दहशतवाद कसा संपवावा याचे सर्वोत्तम उदाहरण : अफजलखान वध

दहशतवाद कसा संपवावा याचे सर्वोत्तम उदाहरण : अफजलखान वध

आजपासून ३६४ वर्षांपूर्वी अशाच प्रकारचे एक दहशतवादी आक्रमण स्वराज्यावर चालून आले होते ज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अचाट बुद्धिमत्तेने, अफाट शौर्याने आणि अतुलनीय युद्धकौशल्याने पुरता बिमोड केला. महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेलेल्या या प्रसंगातून बलाढ्य दहशतवादाचा सामना कसा करावा आणि शत्रूला नामोहरम करून चारीमुंड्या चित कसे करावे, याचा परिपाठचा महाराजांनी जगाला घालून दिला आहे. मार्गशीर्ष शुक्ल सप्तमीला म्हणजेच १९ डिसेंबरला या भीमपराक्रमाला ३६४ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या प्रसंगाची उजळणी करूया.    

संसदेचे अधिवेशन सुरु असताना काही तरुणांनी सभागृहात घुसून स्मोक कॅनच्या साहाय्याने धूर पसरवला. २२ वर्षांपूर्वी ज्या दिवशी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता त्याच दिवशी ही घुसखोरी झाल्याने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वाढत्या बेरोजगारीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा स्टंट करण्यात आल्याचे या स्टंटबाजांकडून सांगण्यात आले आहे, तर हा अर्बन नक्षलवाद्यांचा सुनियोजित कट असल्याचा आरोप काही संघटनांकडून करण्यात येत आहे. सत्य काय ते कालांतराने उघड होईलच; मात्र यानिमित्ताने देशाच्या सुरक्षेवरही विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे . आजतागायत देशभरात ज्या दिवशी ज्या ठिकाणी  दहशतवादी  हल्ले झाले आहेत दरवर्षी त्या दिवशी त्या ठिकाणी विशेष अलर्ट जारी करण्यात येतो. संसदेच्या बाबतीत अशी कोणतीच विशेष खबरदारी का घेतली गेली नाही याचे आश्चर्य वाटते. संसदेच्या नव्या सभागृहातील हे पहिलेच अधिवेशन आहे. या सभागृहाच्या उदघाटनाप्रसंगी हे सभागृह आधीच्या तुलनेत अधिक सुरक्षित असल्याचे सांगितले गेले होते; मात्र प्रत्यक्षात तसे दिसले नाही. मागील महिन्यात २६ तारखेला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने सागरी सुरक्षा व्यवस्थेच्या घेण्यात आलेल्या लेखा-जोखामध्ये मुंबईचा सागरी किनारा अद्यापही असुरक्षित असल्याचे चित्र समोर आले. आतंकवादी हल्ला झाला त्यावेळी मुंबईच्या सागरी सुरक्षा तापयात केवळ ९ बोटी होत्या. हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षा तापयात केंद्र सरकारने आणखी २३ बोटींचा समावेश केला; मात्र  त्यापैकी केवळ ८ बोटी वापरात आहेत.  मुंबईला लाभलेल्या विशाल सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी आणखी २२ बोटींचा प्रस्ताव पोलिसांकडून दिला गेला असून हा प्रस्ताव मागील वर्षभरापासून शासन दरबारी निर्णयाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडलेला आहे.  आतंकवादी आक्रमणाच्या बाबतीत असला ढिसाळपणा जगातील सव्रााधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला नक्कीच परवडणारा नाही.  

     आजपासून ३६४ वर्षांपूर्वी अशाच प्रकारचे एक दहशतवादी आक्रमण स्वराज्यावर चालून आले होते ज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अचाट बुद्धिमत्तेने, अफाट शौर्याने आणि अतुलनीय युद्धकौशल्याने पुरता बिमोड केला. महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेलेल्या या प्रसंगातून बलाढ्य दहशतवादाचा सामना कसा करावा आणि शत्रूला नामोहरम करून चारीमुंड्या चित कसे करावे, याचा परिपाठचा महाराजांनी जगाला घालून दिला आहे.  मार्गशीर्ष शुक्ल सप्तमीला म्हणजेच १९ डिसेंबरला या भीमपराक्रमाला ३६४ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या प्रसंगाची उजळणी करूया.

