गद्दार गेल्यानंतर शिवसेना आणखी मजबूत -खा.राजन विचारे

 

कोपरखैरणे येथे शिवर्जना मेळावा भगव्या जल्लोषात संपन्न

नवी मुंबई ः बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना संपली अशी बोंबाबोंब गद्दारांनी सुरु केली असली तरी त्यामध्ये काही तथ्य नाही. उलट गद्दारांच्या रुपाने कचरा बाहेर पडल्यामुळे शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकानंतर मतदार गद्दारांना त्यांची जागा दाखवणार आहेत. त्यांनी मातोश्री आणि शिवसैनिकांना दिलेल्या त्रासाचा बदला महाराष्ट्र घेणारआहे.  निवडणुकीनंतर गद्दार औषधालाही सापडणार नाहीत, असा घणाघात खासदार राजन विचारे यांनी कोपरखैरणे येथे आयोजित ‘शिवगर्जना मेळावा'मध्ये शिंदे
गटावर केला.या मेळाव्याला ऐरोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.


कोपरखैरणे, सेक्टर-१० मधील लोहाणा समाज हॉलमध्ये १ मार्च रोजी सायंकाळी शिवगर्जना मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. गद्दार गेल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. गद्दार बाहेर जाण्याची प्रत्येक जण वाट पाहत होता. त्यांच्याबरोबर फक्त ठेकेदार गेले असून निष्ठावंत शिवसैनिक जागेवर राहिले आहेत. त्यामुळे ‘शिवसेना'चा भविष्यकाळ फार उज्ज्वल आहे, असेही
विचारे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी माजी आमदार योगेश घोलप, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, नवी मुंबई संपर्कप्रमुख निलेश पराडकर, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हा संघटक सौ.रंजना शिंत्रे, संपर्क, संघटक सौ. रंजना नेवाळकर, संपर्कप्रमुख विद्याधर चव्हाण, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, एम. के. मढवी, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते विजयानंद माने, पुनम आगवणे, विनया मढवी, ‘युवा सेना'चे प्रदेश सचिव करण मढवी, चेतन नाईक, शशिकला पराजुली, डी. आर. पाटील,  मंगेश सावळी, रवींद्र म्हात्रे,
सुर्यकांत मढवी, राजू आव्हाड, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय मोरे यांनी केले.


काळ कठीण; पण संघर्ष शिवसैनिकांसाठी जुनाच...
सध्या आपला काळ कठीण आहे. आपल्याला संघर्ष करावा लागत असला तरी तो आपल्यासाठी नवीन नाही. गद्दारांनी कपट कारस्थान करुन आपल्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह चोरले. असे असले तरी कपट कारस्थान करुन हेतू साध्य होत नाही. भविष्यकाळ आपलाच असणार आहे. ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईत शिवसेना पुन्हा नव्या जोमाने आणि मोठ्या ताकदीने उभा राहणार आहे, असा विश्वास जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शेकडो कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनामध्ये प्रवेश