संत गाडगे महाराज

 कर्मयोगी संत गाडगे महाराज

महाराष्ट्रातील थोर संत, किर्तनकार, समाजसुधारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक, स्वच्छतेचे पुढारक संत गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी. संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाची त्यांनी सतत टिंगल केली. धर्म आणि विज्ञानाची सांगड घालणारे संत हेच खरे समाजसुधारक होत.

गाडगे महाराजांचा जन्म  २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची मोठी शेती होती. त्यांनाही शेतीची आवड होती विशेषतः गुरांची निगराणी करण्यास त्यांना खूप आवडे. १८९२ साली गाडगे महाराजांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारशाला त्यांनी गावकऱ्यांना गोडधोडाचे जेवण दिले. त्याकाळच्या परंपरेला हा छेद होता. कारण त्याकाळी कोणत्याही कार्यक्रमात गावकऱ्यांना दारू आणि मटण दिले जात, ही परंपरा त्यांनी मोडून काढली.

लहानपणापासून अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा, कर्मठ रूढी परंपरा, कर्मकांड यावर गाडगे महाराजांनी कठोर प्रहार केले. १ फेब्रुवारी १९०५ रोजी त्यांनी घरदाराचा त्याग करुन संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन स्वीकारले. अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडला असल्यास  त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता ठेवता ते आपल्या वाटेने निघून जायचे. ते सतत एक खराटे जवळ बाळगत. अंगावर गोधडीवजा फाटके तुटके कपडे आणि एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणत. ते ज्या गावात जात ते गाव खराट्याने स्वछ करीत. सार्वजनिक स्वछता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अरिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले.


विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरुन त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली त्यासाठी ते गोवोगावी जाऊन कीर्तने केली. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करुन देत. आपल्या कीर्तनातून ते लोकांना चोरी करू नका, ऋण काढून सण साजरे करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका,  व्यसनांच्या आहारी जाऊ नका, नवस करू नका, प्राण्यांची हत्या करू नका, मुक्या प्राण्यांवर दया करा, जातीभेद, अस्पृश्यता पाळू नका, मुलांना शाळेत पाठवा, आजारी माणसांना भगत, देवरूषी यांच्याकडे न नेता डॉक्टरांकडे न्या, आपले घर-गाव स्वच्छ ठेवा असे उपदेश ते करत. देव दगडात नसून माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवले. आपले विचार भोळ्या भाबड्या लोकांना समजण्यासाठी ते वैदर्भीय ग्रामीण बोली भाषेचा उपयोग करीत. लक्षावधी रुपये खर्च करुन त्यांनी नाशिक, आळंदी, देहू, पंढरपूर या धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा, गोशाळा, पाठशाळा, घाट, पाणपोया बांधल्या. गोरगरीब जनतेसाठी छोटीमोठी रुग्णालये बांधली, अतिशय गरीब, अनाथ व अपंग मुलांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांचीही त्यांनी सेवा केली. संत गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले संत होते. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाची त्यांनी सतत टिंगल केली. धर्म आणि विज्ञानाची सांगड घालणारे संत हेच खरे समाजसुधारक होत. अध्यात्माला विज्ञानाच्या परिसावर घासण्याचा हितोपदेश गाडगे महाराजांनी केला. असे हे साधे सरळ व संत परंपरेतील एक महान संत कर्मयोगी संत गाडगे  महाराजांनी २० डिसेंबर १९५६ रोजी विदर्भाच्या भूमीत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या ६७ वी   पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
-श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

अपरिचित शिवराय