नवी मुंबईतील विविध विषयांवर विविध मागण्यासाठी ‘आरपीआय'तर्फे आमरण उपोषण

समस्या-मागण्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष !

नवी मुंबई ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे पक्षाचे नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष ॲड. यशपाल ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली २७ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील विविध विषयांवर विविध मागण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

नवी मुंबईमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी ‘आरपीआय'च्या वतीने सातत्याने मोर्चे, आंदोलन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुतळा उभारण्यासंबंधी डॉ. आंबेडकर स्मारक लोकार्पणावेळी महापालिका आयुक्तांना सांगितले होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या इशारा मोर्चा वेळी तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘आरपीआय'चया शिष्टमंडळाला आश्वासन देऊन
संबंधीत विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता संजय देसाई यांना स्थळ पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर समाज विकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या माध्यमातून ऐरोली दिवानाका चौक येथे १ जून २०२२ रोजी स्थळ पाहणी करण्यात आली होती. त्याकडे नंतर दुर्लक्ष करण्यात आले. परंतु, शहर अभियंता संजय देसाई यांनी २९ जून २०२२ रोजी कोळी बांधवांचा पुतळा बसविण्यासाठी चे निविदा काढून तेथे रातोरात बसविण्यात आले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शहर अभियंता देसाई यांचा छुपा विरोध आहे का? असा सवाल रिपब्लिकन पक्षाने केलेला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळा बसविण्यासंदर्भात महापालिकेच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत, असा आरोपही ‘आरपीआय'चे नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष ॲड. यशपाल ओहोळ यांनी केला आहे.

दुसरीकडे शहर अभियंता संजय देसाई यांच्या बदलीसाठी पक्षाने सातत्याने पाठपुरावा करुन त्यांची बदली करण्यात आलेली नाही. तसेच झोपडपट्टीतील प्रश्न, विविध समस्या, सफाई कामगारांच्या बाबतीत समान काम समान वेतन,
विकी इंगळे मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या वैद्यकीय अधीक्षक आणि संबंधित डॉक्टरांना निलंबित अथवा त्यांची बदली करण्यात यावी, नवी मुंबई महापालिकेच्या मध्यवर्ती रुग्णालयांमध्ये सुपर स्पेशालिस्टी डॉक्टरची सोय, एमआरआय मशीनची व्यवस्था करण्यात यावी, अशा विविध मागण्यांच्या संदर्भात पाठपुरावा करुन, मोर्चे आंदोलन करुन महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे २७ फेब्रुवारी पासून महापालिका प्रशासनाविरोधात आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचे ‘आरपीआय'चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा निरीक्षक सिद्राम ओहोळ, मराठा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी
सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई मध्ये ‘एमआयएम'च्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन