नको रे मना वाद हा शोककारी
संत आनंदाचे स्थळ , संत सुखचि केवळ। असे समर्थ म्हणतात. अशा संतोष मूळ असणा-या संतांकडे गेल्यावर त्यांच्या परमसंतोषाचे रहस्य जाणून घेणे यात शहाणपण आहे.ते न करता दुःख मूळ असलेल्या संसारातील उपभोग मागणे हे करंटेपण आहे.
उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे।
तया अंतरी सर्वदा तेचि आहे।
जनी सज्जनी वाद हा वाढवावा।
पुढे मागुता शोक जीवी धरावा । श्रीराम ६१।
कल्पवृक्षाच्या छायेत उभे राहून जी कल्पना करावी ती फळते असे म्हणतात. आनंदाची कल्पना केली तर आनंद मिळतो आणि दुःखाचे चिंतन केले तर दुःख मिळते. संत, सद्गुरू, भगवंत..त्यांना कोणत्याही नावाने संबोधा, ते कल्पवृक्ष आहेत. किंबहुना त्याहीपेक्षा सामर्थ्यवान आहेत. त्यांच्या संगतीत राहून जगातील विषय मागितले, प्रपंचातील सुखे मागितली तर ती मिळतीलही. पण हा सार्वत्रिक अनुभव आहे की ही सुखे क्षणिक असतात. हा आनंद क्षणभंगुर असतो. दुःख त्याच्या जोडीनेच असते. आधी काही कमतरतेमुळे सुख नाही म्हणून दुःख असते, सुख मिळावे यासाठी धडपड केली जाते, त्याचे कष्ट होतात. त्याचे दुःख होते. एवढे सायास करूनही हवे ते नाही मिळाले तरी दुःख होते. मिळाले तर ते टिकेल ना, कसे टिकवावे या चिंतेने दुःख होते. आणि त्या सुखाचा नाश झाला की दुःख होतेच. जे नाशवंत आहे ते सर्व दुःखदायक आहे. माणूस जेवढा नाशवंत विषयांच्या लोभात अडकतो तेवढा दुःखात अडकतो. ”संत आनंदाचे स्थळ,संत सुखचि केवळ” असे समर्थ म्हणतात. अशा संतोष मूळ असणाऱ्या संतांकडे गेल्यावर त्यांच्या परम संतोषाचे रहस्य जाणून घेणे यात शहाणपण आहे.ते न करता दुःख मूळ असलेल्या संसारातील उपभोग मागणे हे करंटेपण आहे.
संत या संसारात राहतात. जगरहाटीप्रमाणे व्यवहार करतात. पण मनाने विरक्त असतात. कारण संसाराचे मिथ्यत्व, नाशवंत स्वरूप त्यांनी जाणलेले असते. एकमेव सत्य असलेले परमात्म्या जाणून त्या आनंद स्वरूपाचा त्यांनी साक्षात अनुभव घेतलेला असतो. म्हणून तर ते नित्य आनंदात असतात. आपल्याला मात्र हे जग सत्य वाटत असते. कारण ते दिसते. अनुभवास येते. सत्य, पण सूक्ष्म, परमात्मा आपल्या स्थूल इंद्रियांना दिसत नाही. जाणवत नाही. म्हणून त्याबद्दल अनभिज्ञता असते. आपल्या अज्ञानामुळे आणि त्यातूनच निर्माण होणा-या अहंकारामुळे आपण संतांशी वाद घालतो. आपल्या चुकीच्या मतांचे, आग्रहाचे समर्थन करत राहतो. ते आपल्याला संसारापासून विन्मुख करून भगवंताला सन्मुख करण्याचा प्रयत्न करीत असतात. आपण मात्र पुन्हा पुन्हा संसाराकडे पाहतो. संसारातील पदार्थ मागत राहतो. त्यातच आपले सुख कसे आहे, याचे प्रतिपादन करत राहतो.
याचा परिणाम असा होतो की जोपर्यंत आपले अंतःकरण परमात्मा प्राप्तीसाठी तयार होत नाही, तोपर्यंत संत आपल्याला ते ज्ञान देत नाहीत. आपण शाश्वत आनंदापासून दूर राहतो. नाशवंत सुखाच्या मोहाने दुःख मागून घेतो. शोकग्रस्त होतो. भगवान श्रीकृष्णाच्या संगतीत राहूनही विषाद करणा-या अर्जुनासारखी आपली अवस्था असते. युध्दभूमीवर शत्रूसैन्याच्या रूपात आपले आप्त, गुरू, यांना पाहून अर्जुन श्रीकृष्णाशी वाद करू लागला. पंडितासारखे भाषण करत स्वजनांशी युध्द करणे कसे गैर आहे, पापकारक आहे हे भगवंताला पटवून देण्याचा प्रयत्न करू लागला.”मी हे पाप करु शकत नाही” असा निर्णय करून अत्यंत शोकाकुल झाला आणि शस्त्र टाकून, हतबल होऊन बसून राहिला. भगवंत त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत होते. अर्जुनाच्या शंका, प्रतिप्रश्न सुरूच होते. परंतु ज्यावेळी अर्जुनाला वाटले की, ”माझा मोह नष्ट झाला आहे. आता तू सांगशील तेच मी करेन” त्याचवेळी तो निश्चिंत झाला. त्याचे दुःख संपले. शोक संपला...आणि मोठ्या आत्मविश्वासाने तो युध्दाला सामोरा गेला.
आपण जेव्हा संतांच्या संगतीत असतो तेव्हा ते सांगतील तेच ऐकायचे असते.ते सांगतील तेच करायचे असते. त्यांच्याशी वाद घालायचा नसतो. कारण आपले हीत आपल्यापेक्षा ते अधिक जाणतात. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सांभाळण्यासाठी तत्पर असतात. त्यांना तळमळ असते ती आपल्या शाश्वत आनंदाची. आपल्याला संपूर्ण दुःखमुक्त करण्याची. म्हणून समर्थ म्हणतात, सज्जनांशी वाद करून दुःखी होऊ नये. त्यांना शरण जाऊन अखंड समाधान प्राप्त करून घ्यावे.
जय जय रघुवीर समर्थ - सौ. आसावरी भोईर