श्रीराम हे आगळे वेगळे..त्यांच्यासारखे दुसरे कुणीच नाही

प्रत्येक जीवात सत्व, रज, तम हे त्रिगुण असतात. जो गुण अधिक त्यानुसार जीवाचा स्वभाव व वर्तन असते. जेव्हा सत्वगुण अधिक असतो तेव्हा मानवातील देवत्व प्रकट होते. जेव्हा तमोगुण अधिक असतो तेव्हा त्याच्यातील दानव प्रकट होतो.  आपल्या अंतःकरणात हे देव- दानवाचे युद्ध अखंड सुरू असते. साधनेने आपला सत्वगुण वाढू लागला की नकळत अहंकार जागृत होतो. हा तमोगुणाचा आविष्कार असतो. तो सत्वगुणाला झाकोळून टाकतो.  पण भगवंताचे स्मरण जर प्रामाणिकपणे सुरू असेल तर भगवंत आपल्या सत्वगुणाला तमोगुणाच्या प्रभावातून मुक्त करतो.
महासंकटी सोडिले देव जेणे।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ।
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी । श्रीराम ।

रावणाने उन्मत्तपणे सर्व देवांना बंदीवासात टाकले होते. या महासंकटातून त्यांना श्रीरामाने सोडवले. प्रताप, बळ, इ. सर्व गुणांत आगळा असलेला हा श्रीराम ज्याचे नित्य स्मरण शिवपार्वती दोघेही करतात.. तो आपल्या दासाची कदापि उपेक्षा करत नाही. आता देव ही संकल्पना थोडी समजून घेण्याचा प्रयत्न करू. स्वर्ग किंवा देवलोकात राहणारे अत्यंत पुण्यवान जीव म्हणजे देव. तिथले सुखोपभोग घेऊन पुण्य संपले की ते जीव पुन्हा मर्त्य लोकात येतात. मर्त्य  लोकातील कोणाचे पुण्य अतिशय वाढू लागले की देवांचा राजा इंद्र याचे आसन डळमळू लागते. अत्यंत पुण्यवान असे हे देव माणसापेक्षा दिव्य आणि शक्तिमान असतात. देवलोक आणि तिथे वसणारे देव ही परमात्म्याच्या व्यवस्थापनातील एक व्यवस्था आहे. प्रत्येक देवतेकडे सृष्टीच्या नियमनातील विशिष्ट कार्य सोपवलेले आहे. पुण्यबळाने देवत्व लाभल्याने ज्यायोगे पुण्यबळ वाढते अशा साधनेला हे देव बळ देतात. अशा साधकाला आधारही देतात. म्हणूनच विशिष्ट कार्यासाठी आपण विशिष्ट देवतेची उपासना करतो. तिला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो.

पंचभुतांशी संबंधित अधिष्ठात्या देवता असतात, स्थानदेवता असतात, इंद्रियांच्या देवता असतात. अत्यंत सामर्थ्यशाली अशा या देवदेवता अनेकदा संकुचित वृत्तीने वागतात आणि मनोवेगामागे वाहवत जातात. मार्गभ्रष्ट झालेल्या, अहंकारी झालेल्या देवांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी सर्वसत्ताधीश परमात्मा लीला करतो. देवांचा अहंकार वाढू लागला की असूरांना बळ देऊन परमात्मा देवांचा अहंकार ठेचून टाकतो. असुरांचा अहंकार वाढू लागला की देवांना बळ देऊन असूरांना पराजित करतो. सर्वत्र एक परमात्माच आहेत, परमात्म्याशिवाय दुसरे काहीही नाहीच ही आपली मान्यता आहे. अर्थात्‌ देव, दानव, मानव, पशुपक्षी, कीटक, इत्यादी सर्व काही परमात्म्याचीच रुपे आहेत.

