दि. बा. पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने..

शासननिर्मित नवी मुंबईतील, राज्यातील व देशातील मूलनिवासी आणि निवासी नागरिकांचे मूलभूत हक्क आरक्षित आणि सुरक्षित ठेवण्यासाठी दि.बां.नी केलेल्या संघर्षांचे फलित काय? त्यावेळी केलेल्या संघर्षांचे तत्कालीन व वर्तमानकाळात भूमिपुत्रांना मिळालेला न्याय याकडे थोडा प्रकाश टाकणे आत्यंतिक गरजेचे वाटते. याबाबतचे मुद्देनिहाय विश्लेषण..

देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि त्यानंतरच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा काळ याचा अंदाज घेतला असता असे लक्षात येते कि, तत्कालीन राज्यातील जनतेची शैक्षणिक, आर्थिक, बौद्धिक, वैज्ञानिक कुवत काय असावी? देश आणि राज्य विकसनशिलतेच्या मानसिकतेतून मार्गक्रमण करीत होता. उद्योग आणि विज्ञानाकडे चला अशी म्हणणारी तेव्हाची राजवट असाक्षरतेच्या अधिक प्रमाणामुळे कळत न कळत  जुलमी ठरत असावी. लोकशाहीची सुरुवात करणाऱ्या आपल्या देशातील व पर्यायाने महाराष्ट्रातील त्या काळातील तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षणाची प्रचंड आवड असलेला एक युवक आपल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षण मायभूमीत आणि उच्च माध्यमिक शिक्षणाकरता पुणे येथे जातो अन वकील होतो काय, ही गोष्ट त्याकाळात सर्वसामान्य नव्हती तर ती अपेक्षेपलीकडची होती.

नंतर दि.बां. ना वकील व्यवसाय यातून मिळत असलेली आर्थिक उन्नती, विधीज्ञ म्हणुन मिळत असलेली प्रसिद्धी या सर्वांचा त्याग करून वकिलीच्या माध्यमातून त्यांच्याकडे अशील म्हणुन आलेल्या वर्गासाठी बाजू मांडताना आपसूकच संघर्षांची ठिणगी दि. बां.च्या मनात पेटून, पुढे ते लोकाग्रहावरून राजकारणात आले. त्यातून विविध विधिमंडळ व संसदीय पदावर केलेले कार्य समर्पित आहे. पण...दि.बा.हे लक्षात राहतील ते त्यांच्या संघर्षमय चळवळीतून भूमिपुत्रांना मिळवून दिलेल्या न्यायिक हक्कांमुळेच. सन १९७० नंतर राज्य सरकारने कंपनी ॲक्ट अंतर्गत सिडको नावाची ऑथॉरिटी निर्माण करून वाढीव लोकसंख्येचे विकेंद्रिकरण व्हावे म्हणून मुंबईला पर्यायी शहर नवी मुंबई निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील ठाणे, पनवेल व उरण या तीन तालुक्यातील ९५ गावांतील जमीनी संपादित करण्याचा सपाटा लावला. त्या वेळेच्या भौगोलिक परिस्थिती नुसार या ९५ गावातील बहुतांश गावकरी हे भातशेती, मत्स्य व्यवसाय व मिठागरे यांच्यावर अवलंबून होते. मात्र शहर वसविण्याच्या शासनाच्या स्वप्नापोटी वरील तिन्ही प्रकारचे उत्पन्नाचे स्त्रोत नामशेष होत चालल्याने येथील भूमिपुत्रांमध्ये कमालीचा क्षोभ निर्माण होत होता. पुढे जबरदस्तीने अल्प मोबदला देऊन गावांचे विस्थापिकरण करण्याचा घाट तयार होताच, त्यातून उपासमारीची वेळ जवळ येत असल्याने भूमिपुत्रांमध्ये तत्कालिन धुमसत वातावरण होते. दुसऱ्या बाजूला शासकीय बळ आणि पोलीस खाक्याच्या बळावर शहर निर्मितीची प्रक्रिया ही रुंदावत होती.

