ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून बाळाराम पाटील यांच्यावर दणदणीत विजय

कोकण शिक्षक मतदारसंघात ‘भाजप'ने उधळला गुलाल

वाशी ः कोकणातील पाच जिल्ह्यामधील शिक्षकांचा मतदार संघ असलेल्या कोकण शिक्षक मतदारसंघात शेकाप अर्थात ‘मविआ'चे उमेदवार बाळाराम पाटील यांचा दहा हजार मतांनी भाजप पुरस्कृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पराभव केला. नेरुळ येथे मतमोजणी केंद्रात ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयी घोषित केल्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत गुलाल उधळला.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यातील ३५ हजार शिक्षकांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. सर्वाधिक मतदान ठाणे जिल्ह्यात असल्याने विजयाची मदार ठाणे जिल्ह्यावर अवलंबून होती. मूळचे बदलापूर येथील ज्ञानेश्वर म्हात्रे यांना ‘बाळासाहेबांची शिवसेना' या पक्षाचा पाठींबा होता. ‘भाजप'ने पाठींबा दिलेल्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजार ६४७ तर बाळाराम पाटील यांना १० हजार ४४२ मते मिळाली. विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा पराभव करत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दणदणीत विजय मिळवला. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत ‘भाजप'चे ज्ञानेश्वर म्हात्रे आणि ‘महाविकास आघाडी'चे बाळाराम पाटील यांच्यात होती. या लढतीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बाजी मारल्याने ‘भाजप'ला आणखी एक विजय मिळवता आला आहे.

निवडणुकीत एकूण १३ उमेदवारी अर्जांपैकी ५ उमेदवारी अर्ज मागे घ्ोण्यात आले होते. यात वेणू कडू यांना भाजप नेत्यांनी गळ घालून माघार घ्ोण्यास सांगितल्याने ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजयातील अडसर दूर झाला होता. त्यामुळे एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ज्ञानेश्वर म्हात्रे आणि बाळाराम पाटील यांचा अपवाद वगळता उर्वरित उमेदवारांना अवघ्या तीन हजार मतांचा देखील पल्ला गाठता आलेला नाही.

 ३० जानेवारी २०२३ रोजी कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदान झाल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी नेरुळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन मध्ये मतमोजणी करण्यात आली. अवघ्या तीन तासात मतमोजणी पूर्ण झाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घ्ोतल्याने त्यांचा विजय निर्श्चित मानला जात होता. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागीय उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाची घोषणा केली. कोकण शिक्षक मतदारसंघात एकूण ९१.०२ टक्के मतदान होवून ३५ हजार ७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला होता. कोकण शिक्षक मतदारसंघात १७ हजार ९ पुरुष तर २१ हजार ५२० स्त्री मतदार असे एकूण ३५ हजार ५२९ शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी १६ हजार १२८ पुरुष तर १८ हजार ९४२ स्त्री  अशा एकूण ३५ हजार ७० शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

सर्वाधिक मतदान ठाणे जिल्ह्यात असल्याने ठाणे जिल्ह्याला अधिक महत्व होते. ठाणे जिल्ह्यात ८८.८६ टक्के मतदान झाले होते. ६ हजार २९ पुरुष तर ९ हजार २७१ स्त्री मतदार अशा एकूण १५ हजार ३०० शिक्षक मतदारांपैकी ५ हजार ६३४ पुरुष तर ७ हजार ९६१ स्त्री अशा एकूण १३ हजार ५९५ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
कोकण शिक्षक मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली एकूण मते
एकूण मतदान- ३५२६९, वैध -  ३३६५०, अवैध - १६१९
विजयाचा कोटा - १६७२६
- ज्ञानेश्वर म्हात्रे - २०६८३
- धनाजी पाटील -  १४९०
- उस्मान रोहोकर - ७५
- तुषार भालेराव - ९०
- रमेश देवरुखकर - ३०
- बाळाराम पाटील - १०९९७
- सोनवणे - ६३
- संतोष डामसे - १६ 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘नवी मुंबई इंटक'चा तेरणा रुग्णालय व्यवस्थापनाला दणका