मुशाफिरी

   प्रत्येकाला या जगाचा एक ना एक दिवस निरोप घ्यायचा आहे. पण ती ‘एक्सपायरी डेट' कोणती हे कुणालाच ठाऊक नसते. आयुष्यातील साऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या, ऐहिक भोग घेतले, कर्तव्ये पार पाडून झाली, सूना-नातवंडे पाहिली की मृत्यूने केंव्हाही गाठले तरी चालेल असा एक डायलॉग काही लोक येता जाता मारतात.. पण ते एकतर्फी झाले. नियतीलाही ते मंजूर असावे लागते. त्यामुळे या साऱ्यात म्हातारपण, वृध्दत्व, परावलंबित्व या टप्प्यांतून तुमची इच्छा असो वा नसो..जाणे भागच असते.

   दिवस परिक्षांचे सुरु आहेत..कदाचित या मार्च महिन्याच्या मध्यावर लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता घोषित होईल आणि जागावाटप, उमेदवारांच्या याद्या, एकास एक, आघाडी विरुध्द महायुती, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, अल्पसंख्यांकांच्या दाढ्या कुरवाळणे, पश्चिम बंगाल, उत्तराखंड हिंसाचार, शेतकरी आंदोलन, पाकपुरस्कृत दहशतवादी, तिसऱ्यांदा सत्ता द्या, अबकी बार चारसौ पार, आयेगा तो मोदीही, राममंदिर उभारणी, ३७० रद्द करुन दाखवले, आता काशी-मथुरा, रथयात्रा, रॅली, रोड शो, चार्टर्ड विमानांचा प्रचारासाठी वापर वगैरे वगैरे टाईपच्या वृत्तांचा भरणा असलेल्या बातम्या-वार्तांकने पाहावी, वाचावी लागतील. जशी विद्यार्थ्यांची परिक्षा देताना कसोटी लागते, तशीच विविध पक्षांची, त्यांच्या उमेदवारांची आता कसोटी लागेल. कधी नव्हे इतका परस्परद्वेष, धार्मिक तणाव, व्यवितविद्वेष, नफरत, तिरस्कार, टोकाच्या भूमिका, रस्त्यावरची आंदोलने, नासधूस, जाळपोळ, खूनखराबा गेल्या काही महिन्यांत आपल्या अवतीभवतीच्या वातावरणात भरुन राहिल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूका संपेपर्यंत आणखी किती खून पडतील, गोळीबार होतील, हिंसाचाराच्या घटना घडतील याचे उत्तर येणारा काळ देईलच! या साऱ्यात कस लागतो तो अनुभवी असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा, म्हाताऱ्यांचा, वयोवृध्दांचा. ते स्वतः या परिस्थितीतून किंवा ज्यांच्या हाती राज्यशकट, सत्ता, प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करुन मार्ग काढतात ते समजत असते.

   आजही भारतातील प्रमुख राजकीय पक्षांच्या म्होरवयांचे, सत्तापदी असणाऱ्या प्रमुखांचे वय लक्षात घेतले तर ते बऱ्यापैकी ज्येष्ठत्वाकडेच झुकत असल्याचेच लक्षात येईल. भारतातील जुन्यात जुन्या काँग्रेसचे अध्यक्षपद (नावाला का होईना!) मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आहे. ते ८१ वर्षांचे आहेत. ज्यांच्या इशाऱ्यांवर हा पक्ष चालतो त्या सोनिया गांधी  ७७ वर्षांच्या आहेत. जगातील सर्वाधिक अनुयायी असलेला राजकीय पक्ष सांगितला जातो त्या भाजपने पंतप्रधान म्हणून दिलेल्या नरेंद्र मोदी यांचे वय आज ७३ वर्षे आहे. राष्ट्रवादी शरद्‌चंद्र गोविंद पवार (तुतारी) या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे वय ८३ वर्षे आहे. ज्यांना अलिकडेच भारतरत्न जाहीर झाले ते लालकृष्ण अडवाणी हे ९६ वर्षांचे आहेत. तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी ६९ वर्षांच्या; तर बहुजन समाज पार्टीच्या बहन मायावती ६८ वर्षांच्या आहेत. तेलंगणामधील भारत रक्षा समितीचे अध्यक्ष  के.सी.राव ७० वर्षांचे आहेत. एन चंद्राबाबू नायडू यांचे वय ७३ वर्षे  आहे. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे सल्लागार अजित डोवाल हे ७९ वर्षांचे आहेत. सांगायचे तात्पर्य इतकेच की देशाच्या, राज्यांच्या प्रमुख पदांवर आहेत ते ज्येष्ठ वयोवृध्द नेतेच! ...आणि हे चित्र केवळ भारतातच नाही..तर जगातल्या अनेक देशांमधून पाहायला मिळते.

   आरोग्य सुविधा, जीवनशैली, विविध आजारांवर परिणामकारक औषधे जसजशी अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध होत जातील तसतसे आयुष्यमान वाढत जाईल. ५८ किंवा ६० हे जरी सेवानिवृत्तीचे वय असले तरी ते राजकारणात अनेकदा इच्छापूर्तीचे वय मानले जात असते. एवढे सारे असूनही देशात वाढत्या प्रमाणावर वृध्दाश्रम आहेत, तेथे राहणाऱ्यांच्या संख्येतही सतत वृध्दीच होत आहे. राजकारणात सत्तापदे भोगणारे ज्येष्ठ लोक अन्य साध्या भोळ्या ज्येष्ठ-वयोवृध्दांच्या समस्या सोडवण्यात किती पुढाकार घेतात हे पेन्शन स्किम, पी पी एफ, घटता व्याजदर, रेल्वेमधील प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या कमी केल्या गेलेल्या सुविधा यांवरुन स्पष्ट होते..मग ते कोणत्याही राजकीय पक्षांचे का असेनात!

  तर ते असो. ज्येष्ठ, वयोवृध्दांना आगरी-कोळी जनसमुहात डोकरा आणि महिला असेल तर डोकरी असे संबोधले जाते. भारताच्या सैन्यदलात ‘डोगरा रेजिमेन्ट' आहे. भारताच्या पहाडी भागातील झुंजार जवानांची ही तुकडी असून तिच्यात प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, जम्मू आणि पंजाबमधील लोकांची भरती करण्यात येत असते. एखाद्या डोकऱ्याला किंवा डोकरीला तसे संबोधल्याचा राग येऊ नये म्हणून मग त्यांना तोंडावर ‘डोगरा रेजिमेन्ट' असेही मस्करीत म्हटले जाते. वाढत्या वयानुसार अनेकांकडे अनुभवसमृध्दी येते, समतोल दृष्टी येते, सर्वसमावेशकता येते, मिश्किलपणा येतो; तर काही ज्येष्ठांकडे वाढत्या वयानुसार चिडचिडेपणा, तुसडेपणा, माणूसघाणेपणा, अपचन, अजीर्ण, मोतीबिंदू, गुडघेदुखी, सांधेदुखी या गोष्टी येतात. कुटुंबासाठी आयुष्यभर धावपळ, दगदग, व्याप, मनस्ताप सोसणाऱ्या वयोवृध्दांना निदान उतारवय तरी चांगले जावे ही किमान अपेक्षा असते. पण सर्वांच्याच बाबतीत ती पूर्ण होतेच असे नाही. २७ फेब्रुवारीस ज्यांचा जन्मदिन आपण ‘मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला त्या कुसुमाग्रजांनी ‘नटसम्राट' या नाटकात या म्हातारपणाबद्दल खूपच संवेदनशील संवाद लिहून तमाम प्रेक्षकवर्गाच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. एरवी विनोदी भूमिका करण्यासाठी गाजलेल्या दिलीप प्रभावळकर यांच्या ‘हसवा फसवी' मधील कृष्णराव हेरंबकर हे प्रभावळकरांनी साकारलेले पात्रही एकेकाळच्या प्रसिध्द नटवर्याच्या उतारवयामधील वास्तवावर प्रकाश टाकणारे आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला म्हातारपण चुकत नाही. अपघात, घातपात, जीवघेणा आजार यात जर अकाली निधन आले तरच यातून सुटका; अन्यथा तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकाला त्या अवस्थेतून जायचे आहेच. या जगाचा निरोप कोणत्या अवस्थेत घ्यावा लागेल हे आधीच सांगणारा कोणताच भविष्यवेत्ता अजूनतरी जन्माला आलेला नाही. या भारताचे पंतप्रधानपद भूषवलेले मा. अटलबिहारी वाजपेयी आणि संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी पेललेले मा.जॉर्ज फर्नांडीस यांना आयुष्याची काही वर्षे वेगळ्याच अवस्थेत घालवावी लागली. त्यांच्या अंतिम दिवसांत चेहऱ्यावर कुणाचीच ओळख नसे. केवळ डोळे हलताहेत, श्वास सुरु आहे हेच त्यांच्या ‘असण्याचे' कारण होते. विख्यात अभिनेते पद्मश्री पुरस्कार विजेते प्राणनाथ सिकंद म्हणजेच प्राण यांचेही तेच झाले. डोळ्यांची जरब, आवाजातील करारीपणा व अत्यंत प्रभावी अभिनयासाठी गाजलेल्या प्राण यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘आपल्याकडे अजून अशी माता जन्माला आली नाही, जिने आपल्या मुलाचे नाव प्राण म्हणून ठेवायची हिंमत दाखवली. हा माझ्या खलनायकी अभिनयाचा एक प्रकारचा सन्मानच आहे!' प्राण यांचेही शेवटचे दिवस असेच निश्चल अवस्थेत गेले होते.

    ज्येष्ठ, वयोवृध्द, अनुभवी लोकांबद्दल समाजाला. कुटुंबाला, शासनाला जे काही बोलायचे, करायचे, गौरवायचे असेल ते त्यांना व्यवस्थित चालता-बोलता, हिंडता फिरता येण्याच्या अवस्थेतच झालेले बरे. मागे मी पाहिले की वाशी-नवी मुंबईमधील विष्णूदास भावे नाट्यगृहात विख्यात कवि मा. शांताराम नांदगावकर यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी कविराजांना नीट चालणेही मुश्किल झाले होते. त्यांच्या बगलेत हात घालून मुलगा-सूनेने त्यांना व्यासपीठावर नेले होते. उतारवयामधल्या गलितगात्र, विकलांग, परावलंबी अवस्थेतील अशा सत्कार, गौरव, पुरस्कारांना मग फारसा अर्थच उरत नाही. विख्यात लेखक पु. ल. देशपांडे म्हणत की, ‘माझ्या शेवटच्या दिवसात मी आजारी पडल्यावर परिजनांनी, डॉक्टरांनी फारशी धावाधाव करु नये. निसर्गाला निसर्गाच्या क्रमाने येऊ द्या व मला घेऊन जाऊ द्या.' १३ डिसेंबर १९०७ रोजी जन्मलेले मा. बॅरिस्टर रामराव कृष्णराव पाटील (आय सी एस) हे महाराष्ट्राचे एक नामांकित सनदी अधिकारी होऊन गेले. ब्रिटीश राजवटीत ते कलेक्टरही होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी आय सी एस सेवेचा राजीनामा दिला होता. त्यांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार ते ९९ व्या वर्षी ३१ मे २००७ रोजी मृत्यू पावल्यावर (मरणोत्तर) २००७ साली  दिला. याला काय म्हणावे? इतक्या वर्षांत त्यांचे कर्तृत्व हे शासनकत्यांच्या लक्षात आले नाही का?

    आमची पिढी आज साठीत आहे. पुरेसे जगून झाले आहे. माझ्यासोबत शाळा-महाविद्यालयात शिकलेले अनेक जण/जणी आज विहीत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. खरे तर पत्रकारांना अशी वयानुसार सेवानिवृत्ती नसते. उलट वय, अनुभव, निरीक्षण, लोकसंग्रह, भाषासमृध्दी वाढत गेल्यामुळे त्यांना वाढत्या वयामध्ये अधिक मागणी  असते. आमच्या सोबत लहानाचे मोेठे झालेल्या अनेकांनी आज जगाचा निरोप घेतला आहे, काहींना जर्जर विकारांनी ग्रासले आहे. आजाराशी सामना करणाऱ्या आमच्या एका शाळकरी मैत्रीणीने नाशिकहुन मला फोन करुन विचारले की,  ‘मी आजारी असताना तू एकदाच बाकीच्यांसोबत येऊन भेटून गेलास. ते लोक परत आले होते भेटायला तेंव्हा तू का आला नाहीस?'

   मला दुसऱ्या कामाच्या व्यापामुळे जाता आले नव्हते. अनेक ज्येष्ठ, वयोवृध्द मित्र, नातेवाईक अशा प्रकारची तक्रार करताना आढळतात. त्यांना काय सांगावे?  काही वर्षांनी आपल्यावरही इतरांकडे अशी तक्रार करण्याची वेळ येणार आहे काय? वृध्दांनी विरंगुळा केंद्रात जावे, ऑनलाईन वाचन करावे, समाजमाध्यमांवर सक्रीय राहावे, नातवंडांत रमावे, वाचनालयात जाऊन बसावे, लापटर वलबचा आनंद घ्यावा, आयुष्यभर जे छंद जोपासण्यासाठी वेळ मिळाला नाही ते छंद करावेत वगैरे सांगणे सोप्पे आहे. पण कुटुंबियांव्यतिरिवत ज्यांच्याबरोबर जीवनाचा मोठा भाग व्यतित केला त्यांची  थेट भेट, त्यांच्याशी बोलणे, त्यांचे स्पर्श, त्यांच्या समवेत केलेले हास्य-विनोद, थट्टा मस्करी, दंगा-मस्ती, डाव-प्रतिडाव, कुरघोड्या,  झगडे आणि पुन्हा मनोमिलन, सहभोजन, टिंगल टवाळी याचा आनंद एकमेकांना समोरासमोर न भेटताच कसा बरे मिळणार?

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 पत्रपुराण...