       उत्तरेत मोघलांनी आणि दक्षिणेत आदिलशहाने ताब्यात घ्ोतलेले अनेक गड, किल्ले आणि प्रांत यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अफाट शौर्याने आणि प्रसंगी गनिमी काव्याने ताबा मिळवला, त्यामुळे आदिलशहा शिवाजी महाराजांवर प्रचंड खवळला होता. महाराजांना रोखण्यासाठी कोणीच पुढे येईना. अखेर आदिलशहाच्या आईने म्हणजेच बडी बेगमने हस्तक्षेप करून भर दरबारात अदिलशहाच्या सरदारांना शिवाजी महाराजांना पकडून आणण्याचे आवाहन केले. महाराजांना कैद करून आणणाऱ्यास मोठे इनाम देण्याचेही घोषित केले. शिवाजी महाराजांना रोखण्याचे धाडस करणे म्हणजे मृत्यूला आव्हान देण्यासारखे असल्याने कोणीच पुढे येईना. अखेर त्यांतूनच एक उंच धिप्पाड आणि क्रूर सरदार पुढे आला ज्याचे नाव अफजलखान. शिवाजी महाराजांना पकडून आणण्याचा विडा अफजलखानाने उचलला. हा तोच सरदार होता जो शिवाजी महाराजांचे जेष्ठ बंधू संभाजी राजे यांच्या हत्येस कारणीभूत ठरला होता. यानेच महाराजांचे पिता शहाजी महाराजांना बेड्या घालून विजापूरला नेले होते, मोगल बादशहा औरंगजेबालाही त्याने कैदेत टाकले होते. अशा या महापराक्रमी, क्रूर, अहंकारी आणि स्वामिनिष्ठ अफजलखानाचे नवे संकट स्वराज्यावर चालून येत होते.

       प्रतापराव मोरे, पिलाजी मोहिते या स्थानिक सरदारांसह सिद्धी हिलाल, मुसाखान, अंबरखान आणि याकूब खान यांसारखे पराक्रमी सरदार खानासोबत होते. याशिवाय बारा हजार घोडदळ, दहा हजार पायदळ आणि असंख्य तोफा आणि बंदुकांच्या शस्त्रसज्जतेसह खानाची स्वारी स्वराज्यावर चाल करून आली. खानाच्या स्वारीचे वृत्त लागताच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मुक्काम घनदाट जंगलाचा वेढा असलेल्या दुर्गम प्रांतातील प्रतापगडावर हलवला. येताना त्याने बरीच लूट माजवली. पुरातन मंदिरे ही हिंदूंची शक्तिस्थाने आणि श्रद्धास्थाने असतात हे खानाला ज्ञात असल्याने त्याने मंदिरांचा विध्वंस करण्यास सुरुवात केली, तुळजापूरच्या भवानी मातेचा विध्वंस करून त्याने आपला मोर्चा पंढरपूरच्या वि्ील मंदिराकडे वळवला. मंदिरावरील हल्ल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील असा त्याचा समज होता; मात्र खानाशी समोरासमोर भिडणे म्हणजे आगीत उडी घेण्याप्रमाणे असल्याने महाराजांनी यावेळी सावध पवित्रा घेतला. खानाने वाईला आपला मुक्काम थाटला, आदिलशहाने त्याला याआधी वाईची सरदारकी दिलेली असल्याने तेथील परिसराचा त्याला बऱ्यापैकी अभ्यास  होता,  खानाला पराभूत करायचे असेल, तर शक्तीपेक्षा युक्तीनेच तो करता येईल हे महाराजांनी ओळखले आणि त्यांनी मानसशात्राचा वापर करत खानाचे त्यांना भय वाटत असल्याचा निरोप खानाकडे पाठवला. आपल्याला युद्ध करायचे नसून चर्चा करून तह करण्याचे प्रलोभन खानाला दिले. खानाने महाराजांना वाईला बोलावले. खान हा दगाफटका करण्यात सराईत असल्याचे महाराजांना चांगलेच ज्ञात असल्याने महाराजांनी आपण अत्यंत भयभीत झालो असल्याचे भासवत खानालाच प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावले. एव्हाना महाराज भयभीत झाल्याच्या विधानावर त्याचा पूर्ण विश्वास बसला होता आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्याची त्याने सिद्धता दर्शवली. दोघांची भेट शामियान्यात होईल आणि दोघांनी सोबत कोणतेच शस्त्र बाळगू नये असे ठरले. सोबत १० अंगरक्षक असतील त्यापैकी एक शामियान्याच्या बाहेर असेल आणि अन्य काही अंतरावर असतील. भेटीसाठी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा म्हणजेच १० नोव्हेंबर १६५९ चा दिवस निश्चित करण्यात आला.