आवश्यकतेनुसार तो सत्व, रज, तम या गुणांचे कमी अधिक प्रमाणात प्रकटीकरण करतो. या श्लोकात जो संदर्भ आहे त्यात आधी उन्मत्त झालेल्या देवांचा अहंकार संपवण्यासाठी रावणाला बळ दिले होते. रावणाने आपल्या तपश्चर्येने अपार सामर्थ्य प्राप्त करून घेतले व त्याचा अमर्याद वापर सुरू केला. सर्व देवांना बंदीवासात टाकले. त्यांना आपले गुलाम केले. त्यांचे जीवन लाजिरवाणे व दुःखमय करून टाकले. अशा महासंकटात सापडलेल्या देवांना परमात्म्याने रामरूपात अवतार घेऊन मुक्त केले. प्रत्येक जीवात सत्व, रज, तम हे त्रिगुण असतात. जो गुण अधिक त्यानुसार जीवाचा स्वभाव व वर्तन असते. जेव्हा सत्वगुण अधिक असतो तेव्हा मानवातील देवत्व प्रकट होते. जेव्हा तमोगुण अधिक असतो तेव्हा त्याच्यातील दानव प्रकट होतो.  आपल्या अंतःकरणात हे देव- दानवाचे युद्ध अखंड सुरू असते. साधनेने आपला सत्वगुण वाढू लागला की नकळत अहंकार जागृत होतो. हा तमोगुणाचा आविष्कार असतो. तो सत्वगुणाला झाकोळून टाकतो.  पण भगवंताचे स्मरण जर प्रामाणिकपणे सुरू असेल तर भगवंत आपल्या सत्वगुणाला तमोगुणाच्या प्रभावातून मुक्त करतो. आपले अधःपतानाच्या महासंकटापासून रक्षण करतो.

ईश्वर, देव, अवतार ही निर्गुण निराकार, सर्वशक्तिमान, सर्वगुणसंपन्न परमात्म्याची विशिष्ट कार्यापुरती असलेली, विशिष्ट काळासाठीच असलेली मय्राादित रूपे आहेत. त्यामुळे त्यांचे सामर्थ्यही त्या त्या कार्यापुरते मय्राादित आहे. म्हणूनच आपण जरी आधारासाठी देवाकडे वळत असलो तरी देवांवर महा संकट येते तेव्हा देवही परमात्म्याचा अर्थात्‌ महाविष्णूचा धावा करतात. तेव्हा महाविष्णू योग्य तो अवतार घेऊन त्यांना महासंकटातून सोडवतो. सद्‌गुरूंना आपण साक्षात परब्रह्म मानतो.  त्यांचा अधिकारही तसाच असतो.  श्रीराम हे समर्थ रामदास स्वामींचे सद्‌गुरु. आपल्या सद्‌गुरूंच्या सामर्थ्याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, ”प्रतापे बळे आगळा सर्वगूणे !” राम शूर आहेत, पराक्रमी आहेत, बलवान आहेत, षडगुणैश्वर्यसंपन्न आहेत. ते केवळ शारीरिक बळाने संपन्न आहेत असे नाही तर ज्ञानानेही संपन्न आहेत.विचाराने प्रगल्भ आहेत. निष्ठावान आहेत, कर्तव्य कठोर आहेत, मातृ-पितृ-गुरुभक्त आहेत. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श राजा, तसेच आदर्श मित्र आहेत. एक परमात्म्याशिवाय कोणीही असा सर्व गुणांनी परिपूर्ण नसतो. श्रीराम असे आगळे वेगळे आहेत. त्यांच्यासारखे दुसरे कोणीही नाही. त्यांच्या या विशेष गुणांमुळे, हातात त्रिशूल धारण करणारे सामर्थ्यवान महादेव आणि आदिशक्ती पर्वत-कन्या पार्वती नित्य त्यांचे स्मरण करतात. असे सामर्थ्यवान परमात्मा, सामर्थ्यवान सद्गुरु त्यांच्या शरणागत भक्ताच्या सर्वतोपरी रक्षणासाठी नेहमीच सज्ज असतात. ते कधीच आपल्या दासाकडे दुर्लक्ष करीत नाहीत. आपले जगात विखुरलेले लक्ष जर आपण भगवंताकडे वळवले तर लक्षात येते की तो आपल्याकडेच पाहतो आहे. भगवंत आपल्या कृपादृष्टीने आपल्याला आश्वस्तही करतो आणि अधःपतनापासून सावधही करतो. मनाच्या श्लोकातून समर्थ सद्‌गुरू रामदास स्वामी आपल्याला हाच बोध करीत आहेत.  -आसावरी भोईर. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भ्रष्टाचाराची पाळेमुळे ‘कॉपी'च्या कुप्रथेत