आक्रमकांची नावे बदलण्यात गैर ते काय ?

पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झालेला कोणताही देश सर्वप्रथम त्याच्यावरील आक्रमकांच्या खुणा पुसून टाकतो; मात्र भारतीय राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आपण आजही त्या स्मृती उगाळत बसलो आहोत. आजही हिंदुस्थानातील ७०० हुन अधिक गावांना बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांची नावे आहेत. उत्तर प्रदेशात सव्राधिक ३९६ गावांना या आक्रमकांची नावे असून महाराष्ट्रातही या नावांची ५० गावे आहेत. ही नावे भारतमातेने सहन केलेल्या अपरिमित वेदनांची आठवण करून देणारी आहेत. त्यामुळे ती लवकरात लवकर बदलली जाणे आवश्यक आहे.

   एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रशियाने जेव्हा पोलंड जिंकला तेव्हा त्यांनी पोलंडवरील विजयाचे स्मारक म्हणून वॉर्सा शहराच्या मधोमध एक रशियन ऑर्थाडॉक्स चर्च उभे केले. पहिल्या महायुध्दानंतर जेव्हा पोलंड स्वतंत्र झाला तेव्हा पहिले काम कुठले केले असेल, तर रशियाने बांधलेले ते चर्च पाडले आणि रशियन वर्चस्वाचे चिन्ह नष्ट केले. कारण पोलंडवासीयांना ते चर्च आपल्या अपमानाची सतत आठवण करुन देत होते. याउलट भारताला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होऊन ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला तरी देशातील अनेक जिल्ह्यांना, शहरांना, तालुक्यांना आणि गावांना दिलेली जुलमी आक्रमकांची नावे पालटली गेलेली नाहीत. या धर्तीवर राज्यातील महायुती सरकारने मुंबईतील ८ स्थानकांना असलेली परकीय नावे पालटून स्वदेशी नावे देण्याचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे.

   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच राज्यातील जुलमी आक्रमकांच्या नावे असलेल्या रेल्वे स्थानकांची आणि शहरांची नावे बदलण्याचा जोरदार धडाका लावला होता. त्यावेळी अलाहाबादचे नामकरण प्रयागराज' करण्यात आले, तर फैजाबादचे नाव पालटून अयोध्या' करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रातही क्रूरकर्मा औरंगजेब याच्या नावाने असलेले औरंगाबाद जिल्ह्याचे नाव पालटून संभाजीनगर करण्याच्या मागणीने जोर धरला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यापूर्वी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करून राज्यातील जनतेची इच्छा पूर्ण केली.

     ज्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नामकरण प्रयागराज असे केले, तेव्हा अनेकांनी नावात काय आहे' म्हणून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले होते, तेव्हा योगी आदित्यनाथ यांनी कोणी आपल्या मुलांचे नाव रावण किंवा दुर्योधन असे ठेवत नाही' असे म्हणत टीकाकारांची तोंडे बंद केली होती. ज्या पात्रांना इतिहासाने खलनायक ठरवले आहे, त्या पात्रांची नावे कोणी आपल्या मुलाबाळांना दिल्याचे आतापर्यंत ऐकिवात नाही. कंस, जरासंध,रावण, दुर्योधन, दुःशासन हे सर्व पराक्रमी आणि कर्तृत्ववान होते; मात्र त्यांनी अधर्माची बाजू घेतली आणि ते खलनायक ठरले. परिणामी त्यांची नावे पुढे कोणी आपल्या पुढच्या पिढीला दिली नाहीत. असे म्हटले जाते कि हजारो वर्षांपूर्वी भारतात सोन्याचा धूर निघत असे. भारताला सुवर्णनगरी' असेही म्हटले जात असे. भारतावर चालून आलेल्या यवनी आक्रमकांनी आणि त्यानंतर आलेल्या ब्रिटिशांनी भारताचे सारे वैभव लुटले. येथील इतिहासाच्या खुणा पुसल्या. पुरातन मंदिरांची आणि कलाकृतींची नासधूस केली. तलवारीच्या बळावर भारतीयांवर अत्याचार केले, अनेकांचे धर्मांतर केले. येथील शहरांची आणि गावांची नावे पालटली. देश स्वतंत्र होऊन आज ७५ वर्षे उलटली तरी या आक्रमकांच्या स्मृतींना आपण अद्याप जपून ठेवले आहे. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झालेला कोणताही देश सर्वप्रथम त्याच्यावरील आक्रमकांच्या खुणा पुसून टाकतो; मात्र भारतीय राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आपण आजही त्या स्मृती उगाळत बसलो आहोत. आजही हिंदुस्थानातील ७०० हुन अधिक गावांना बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांची नावे आहेत. उत्तर प्रदेशात सव्रााधिक ३९६ गावांना या आक्रमकांची नावे असून महाराष्ट्रातही या नावांची ५० गावे आहेत. ही नावे भारतमातेने सहन केलेल्या अपरिमित वेदनांची आठवण करून देणारी आहेत. त्यामुळे ती लवकरात लवकर बदलली जाणे आवश्यक आहे.

      प्राचीन भारतातील हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे आक्रमणकर्त्यांनी येथे आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तलवारीच्या बळावर धर्मांतरे घडवून आणली, देशाचे सारे वैभव लुटले मात्र याच भारतातील पराक्रमी राजे महाराजांनी आपल्या शौर्याने या आक्रमकांच्या कबरी इथेच खणल्या. त्यानंतर आलेल्या इंग्रजांनाही क्रांतिकारकांनी जेरीस आणून देश सोडण्यास भाग पाडले. भारतभूमी ही जशी संतांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे तशी ती अधर्माच्या नाशासाठी पृथ्वीतलावर जन्म घेणाऱ्या अवतारांची, जनतेच्या कल्याणासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या वीरपुरुषांची आणि भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी बलीवेदीवर हसतमुखाने चढणाऱ्या क्रांतिकारकांचीही आहे. ज्या भूमीला अशा उत्तुंग पराक्रमाचा दैदीप्यमान इतिहास लाभला आहे, तिने जुलमी आक्रमकांच्या नावाचा वारसा का म्हणून चालवावा ? मुंबईतील ८ स्थानकांची आणि अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा महायुती सरकारने घेतलेला निर्णय ही तर सुरुवात आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांना,गावांना, संग्रहालयांना, मार्गांना आणि उद्यानांना आजही विदेशी आक्रमकांची नावे दिलेली पाहायला मिळतात. येणाऱ्या काळात ही नावेही बदलण्यात यावीत अशी विद्यमान सरकारकडून अपेक्षा करायला हरकत नाही.  - जगन घाणेकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 शिवरायांची युद्धनीती