         अफजलखान श्रीमंती आणि शाही थाटाचा शौकीन असल्याने महाराजांनी त्याच्यासाठी विवीध शोभिवंत वस्तुंनी सजवलेला भव्य शामियाना उभारला. या शामियानाच्या सौंदर्याने अफजलखान खूपच खुश झाला. सोबत शस्त्र न बाळगण्याचे ठरले असतानाही खानाने अंगरख्याखाली बिचवा लपवला होता. भेटीच्या वेळी खान दगा फटका करणार याची महाराजांना पूर्णपणे जाणीव असल्याने महाराजांनी अंगरख्याच्या आत चिलखत परिधान केली, हातात वाघनखे लपवली. शामियान्यात येतानाही अफजलखानाकडे पाहून भय वाटत असल्याचे दाखवत महाराज सुरुवातीला थोडे मागे सरसावले. महाराजांच्या या कृतीने खानाला पूर्णपणे गाफील केले; ज्यामुळे आलिंगनासाठी पुढे सरसावताना महाराजांच्या हातात वाघनखे आहेत याकडे खानाचे लक्षही गेले नाही, महाराजांना आलिंगन देताच खानाने त्यांना आपल्या काखेत दाबत महाराजांवर बिचव्याचा वार केला. त्याबरोबर महाराजांनी पूर्ण शक्तीनिशी खानाच्या पोटात वाघनखे खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढत त्याची मिठीतुन स्वतःची सुटका करवून घेतली. ‘दगा दगा' करत खान आक्रोश करू लागला. त्याबरोबर खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा पुढे सरसावला आणि त्याने महाराजांवर वार केला. तो वार जीवा महालाने स्वतःवर घेऊन महाराजांचा मार्ग  मोकळा केला. जखमी खानाने पालखीत स्वार होऊन भोईंना तिथून निघण्यास सांगितले. तत्क्षणी संभाजी कावजीने भोईंचे पाय छाटले आणि खानाचे शीर धडावेगळे केले. महाराज किल्यावर परतले. किल्यांवरील तोफांनी खानाच्या सैन्यावर आक्रमण केले. स्वराज्याचे सैन्य आधीच दबा धरून बसलेले होते. खानाच्या सैन्य पूर्णपणे बेसावध असल्याने मावळ्यांनी केलेल्या अचानक हल्ल्यामध्ये आणि तोफांच्या आक्रमणामध्ये खानाचे सुमारे ५००० सैन्य मारले गेले, ३००० सैन्याला पकडण्यात आले.

       शारीरिक दृष्टीने, बळाच्या आणि सैन्य-युद्धसामग्री च्या तुलनेत महाराजांचे  सैन्य अगदीच अल्प होते; मात्र महाराजांकडे असलेली प्रचंड इच्छाशक्ती, त्यांचे युद्धकौशल्य, मानसशास्त्राचा वापर, संयम, अचूक नियोजन, सैन्यावरील प्रचंड विश्वास आणि तेव्हढ्याच ताकदीचे, महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे स्वराज्याचे सैन्य या महाराजांकडील जमेच्या बाजू होत्या. त्यांच्या सामर्थ्यावर महाराजांनी दहशतवादावर विजय मिळवला. ‘मरणान्ती वैराणी' या रामायणातील उक्तीनुसार शत्रूच्या मृत्यूनंतर शत्रुत्वाचाही शेवट होतो. म्हणून महाराजांनी विशालगडाच्या पायथ्याशी अफजलखानाची छोटीशी कबर बांधली. या कबरीवर प्रतिदिन दिवाबत्ती करण्यासाठी निधीचे प्रयोजन केले. किती उदात्त विचार होते महाराजांचे हे या एका कृतीतून लक्षात येते.


     या छोट्याशा कबरीचा पुढे अफजलप्रेमींनी एक एकरात विस्तार केला. कबरीभोवती अनधिकृत बांधकाम करण्यात आले, कबरीला दर्ग्याचे स्वरूप दिले, लोक तिथे नवस करू लागले. अफजल खानाचे उदात्तीकरण सुरु झाले. पुढे पुढे तर प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यासही  विरोध होऊ लागला. छत्रपतींच्या महाराष्ट्रात अफजलखानाच्या कबरीपुढे महाराजांचा भीमपराक्रम झाकण्याचा प्रयत्न होऊ लागला. याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी गेली अनेक वर्षे लढा दिला ज्याला अखेर यश आले. विद्यमान महाराष्ट्र सरकारने गतवर्षी नोव्हेंबर मासात कबरीभोवतीच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवला. अफजलखान वध हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान, ज्याचा समस्त जनतेला अभिमान वाटायला हवा; मात्र याच अफजलखानाच्या वधाचे पोस्टर लावले म्हणून २००९ साली मिरजेत दंगल उसळली. एका समाजाच्या भावना दुखावतील म्हणून तत्कालीन गृहमंत्र्यांनी अफजलखान वधाच्या पोस्टरवर अघोषित बंदी आणली. शालेय अभ्यासक्रमातील अफजलखान वधाची चित्रे काढून टाकण्यात आली. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अफजलखान वधाचे चित्र उभारण्यात आले, पोलिसांकडून ते काढून टाकण्यास सांगण्यात आले,  देवी देवतांची मंदिरे उध्वस्त करणाऱ्या, तलवारीच्या बळावर रयतेला लुटणाऱ्या अफझलखानाचा कोथळा काढून शिवरायांनी ज्या महाराष्ट्राला सुरक्षित केले त्या महाराष्ट्रातील एका समाजाच्या भावना दुखावतील म्हणून थेट इतिहासाशीच छेडछाड़ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता मात्र  इतिहासप्रेमी सरकार सत्तेत आहे. यंदा असे काही घडणार अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.
-जगन घाणेकर, घाटकोपर. 

 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

संत गाडगे महाराज