अशा वेळी चाललेल्या शोषित पीडित भूमिपुत्र शेतकऱ्यांचे नेतृत्व हे एखाद्या तळपत्या क्रांती सूर्याने करावे अशी परिस्थिती ओढवली होती. अभ्यासू, करारी बाण्याचे व उच्चशिक्षित दि बा. पाटील यांच्याकडे भूमिपुत्रांच्या न्याय व हक्कासाठी लढण्याशिवाय पर्याय शिल्लक नव्हता. एकीकडे शहरीकरण आणि दुसरीकडे औद्योगिकरण होत होते. त्यातून १९८१ चे उरणमध्ये दि.बां.चे रक्तबंबाळ आंदोलन, पुढे १९८४ चे ऐतिहासिक रक्तरंजित हौतात्मिक आंदोलन व पुढील काळात सालानूरुप विविध संघर्षरुपी आंदोलने शासन व्यवस्थेविरोधात होत होती. त्यांमध्ये दि.बा.अग्रणी होते. ज्यामुळे या बाधित क्षेत्रातील प्रकल्पबाधित व राज्यातील भूमिपुत्र दि.बां.च्या पाठीशी वज्रमूठ आवळून एकरूप होता. तत्कालीन राज्याच्या राजकारणातील प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रबळ नेत्यांच्या फळीत दि.बा.यांचे स्थान निर्माण झाले होते. आक्रमकता, अभ्यासू वृत्ती अंगी असल्यामुळे जनतेच्या मनातील प्रश्नांवर प्रहार करीत दि.बा. राज्य अणि देशपातळीवर सर्वपरिचित झाले होते. अशा उच्चविद्याभूषित कणखर नेतृत्वापुढे तेव्हाचे शासन व सरकार व्यवस्था नमते घेण्यास भाग पडत होती. देशाच्या संसदीय कायदे मंडळ सभागृहात प्रासंगिक स्वरुपात अनेकदा दि.बा.प्रबळ निर्धाराने लढत होते, त्याचे पर्यवसान अनेक कायद्यात करण्यास शासनाला भाग पाडणारे दि.बा. हे देशातील प्रत्येक भूमिपुत्रांचे अध्वर्यू झाले होते व आजतागायत आहेत. कारण संघर्षासाठी अविरत चळवळीची दिक्षा अनेक लढावू लोकसैनिकांना दि बां.नी दिली आहे.

दि बा.यांनी आपल्या संघर्षातून काय दिले.. हे अधोरेखित करण्यासारखे आहे. जसे जमिनीच्या बदल्यात विकसित जमीन देण्याचा न्यायिक निर्णय, ज्यातून साडेबारा टक्के आणि साडेबावीस टक्के भूखंड ते देखील विकसित नोड्‌समध्येच देण्याच्या निर्णयाचा जन्म झाला. देशातील कुठल्याही प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनाच्या वेळी बाजारमुल्यानुसार भरपाई मिळण्याचे श्रेय हे दि.बा. यांचेच. प्रकल्पबाधित भूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, व्यवसायासाठी प्रशिक्षण व प्रकल्पात व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण हीदेखील दि.बा.यांच्या लढ्यांची फलश्रुती. दि.बां.च्या दूरदृष्टीमुळे विविध प्रकल्पात बाधित होणाऱ्या भूमिपुत्रांच्या भविष्यातील कुटुंबवाढीच्या अनुषंगाने त्यावेळेस सिडको बाधित, जेएनपीटी बाधित, एमआयडीसी बाधित शेतकऱ्यांसाठी जमीन परतावा देण्याचा निर्णय हा खऱ्या अर्थाने महामेरू ठरला. यातून मिळालेल्या साडेबारा टक्के जमिनीवर नवी मुंबईची ३० %  लोकसंख्या राहत आहे. साडेबारा टक्केच्या भूखंडावर आज जे नागरिक राहत आहेत. ते अल्प उत्पन्न व मध्यमवर्गीय गटातील आहेत. साहजिकच साडेबारा टक्के असोत किंंवा विद्यमान २२.५ % पात्रतेचे शेतकऱ्याला मिळालेले भूखंड असोत, या भूखंडावर उभ्या राहिलेल्या इमारतीमध्ये परवडतील अशा दरात घरं घेऊन उदरनिर्वाह निमित्ताने देशभरातून आलेले निवासी भूमिपुत्र आपल्या कुटुंब कबिल्यासह राहत आहे हेदेखील दि.बा.यांनी संघर्षातून अंमलात आणलेल्या धोरणामुळेच.

