आ. गणेश नाईक यांची दिघा स्थानकात पाहणी

दिघा रेल्वे स्थानकातील पार्किंग  प्रश्नाकडे दुर्लक्ष

नवी मुंबई ः ट्रान्स-हार्बर मार्गावरील पूर्णत्वाकडे जात असलेल्या नवीन दिघा स्थानकाच्या कामाची पाहणी आमदार गणेश नाईक यांनी २४ फेब्रुवारी रोजी केली. दिघा स्थानकामध्ये प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा सुविधा मिळवून देण्याविषयी तसेच येथील अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याबरोबर येत्या ३ मार्च २०२३ रोजी बैठक होणार असल्याची माहिती आमदार गणेश नाईक यांनी यावेळी दिली. विशेषत्वाने दिघा रेल्वे स्थानकातील पार्किंगचा प्रश्न्‌ सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नाईक म्हणाले.

दरम्यान, दिघा स्थानक अजून अपूर्ण अवस्थेत आहे. या स्थानकामधील सर्व कामेपूर्ण झाल्यानंतर लवकरात-लवकर या स्थानकाचे लोकार्पण होईल, अशी अपेक्षा आमदार नाईक यांनी व्यक्त केली. सदर पाहणी प्रसंगी आ. गणेश नाईक यांच्यासोबत माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका सौ. नेत्रा शिर्के, नवीन गवते, ‘भाजपा'चे पदाधिकारी, एमआरव्हीसी आणि रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

२००९ साली तत्कालीन खासदार संजीव नाईक यांनी दिघा रेल्वे स्थानकाची मागणी केली होती. तसेच सदर स्थानक उभे राहण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. या स्थानकाला स्थानिकांच्या मागणीनुसार दिघा रेल्वे स्थानक असे अधिकृत नाव मिळायला हवे. खैरणे-बोनकोडे स्थानक होणे देखील काळाची गरज आहे, असे आ. गणेश नाईक यावेळी म्हणाले.
सर्वसाधारणपणे रेल्वे स्थानक तयार झाल्यानंतर त्यांची योग्य प्रकारे देखभाल होत नाही, असा अनुभव आहे. रेल्वे ट्रॅक मधील स्वच्छता काटेकोरपणे होत नाही. या पार्श्वभूमीवर येथील स्वच्छतेची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेला देऊन त्या मोबदल्यात जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न कमविण्याचे अधिकार महापालिकेला द्यावेत, अशी सूचना देखील नाईक यांनी केली आहे. दिघा स्थानकात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि अन्य कामे यासाठी येथील स्थानिकांचा प्राधान्याने विचार करावा. माजी नगरसेवक नवीन
गवते यांनी मागण्यांचे निवेदन दिले असून त्यांनी स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे. या सर्व विषयांवर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी आपण चर्चा करणार असून त्यामध्ये निश्चितच यश येईल, असे आ. गणेश नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, दिघा रेल्वे स्थानक कार्यान्वित झाल्यानंतर दिघावासीय आणि या भागातील औद्योगिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या लाखो कामगारांना ठाणेकडे जाण्यासाठी ऐरोली स्थानकात जाण्याचा फेरा वाचणार आहे. दिघा स्थानकातून आता थेट ठाणे स्थानकात जाता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे, अशी प्रतिक्रिया संजीव नाईक यांनी दिली.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्कायवॉक...
दिघा रेल्वे स्थानकासमोरील रस्ता अतिशय वर्दळीचा असून येथून रस्ता ओलांडणे धोक्याचे आहे. छोटे-मोठे अपघात वारंवार येथे होताना दिसतात. सदर बाब लक्षात घेता आ. गणेश नाईक यांनी राज्य सरकारकडून ऐरोली विधानसभा क्षेत्रासाठी मंजूर करुन आणलेल्या दहा कोटी रुपयांच्या विशेष निधीमधून दीड कोटी रुपये खर्चून दिघा रेल्वे स्थानकासमोर स्कायवॉक बांधण्यात येणार आहे. सदर स्कायवॉक बांधून पूर्ण झाल्यानंतर लहान मुले, वृध्द, अपंग, महिला आणि सर्व प्रवाशांना येथून सुरक्षितपणे स्थानकामध्ये येता येणार आहे किंवा बाहेर जाता येणार आहे.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील आठवे स्थानक...
नवी मुंबईतून जाणाऱ्या ट्रान्स-हार्बर मार्गावरील दिघा आठवे स्थानक आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकानंतरचे (वाशीच्या दिशेने) पहिले आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील ऐरोली स्थानकानंतरचे (ठाण्याच्या दिशेने) स्थानक आहे. या स्थानकाच्या निर्मितीसाठी अंदाजे ९० कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे.

नवी मुंबई कल्याण जंक्शनला जोडणार...
भविष्यामध्ये दिघा स्थानकातून एलिव्हेटेड मार्गाच्या माध्यमातून कळवा आणि पुढे कल्याण रेल्वे जंक्शन अशी संलग्नता निर्माण होणार आहे. त्याबाबतचे काम प्रगतीपथावर आहे. ५१९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद या रेल्वे प्रकल्पासाठी करण्यात आली असून एमआरव्हीसी पहिल्यांदाच अशा प्रकारे एलिवेटेड मार्गाची निर्मिती करीत आहे. एकूण ५१९ कोटी निधीमधून ९० कोटी रुपये निधी दिघा स्थानकासाठी खर्च करण्यात आले आहेत.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील सर्व स्थानकांमध्ये पार्किंगची पुरेशी व्यवस्था आहे. मात्र, दिघा स्थानकामध्ये पाकर्िंगची व्यवस्था नाही. पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सोबत बैठकीत चर्चा करण्यात येईल.  खैरणे-बोनकोडे स्थानक देखील रेल्वे प्रशासनाकडून मंजूर करुन घेतले होते. मात्र, त्याबाबत राजकारण झाल्याने रेल्वे स्थानक पूर्ण होऊ शकले नाही. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु आहे. ज्याप्रमाणे नवी मुंबईतील अन्य स्थानकांमध्येव्यावसायिक इमारती उभ्या राहिल्या आहेत, त्याचप्रमाणे भविष्यात दिघा स्थानकाचा देखील व्यावसायिक आस्थापनांसाठी उपयोग होईल. -आमदार गणेश नाईक, ऐरोली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईतील विविध विषयांवर विविध मागण्यासाठी ‘आरपीआय'तर्फे आमरण उपोषण