स्थानिक भूमिपुत्र अशा केंद्रांचे मालक कधी होणार?

   तर ते असो. अनेक वर्षे सोबत काम केलेले, शाळेत-महाविद्यालयात सहपाठी असलेले, एकाच क्षेत्रात असल्याने जवळचे-आयुष्याचा एक भागच बनून गेलेले कित्येक जण आपली साथ करत असतात. यात नातेवाईक, शेजारपाजारचे लोकही आलेच. निसर्ग नियमानुसार जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडुन जायचे आहेच. पण जाताना इथे कमावलेले, जमवलेले सारे इथेच सोडुन जायचे आहे. शेवटी शिल्लक राहते काय? तर त्या व्यवतीने केलेले सत्कर्म, इतरांप्रतिची त्याची बांधिलकी, त्याने जोडलेली माणसे! या जगाचा निरोप घेऊन जाणारी व्यक्ती संशयास्पद चारित्र्याची, भ्रष्ट, जुगारी, लंपट, कर्जबाजारी, व्यसनाधीनमुळे कुटुंबासाठी लज्जा उत्पन्न करणारी असेल तर अशा व्यवतींना हे जग, कुटुंबीय, जवळचे-लांबचे लोक लवकरच विस्मृतीच्या गर्तेत ढकलायला मागेपुढे पाहात नाहीत. वाईट, खलप्रवृत्तीच्या  लोकांच्या आठवणी काढत बसायला इथे कुणाजवळही वेळ नाही. मी नेहमी पाहतो की वलयांकित, सुप्रसिध्द, गाजलेल्या लोकांच्या निधनानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया, शोकसंदेश विविध प्रसारमाध्यमांतून प्रसिध्द केले जात असतात. त्या व्यवतीचा सहवास, स्वभाव, वर्तन, दातृत्व, इतरांसाठी काही करण्याची धडपड हे सारे त्यातून मांडले जात असते. त्यांचे काम तसे काबिलेतारीफ असणार हे निःसंशय. पण मला नेहमी प्रश्न पडतो की मग अशी कोणतीच प्रसिध्दी न मिळालेले, सार्वजनिक व्यवितमत्व नसलेले, आपल्या कामाचा डंका, ढोल न वाजवणारे लोकही आपल्या समाजात कमी नाहीत. ते मुकाटपणे आपले विहीत कर्म करीत असतात. इतरांच्या, समाजाच्या उपयोगी पडत असतात, मग समाज त्यांची दखल घेवो..न घेवो. एखाद्या व्रतस्थाप्रमाणे त्यांचे कार्य सुरुच असते.  विनाअपघात प्रदीर्घ सेवा बजावणारा बेस्टचा अथवा एस टी बसचा साधा ड्रायव्हर घ्या किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांचे अथवा आपल्या नेहमीच्या उपनगरी लोकल गाड्यांचे मोटरमन घ्या...विविध हवाई सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे वैमानिक घ्या. त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्यांनी आपल्यासारख्या हजारो-लाखो प्रवाशांना नित्यनेमाने सुखरुप, सुरक्षित प्रवास घडवला. कल्पना करा.. त्यांच्यापैकी कुणाला कर्तव्य बजावताना डुलकी लागली असती? वाहन चालवताना मोबाईलवर ते पोर्नोग्राफी बघत राहिले असते किंवा दारु पिऊन ते हातातील वाहन चालवत असते तर तुम्हा आम्हाला आजचे हे दिवस पाहायला मिळाले असते काय? आपण सारे निर्धास्तपणे व एका अलिखित विश्वासार्हतेने आपापले जीव त्यांच्या हाती सोपवून बिनधास्त अशा प्रवासाला नित्यनेमाने सुरुवात करुन गंतव्य स्थानी सुखरुप पोहचत असतो. असे लोकही सेवानिवृत्त होतात... निसर्गनियमानुसार आयुष्याचा प्रवास संपला की देवाघरी जातात. या अज्ञात, अपरिचित, बिनचेहऱ्याच्या अनेकांच्या मृत्युनंतर आपण कितीजण श्रध्दांजली वाहतो? कितीजण त्यांच्या आठवणी काढतो? त्यांच्या निधनानंतर किती लोक प्रतिक्रिया, शोकसंदेशातून व्यक्त होतात? जवळपास कुणीही नाही. कारण ते कथित प्रतिष्ठीत, वलयांकित, सेलिब्रिटी वगैरे नसतात ना!  

   उद्याच्या वातावरणाची, पावसाची, वाऱ्याची, दुष्काळाची, पूराची, वादळाची कसलीच शाश्वती नसतानाही आपला शेतकरी शेतात राबतो, धान्य पिकवतो व ते तसे भरले शेत ठेवून आपल्या घरी झोपायला जातो. तुम्ही बँकेत जा. दोन रुपयाचे पेनही तिथे दोरीला बांधून ठेवलेले असते. कॅशियर केबिनमध्ये बसलेला असतो व समोरच्या काचेतून त्याचे मुंडकेच केवळ दिसत असते. सीसीटीव्ही कॅेमेरे सर्वत्र लावलेले असतात. बंदुकधारी शिपाई सुरक्षेसाठी तैनात असतो. काही अघटित घडले तर लगेच सायरन वाजवून सगळ्यांना दक्ष करण्याची यंत्रणाही तिथे सज्ज असते. साध्या, एकर-दीड एकर जमिनीवर शेती कसणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात पिकणाऱ्या पिकाच्या रक्षणासाठी यातले काय बरे असते? असा बिनचेहऱ्याचा आपला अन्नदाता मरण पावला तर त्याच्या निधनानंतर कुणाकुणाच्या प्रतिक्रिया, शोकसंदेश छापून येतात? कोणकोण त्याच्या निधनाने व्यथित होतात?