 साडेबारा टक्के आणि साडे बावीस टक्के भूखंडांच्या विकास प्रक्रियेत कमी प्रमाणात आर्थिक पत असलेल्या लहान-सहान उद्योजकांना विकासक होण्याची संधी प्राप्त झाली व पुढे त्यांना प्रतिथयश प्राप्त झाले हे येथील विकासक आदराने सांगतात. ठाणे बेलापूर व तळोजा एमआयडीसी, ओएनजीसी, पातळगंगा, जेएसडब्लू, रिलायन्स अशा कितीतरी शासकीय व खाजगी प्रकल्पांविरोधात प्रकल्पबाधितांना उचित न्याय मिळवून देण्यासाठी दि.बां.नी शेकडोंच्या संख्येने आंदोलने केली आहेत. दि.बा. पाटील यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नजरेतून अभिप्रेत असलेल्या रयतेच्या कल्याणकारी कार्यपद्धतीचा पगडा व शाहू, फुले आणि आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचे अवलंबन हे दिबांच्या प्रत्यक्ष कृतीत होते. त्यामुळेच दि.बां नी शिक्षण क्षेत्र, कामगार क्षेत्र, प्रशासकीय कामकाज असो अथवा विविध बाधितांसाठीच्या न्याय हक्कांच्या संघर्षात सर्व धर्म समभावाचे कायम जतन केले. याचे प्रतिबिंब असे दिसले की, निर्माण होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीपोटी नवी मुंबई शहरातील मूळ निवासी व देशातून आलेला सर्वधर्मिय निवासी हे लाखोंच्या संख्येने शांततेने रस्त्यावर उतरले. आपल्या एकंदरीत सामाजिक व राजकीय काळात (हयातीत ) सातत्याने संघर्षांचे रणशिंग फुंकलेल्या दि.बांच्या नावासाठी देशातील एकवटलेल्या भूमिपुत्रांना संघर्ष करावा लागतोय याला काय म्हणावे?
असो, आशा आहे की, राज्य व केंद्र शासन झालेल्या लोक चळवळीची दखल घेतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नामकरणाने अन्यायाविरोधात देशातील कुठल्याही भूभागावर होणाऱ्या शोषित वंचित भूमिपुत्रांच्या चळवळीची मशाल चिरंतर प्रज्वलीत राहून प्रेरणा देईल; ज्यायोगे देशातील भूमिपुत्रांची चळवळ म्हणजे दि.बा. आहेत हे सत्य स्मरणात राहील. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यासंगी व्यक्तिमत्वाना संयोजक म्हणून सोबत घेऊन नियोजन करून दि.बां पाटील साहेबांच्या संघर्षमय लढायांची चळवळरुपी यशोगाथा व त्यांचे विविधरूपी कार्याचे संकलन व्हावे व दि बांबद्दलची माहिती जगभरात जावी यासाठी दि बा - चळवळ स्पर्धा या अनोख्या शीर्षकाखाली उपक्रम राबविला जात आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी दिलेल्या २१ विषयांच्या अनुषंगाने दि.बां.विषयीची आपली कला शोध, बोध व संकलन करुनच चित्र, आर्टिकल, स्फूर्तीगीत, लघुपट, तत्कालीन फोटोज, छायाचित्रफिती, दि.बा.लिखित पत्र, तत्कालीन वृतपत्र कात्रणे अशा स्वरुपात सादर  करावयाची होती. या स्पर्धेचे प्रथम व द्वितीय चरण पार पडलेले आहे. दि बा.पाटील साहेबांच्या संघर्ष जीवनातून बाधित पीडित यांच्यासाठी अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा केवळ चळवळ जिवंत ठेऊ शकते...जी अविरत सूरू राहिली पाहिजे.  -दि. बा. विचार समर्थक, प्रथम आंदोलक -विमानतळ नामकरण चळवळ. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

हळदी-कुंकू कार्यक्रमांतील धार्मिकता जोपासा  !