डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन

‘आरपीआय'चे यशपाल ओहोळ यांचे उपोषण मागे

नवी मुंबई ः नवी मुंबई शहरात महत्त्वाच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाविरोधात ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)'चे नवी मुंबई युवक अध्यक्ष ॲड. यशपाल ओहोळ यांनी २७ फेब्रुवारी रोजी वाशीत सुरु केलेले आमरण उपोषण, महापालिकेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने २८ फेब्रुवारी रोजी मागे घेण्यात आले.

दरम्यान, महापालिका आयुक्त नार्वेकर यांच्या वतीने समाज विकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सहाय्यक आयुक्त दत्तात्रय घनवट यांनी भेट देऊन उपोषण थांबण्याची विनंती केली होती. मात्र, ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे ॲड. ओहोळ यांनी सांगितले. अखेरीस आयुवत राजश नार्वेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर यशपाल ओहोळ यांनी सहाय्यक आयुक्त घनवट आणि पक्षाचे केंद्रीय सचिव सुरेश बारशिंगे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले.

माजी आमदार गणेश नाईक यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मागण्यासंदर्भात येत्या ४ मार्च रोजी आयुक्त नार्वेकर यांची भेट घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह इतर मागण्या पूर्ण करुन घेण्यात येतील, असे यशपाल ओहोळ यांना सागितले. गेल्या २७ वर्षापासून ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे माजी नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी पक्षातर्फे अनेक आंदोलने उभारुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा विषय जिवंत ठेवला होता. अखेर आंदोलनाला यश आल्याचे ॲड. यशपाल ओहोळ यांनी सांगितले.

दरम्यान, या उपोषणावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंगे, प्रदेश उपाध्यक्ष तथा निरीक्षक सिद्राम ओहोळ, मराठा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे, युवक राज्य सरचिटणीस डॉ. विजय मोरे, केंद्रीय निरीक्षक बी.के.बर्वे, रोजगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगताप, लोकशाहीर संभाजी भगत, राज्य उपाध्यक्ष महिला शशिकला जाधव, ‘काँग्रेस'चे अंकुश सोनवणे, माजी नगरसेविका सौ. हेमांगी सोनवणे, ‘भाजपा'चे राजेंद्र इंगळे, सुरेश गायकवाड, ॲड. दीपक गायकवाड, आदिंनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 गद्दार गेल्यानंतर शिवसेना आणखी मजबूत -खा.राजन विचारे