   गेली अनेक वर्षे मी बघत आलो आहे की वलयांकित चित्रपट तारे/तारका, राजकारणी नेते मंडळी यांच्या मृत्युनंतर त्यांचे सहकलाकार, अनुयायी, चाहते, विरोधक या साऱ्यांना दृकश्राव्य व छापील प्रसारमाध्यमे बोलते करतात. त्यांच्या व्याकूळ, शोकाकुल प्रतिक्रिया, शोकसंदेशाच्या वलीप्स, रील्स, चौकटी माध्यमांतून झळकतात. राजेश खन्ना गेला तर त्याची सुपरहिट सहकलाकार मुमताझ हिला काय वाटले, देवआनंद गेला.. त्याच्या सोबत अनेक चित्रपटांतून भूमिका केलेल्या वहिदा रेहमान याबाबत काय बोलते याची उत्सुकता अनेकांना असते. दिलीपकुमारच्या मृत्युपश्चात त्याची पत्नी सायराबानो हिचे काय, कसे चालले आहे याबद्दल रकानेच्या रकाने भरुन वर्णने फिल्मी वार्तांकने लिहीणाऱ्यांनी लिहीली आहेत व लोकांनी ती वाचलीी आहेत; पण याच चित्रपटसृष्टीत या तारे/तारकांना यशाच्या शिखरावर पोहचवताना प्रसंगी आपला जीव धोकयात घालण्यातच हयात गेलेला एखादा स्टंटमन, डमी, मेकप आर्टिस्ट, कॅमेरामन, या बड्या तारांगणाच्या चविष्ट जेवणाची सोय करणारे आचारी, त्यांना एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ने-आण करणारे विविध वाहनांचे चालक अशा अनेक अज्ञात, अपरिचित, बिनचेहऱ्याच्या, अजिबातच कसलीही प्रतिष्ठा-नावलौकिक न लाभलेल्या व्यवतीही मनापासून तितकेच योगदान देत असतात. मात्र त्यांच्यापैकी कुणाचा मृत्यु झाल्यास त्याची दखल मात्र मोजकेच लोक घेतात. त्यांच्यापैकी कुणाचा अपघाती, आकस्मिक मृत्यु झाल्यास त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाचे कसे चालले असेल, शिक्षण घेत असणाऱ्या मुलांवर काय प्रसंग गुदरला असेल याबद्दल जाणून घेण्यास कुणालाही वेळ नसतो.  

   तुमचे आमचे जीवन सुरक्षित, स्वच्छ, नीटनेटके जावे म्हणून विविध महापालिका, नगरपालिकांच्या सफाई विभागात अनेक सफाई कामगार सेवा बजावत असतात. त्यांच्यापैकी अनेकांना घाणीत उतरुन गटारे साफ करावी लागतात. आख्ख्या शहराचे मलमूत्र, सांडपाणी जेथून वाहते त्या मोठमोठाल्या गटारांत उतरुन हे लोक तुंबलेली घाण उपसतात. त्यांनी ते तसे केले नाही तर तुमचे आमचे आरोग्य धोवयात येणार हे निश्चित! गटारात, चेंबरमध्ये हे लोक उतरल्यावर तेथील निर्मित विषारी गॅस यांच्या नाकातोंडात जाऊन यांच्यापैकी काहीजणांचा मृत्यु झाल्याच्या बातम्या आपण वाचतो व काही वेळातच विसरतो. कारण हे सगळेच बिनचेहऱ्याचे, बिनप्रतिष्ठेचे, अप्रसिध्द लोक! कमी शिकल्यामुळे असली कामे करणारे! ते जगले काय मेले काय, कुणाला फरक पडतो? श्रध्दांजली, त्यांच्या परिवाराची विचारपूस, त्यांच्या घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर  द्यायची आर्थिक मदत, सरकार-महापालिकेकडे काही पाठपुरावा करणे वगैरे तर फारच दूरच्या गोष्टी झाल्या.

   जे चमकते, प्रसिध्द, नामांकित असते, कर्तृत्ववान वगैरे असल्याचे भासवले जाते किंवा कधी कधी तसे असतेही..त्याच्याच मागे धावणारे आपण सारे! या कमी महत्वाच्या, अप्रसिध्द, मेहनती, कष्टाळू, अदखलपात्र लोकांबद्दल संवेदनशीलता बाळगायला कधी शिकणार आहोत? त्यांच्या दुःखांप्रति सहवेदना आपल्या मनात कधी उमटणार आहे?

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर.

 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

दि. बा. पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने..