दैवी शक्ती

पुढच्या गुरुवारीही साडेदहा वाजता तो इसम आला, सर्वत्र सकारात्मक ऊर्जा पसरल्याचा भास झाला. त्याने बर्फीचा प्रत्येक प्रकार टेस्ट केला आणि काहीही न घेता तो दुकानातून निघून गेला; मात्र दुपारनंतर बर्फीची विक्री वाढली. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी हाच प्रकार घडू लागला. तीच वेळ, वेगवेगळे पदार्थ टेस्ट करणे, काहीही न घेता निघून जाणे आणि विक्री भरपूर वाढणे. सारं काही अविश्वसनीय.नक्कीच त्या इसमाकडे काहीतरी दैवी शक्ती असावी. आता तर दुकानातील प्रत्येक जण गुरुवारची आणि सकाळी साडेदहा वाजता त्या इसमाच्या येण्याची वाट पाहू लागले.

गुरुवारची सकाळ. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील मिठाईच्या दुकानात साधारणतः साडेदहा वाजता एका इसमाने प्रवेश केला. वयाची साठी पार केलेली, मध्यम उंची, सडपातळ बांधा, गोरापान वर्ण, तुरळक पांढरे केस, पांढराशुभ्र कुर्ता-पायजमा, डोळ्यांवर छानसा चष्मा आणि चेहऱ्यावर अलौकिक तेज. त्याच्या येण्याने एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे सगळ्यांना जाणवले.

त्या तेजस्वी इसमाने दुकानातील प्रत्येक काउंटरवर जाऊन न्याहाळणी केली आणि शेवटी पेढ्यांच्या काउंटरपाशी येऊन थांबला. पेढ्यांचा प्रत्येक प्रकार टेस्ट केला, सगळ्यांना वाटले की तो बरीच मोठी खरेदी करणार; परंतु काहीही खरेदी न करता तो दुकानातून निघून गेला. फुकटचे पेढे खाल्ले, घ्यायचे नव्हते तर मग कशाला आला? अशी होणारी चर्चा दुपारनंतर थांबली आणि त्याला कारणही तसेच होते. दुपारनंतर पेढ्यांच्या विक्रीत खूप मोठी वाढ झाली.

पुढच्या गुरुवारीही साडेदहा वाजता तो इसम आला, सर्वत्र सकारात्मक ऊर्जा पसरल्याचा भास झाला. त्याने बर्फीचा प्रत्येक प्रकार टेस्ट केला आणि काहीही न घेता तो दुकानातून निघून गेला; मात्र दुपारनंतर बर्फीची विक्री वाढली. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी हाच प्रकार घडू लागला. तीच वेळ, वेगवेगळे पदार्थ टेस्ट करणे, काहीही न घेता निघून जाणे आणि विक्री भरपूर वाढणे. सारं काही अविश्वसनीय.नक्कीच त्या इसमाकडे काहीतरी दैवी शक्ती असावी. आता तर दुकानातील प्रत्येक जण गुरुवारची आणि सकाळी साडेदहा वाजता त्या इसमाच्या येण्याची वाट पाहू लागले. त्याने काहीही न घेण्याची चर्चा होण्याऐवजी आता त्याच्या येण्याने निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेची आणि वाढणाऱ्या विक्रीची चर्चा होऊ लागली.

सहा महिन्यांनी दुकानात नवीन मॅनेजर आले. अनेक प्रकार टेस्ट करून काहीही न घेता निघून जाणाऱ्या इसमाचा मॅनेजर साहेबांना राग आला आणि पुढील गुरुवारी त्यांनी त्या इसमाला कडक शब्दांत बजावले, काही खरेदी करायचे असेल तरच टेस्ट करा नाहीतर निघा येथुन. हे दुकान आहे, फुकट मिठाई वाटणारी धर्मशाळा नव्हे. कॅशियरने मॅनेजर साहेबांना समजवायचा प्रयत्न केला; परंतु मॅनेजर साहेबांनी अजिबात ऐकले नाही. विक्री कमी झाली तरी चालेल परंतु याला मी फुकट टेस्ट घेऊ देणार नाही मॅनेजर साहेबांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर मात्र तो तेजस्वी इसम त्या दुकानात फिरकला नाही. परिणाम व्हायचा तोच झाला, दुकानाची विक्री मोठ्या प्रमाणात कमी झाली. तो तेजस्वी इसम दुकानासाठी लकी आहे अशी सगळ्यांची पक्की खात्री झाली.

पुढच्या एक महिन्यात दुकानाची विक्री वाढली नाही तर नोकरी सोडून जा, मॅनेजर साहेबांना शेठजींनी तंबी दिली. याचा परिणाम म्हणून की काय मॅनेजर साहेब आजारी पडले आणि ४-५ दिवस दुकानात येऊ शकले नाहीत. त्यांच्या घरच्यांनाही खूप टेन्शन निर्माण झाले. दोन-तीन दिवसांनी एक चमत्कार झाला. तो तेजस्वी इसम अनपेक्षितपणे दुकानात आला आणि पूर्वीप्रमाणेच विक्रीत वाढ झाली. मॅनेजर साहेब बरे झाल्यावर दुकानात रुजू झालेत. सर्वांनी मिळून मॅनेजर साहेबांना समजावून सांगितले की त्या तेजस्वी पुरुषाचा अपमान करू नका. साहेबांचा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता; परंतु आता काही इलाजही नव्हता. त्या इसमाचे दर गुरुवारी येणे सुरू राहीले, दुकानातील विक्रीची वाढ झाली, परिणामतः मॅनेजर साहेबांची नोकरी वाचली. आता मॅनेजर साहेब सुध्दा त्या तेजस्वी पुरुषाचे भक्त झालेत. या सर्वामागे तो तेजस्वी पुरुष आहे, त्याच्याकडे कोणतीतरी दैवी शक्ती आहे ही भावना दृढ झाली आणि त्याला कधीही तडा गेला नाही.

यामागचे रहस्य काय होते? कोणती शक्ती होती यामागे?
त्याचे असे झाले, मॅनेजर साहेबांच्या वडिलांनी त्यांचे टेन्शन त्यांच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये सांगितले. त्यांच्या मित्रांपैकी एक खूप सधन आणि दानशूर होता जो वेगवेगळ्या वृद्धाश्रमांना आणि वसतीगृहांना मिठाई घेण्यासाठी पैसे पाठवुन कोणत्या दुकानातून कोणता पदार्थ घ्यावा हे सांगत असे. दुकानातील मॅनेजर अर्थात मित्राच्या मुलाने अपमान केलेला तेजस्वी पुरुष तोच होता. मित्राच्या घराची घडी विस्कटू नये यासाठी अपमान विसरून त्याने त्या दुकानात जाणे परत सुरू केले. या सर्व गोष्टींमागे कोणतीही दैवी शक्ती नव्हती; परंतु एका दानशूर माणसाचे औदार्य आणि कृपादृष्टी नक्कीच होती. प्रसिद्धीच्या झोतात न येता गरजुंना मदत करण्याची प्रामाणिक वृत्ती होती. वृध्दांना आणि विद्यार्थ्याना उच्च गुणवत्तेचे पदार्थ खाऊ घालण्याची भुक होती.  दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती. - दिलीप कजगावकर. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 मंदिरांच्या भूमीतून