सद्‌गुरु कधीही भक्ताची उपेक्षा करत नाहीत  

जिथे जिथे भक्त भगवंताचा अनन्य दास होतो, भगवंतालाच आपले सर्वस्व मानतो तिथे तिथे भगवंत स्वतः भक्ताचा दास होतो. त्याला काहीही कमी पडू देत नाही. त्याला सर्वतोपरी सहाय्य करतो. त्याचे कल्याण करतो. भगवंत आणि त्याचा अनन्य भक्तही परंपरा चिरंजीव आहे. जेव्हा जेव्हा भक्त संकटात सापडतो आणि आर्तपणे भगवंताला हाक मारतो तेव्हा तेव्हा भगवंताला त्याला तारण्यासाठी यावेच लागते.

श्रीराम
वसे मेरूमांदार हे सृष्टीलीळा।
शशी सूर्य तारांगणे मेघमाळा।
चिरंजीव केले जनी दास दोन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी श्रीराम ३३

सद्‌गुरूंच्या कृपेला काही मर्यादा नाही. त्यांना शरण आलेल्या, सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भक्ताच्या कल्याणासाठी ते आपले सर्व सामर्थ्य वापरतात. श्री रामायण कथेतील दोन परमभक्तांचा उल्लेख येथे समर्थांनी केला आहे. सप्तचिरंजीवांपैकी एक श्री हनुमंत आणि दुसरा रावणाचा बंधू बिभीषण. हनुमंतांनी आपले सर्व जीवन रामप्रभूंच्या चरणी अर्पण केले होते. श्रीरामांची अखंड, निरंतर सेवा हेच त्यांचे जीवन होते. स्वतःचा वैयक्तिक कोणताही विचार न करता, श्रीरामांकडून कोणतीही अपेक्षा न करता हनुमंत नित्य रामकार्यात गढून गेलेले असत. जेव्हा काही कार्यात गुंतलेले नसत तेव्हा श्रीरामांच्या चिंतनात, स्मरणात गुंग असत. अशा या बुद्धिमान, शक्तिमान तरीही निःस्वार्थ, विनम्र भक्ताची महती, कीर्ती पिढ्यानपिढ्या गायली जावी, त्याच्या गुणांचे अनुकरण अनंत काळापर्यंत केले जावे यासाठी रामाने हनुमंताला अति दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद दिला.तसेच आपल्या दासांना, शरणागत भक्तांना त्यांच्या संकट प्रसंगी तात्काळ धावून मदत करावी हे कार्य ही सोपवले.

स्वधामासी जाता महारामराजा। हनुमंत तो ठेविला याच काजा। सदासर्वदा रामदासांसि पावे। खळी गांजिता ध्यान सांडूनि धावे
जोपर्यंत परमात्म्याची ही सृष्टी अस्तित्वात आहे, जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारांगणे, मेघमाला अस्तित्वात आहेत, जोपर्यंत स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकांना आधारभूत असलेला सोन्याचा मेरू पर्वत तसेच समुद्रमंथनाच्या वेळी वापरलेला मांदार पर्वत अस्तित्वात आहे तोपर्यंत हनुमंत व बिभीषण चिरंजीव आहेत. बिभीषण रावणाचा धाकटा भाऊ. रावणाचे दूर्वर्तन त्याला जराही मान्य नव्हते. लहान असूनही त्याने आपल्या मोठ्या भावाला त्याची चूक दाखवण्याचा प्रयत्न केला. ती सुधारण्याचा सल्ला दिला. परोपरीने त्याला हित सांगण्याचा प्रयत्न केला. पण अखेरीस नाईलाजाने त्याने त्या सुवर्णनगरीचा आणि आपला बंधू रावणाचा त्याग केला. आपले सर्व काही सोडून बिभीषण श्रीरामाला येऊन मिळाला. कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याने रामाला युद्धामध्ये सर्व प्रकारे सहाय्य केले. अतिशय विश्वासाने आपल्याजवळ आलेल्या भक्ताची सद्‌गुरु कधीही उपेक्षा करत नाहीत हेच समर्थ या उदाहरणांतून पुन्हा पुन्हा सांगत आहेत. ‘चिरंजीव केले जनी दास दोन्ही' या चरणाचा सरळ अर्थ हा हनुमंत आणि बिभीषण यांच्या संदर्भातील आहे. याच चरणाचा जरा वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. जनी म्हणजे संत जनांमध्ये राघवाने दोन्ही दास चिरंजीव केले. ते दोन दास कोणते? मारुती हा रामाचा दास होता. त्याची रामभक्ती  इतकी पराकोटीची होती की दोघे वेगळे उरलेच नाहीत. दोन भिन्न शरीरे; पण आत्मा एकच. दोघांचा विचार एकच. द्वैत,  तुझे-माझे असे काही नाहीच. मारुतीच्या या आत्मनिवेदन भक्तीमुळे रामाला त्याचे दास व्हावे लागले. मारुतीची सर्व चिंता रामाला लागली. त्याचे कल्याण करण्याची जबाबदारी रामरायावर आली. कृष्ण आणि गोपींच्या उदाहरणातूनही हेच दिसून येते. कृष्णाच्या भक्तीत गोपी इतक्या तल्लीन झाल्या की स्वतःचे अस्तित्वच विसरल्या. त्या गोपींच्या उध्दाराची संपूर्ण जबाबदारी कृष्णावर येऊन पडली. आता कृष्णच त्यांचा दास झाला. परम सद्‌गुरु आणि परम शिष्याचे असे विलक्षण नाते असते. दोघे इतके एकरूप होऊन जातात की कोण कोणाचे दास याचे भानच राहत नाही. सद्‌गुरु आणि अनन्य सत्शिष्य यांची ही परंपरा अखंड आहे. राघवाने अर्थात सद्गुरूंनी ही परंपरा चिरंजीव केली आहे. जिथे जिथे भक्त भगवंताचा अनन्य दास होतो, भगवंतालाच आपले सर्वस्व मानतो तिथे तिथे भगवंत स्वतः भक्ताचा दास होतो. त्याला काहीही कमी पडू देत नाही. त्याला सर्वतोपरी सहाय्य करतो. त्याचे कल्याण करतो. भगवंत आणि त्याचा अनन्य भक्तही परंपरा चिरंजीव आहे. जेव्हा जेव्हा भक्त संकटात सापडतो आणि आर्तपणे भगवंताला हाक मारतो तेव्हा तेव्हा भगवंताला त्याला तारण्यासाठी यावेच लागते. जोपर्यंत भगवंतानेच आपल्या लीलेने निर्माण केलेले हे सृष्टीचक्र सुरू आहे तोपर्यंत भवसागराचे भय आहे.  त्यातून तरुन जाण्यासाठी भक्त  भगवंताची भक्ती करतो, त्याचे दास्य करतो, त्याच्याशी सख्य करतो, आत्मनिवेदन करतो. अशावेळी त्याला तारण्याशिवाय भगवंतालाही पर्याय राहत नाही. कोणत्यातरी रूपात त्याला प्रकट व्हावेच लागते. युगानुयुगे  हीच परंपरा चालत आलेली आहे आणि यापुढेही चालत राहील. स्वतः भगवंताचेच असे वचन आहे ”संभवामि युगे युगे”
                         जय जय रघुवीर समर्थ
-आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

महाडचा रणसंग्राम प्रेरणादायी इतिहास की पिकनिक ?