शेकाप नेते दिलीप भोईर भाजपमध्ये  

अलिबागमध्ये शेकापला मोठा हादरा

पनवेल : अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा शेकापचे मापगाव मतदारसंघातील दमदार नेते दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ व त्यांच्या निवडक सहकार्‍यांनी आज (मंगळवार, दि. ७) मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. लवकरच त्यांच्या असंख्य समर्थकांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

         दिलीप भोईर हे गेली २५ वर्षे राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाला २००७ नंतर खर्‍या अर्थाने कलाटणी मिळाली. त्यांनी झिराड ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार निवडून आणून आपली सत्ता प्रस्थापित केली. गावकर्‍यांनी पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना व त्यांच्या समर्थकांना निवडून दिले. मतदारांचा विश्वास कुठेही ढळू न देता त्यांनी गावात विकासकामे केली. पुढे हाच विश्वास मापगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांनी सलग दोन निवडणुकांमध्ये दाखवला. २०१२ आणि २०१७ या दोन निवडणुकांमध्ये ते शेकापमधून निवडून आले, मात्र मागील काही महिने भोईर आणि शेकाप नेत्यांमध्ये दरी निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी या सर्व चर्चेला पूर्णविराम देऊन भोईर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘एनएमएमटी'च्या आगारांमध्ये उपहारगृह सुरु करण्याची मागणी