हास्य

जगातील सर्वात सुंदर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे हास्य. हास्याने मनावरील ताण कमी होतो. मनात सकारात्मक विचार येतात. मन आनंदी असले की आपला दिवसही चांगला जातो. हास्य हा एक व्यायामप्रकार आहे. हास्याने आपल्या चेहऱ्यावरील स्नायू ताणले जातात आणि एक प्रसन्नता चेह-यावर दिसते. हास्य ही एक दैवी देणगी आहे.
       

आयुष्यात भरभरून हसायला हवे. कोणाला नसतात ताणतणाव? म्हणून काय आपण हसायचे नाही का? तर असे अजिबात नाही. हसायला काही कारणच असायला पाहिजे असे नाही. एखाद्या लहान बाळाला पाहून आपल्याला किती छान वाटतं. अशावेळी आपण आपली प्रतिक्रिया लगेच हास्याद्वारे प्रकट करतो. जेव्हा शेतक-याच्या शेतात तो भरभरून आलेले पीक पाहतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटते.निसर्गातील प्राणी, पक्षी, डोंगर, द-या पाहूनही माणसाला अत्यंत आनंद होतो आणि हा आनंद तो हास्याच्या रूपाने व्यक्त करतो. कित्येकदा या हास्यातून आनंदाश्रूही येतात. हास्य हा एक रस आहे. तो इतर रसांत मिसळला की एक नवा आविष्कार उदयाला येतो. हा रस शृंगार रसात मिसळला तर मोहकता जाणवते, वीररसात मिसळला तर मानभावीपणा असतो, अहंकारात मिसळला तर क्रौर्य निर्माण होते, प्रेरसात मिसळला तर उत्कट आनंदाची अनुभूती होते.

        विनोदनिर्मिती ही एक कला आहे. जी व्यक्ती विनोदी असते ती इतरांनाही आनंदी ठेवत असते. हल्ली तर अनेक ठिकाणी हास्य क्लब स्थापन झाले आहेत. तिथे माणसे एकत्र येऊन मोठमोठ्याने हसतात. त्यामुळे काही वेळ का होईना, त्यांच्या मनावरील ताण दूर होतो आणि त्यांना मानसिक सुखाची प्राप्ती होते. हास्याने एक वेगळाच भाव निर्माण होतो. यामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास वृध्दींगत व्हायला मदत होते. चेह-यावर एक प्रकारची चमक दिसू लागते. उत्साह कैक पटीने वाढतो. सतत कुरकुर करणारी व्यक्ती कुणालाच आवडत नाही. त्याउलट जी व्यक्ती नेहमी आनंदी असते, सतत हस-या चेह-याने वावरते, अशी व्यक्ती सर्वांना आवडते. हसण्याने आयुष्य वाढते असे म्हटले जाते. हास्यातून आपण आपले विचार इतरांपर्यंत पोहचवत असतो. जर आपण रडवेला चेहरा करून राहिलो तर कुणाला आवडेल बरं? म्हणूनच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात हसण्याला खूप महत्त्व आहे. आयुष्याला मोजमाप न लावता मस्त हसता आले पाहिजे. सर्वांना सगळं मिळत नसतं. म्हणून हसणे सोडायचे नाही. जीवनातील सकारात्मक गोष्टींचा गुणाकार करत आणि नकारात्मक गोष्टींचा भागाकार करत आयुष्य मनमुराद जगायचे आणि खळखळून हसायचे. हसणे खूप फायदेशीर आहे. हास्य माणसाचे जीवन बदलवू शकते, एवढी ताकद या हसण्यात आहे. हसण्यातून माणूस आपल्या भावनांना सकारात्मकरित्या व्यक्त करतो. एखाद्या व्यक्तीला जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा तो आपल्या हास्यातून त्याला झालेला आनंद इतरांपर्यंत पोहचवत असतो. हसण्याने आपल्या मनात समोरच्या व्यक्तीविषयी चांगले विचार आहेत असा त्याचा अर्थ होतो. जर आपण एकमेकांकडे न हसता बघितले तर कितीतरी गैरसमज निर्माण होऊ शकतात.

हसण्यातून बरेच काही स्पष्ट होत असते. जीवनात हास्य नसेल तर एखाद्या आनंदाला साजरे करण्याची भावनाच राहणार नाही. किती लहानसहान गोष्टींमध्येही आनंद असतो ना! एखादा विनोद ऐकून हसणे, एखादी विनोदी कविता वाचून किंवा ऐकून हसणे, लहान मुलांचे लाडेलाडे बोल ऐकून हसणे, एखादे व्यंगचित्र पाहून हसणे अश्या कितीतरी गोष्टींमुळे आपण हसत असतो. हास्य नसेल तर विनोदाला काही स्थानच उरणार नाही. कधीकधी तर एखादा शब्द सुद्धा हास्याचा कारंजा उडवून जातो. हास्यच नसेल तर माणसाला सुख, समाधान, शांती मिळणार नाही. हास्याविना जीवन कोरडे आणि रसहीन आहे. या देणगीचा भरपूर उपयोग माणसाने करायला हवा. पण काही माणसे अशी असतात की ज्यांच्यावर विनोदाचा काहीच प्रभाव पडत नाही. ती सतत मख्ख चेह-याने समाजात वावरत असतात. त्यांना बघून ती व्यक्ती फार रागीट असावी असा समज समोरच्या माणसाला होतो. हल्ली माणूस ताणतणाव, कामाच्या व्यापात हसणे विसरतो. आयुष्य फार छोटे आहे. मग उगाच सुतकी चेहरा करून का जगायचे? गेलेले क्षण परत येत नसतात. कमीतकमी माणसानेच स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी तरी हसायला हवे.

        चेहरा सुंदर दिसावा म्हणून आपण प्रयत्न करतो. पण चेहऱ्यावर सौंदर्य येतं ते हसण्याने. हसण्याने आपला व्यक्तीमत्व विकास होतो. समोरच्या माणसाचं मन जिंकायचं शस्त्रही हास्यच आहे. हसण्याने फक्त मानसिक आनंद मिळतो असे नाही तर त्यामुळे शरीरात कुठे वेदना असेल तर ती वेदना कमी होण्यास मदत होते. टेंशनपासून मुक्त राहण्यासाठी हास्य हे कवच फार उपयोगी ठरते. दुःख बाजूला ठेवून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्याचे काम चार्ली चॅप्लिनने केले. तो म्हणतो की, तुम्ही ज्या दिवशी एकदाही हसत नाही तो दिवस वाया गेला असं समजा. आता प्रत्येकाने ठरवायचे की मी रोज हसणार आणि स्वतःला खुश ठेवणार. नक्कीच जमेल बघा.
-लैलेशा भुरे, नागपूर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 घटती जंगले, वाढत्या प्रदूषणाने मौल्यवान आयुष्य केले कमी