माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी शिंदे गटात नाराज?

वाशी ः आम्ही कार्यकर्त्यांना कामे दिली आहेत; मात्र पदाधिकारी जनतेच्या काही कामानिमित्त अधिकाऱ्यांना भेटले तर तेथे कामे होत नाहीत. याबाबत मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करुन देखील कामे होत नाहीत. त्यामुळे पक्ष सोडून द्यावा असे वाटते, अशी खंत माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी बोलून दाखवली आहे. सदर ववतव्यामुळे सुरेश कुलकर्णी शिंदे गटात नाराज आहेत का? अशी चर्चा नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सुरेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून तुर्भे स्टोअर येथे भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. आमदार गणेश नाईक यांचे ३० वर्षाहून अधिक काळ खंदे समर्थक म्हणून सुरेश कुलकर्णी यांची ओळख होती. मात्र, २०१९ मध्ये भाजप-सेना युती तुटून राज्यात महविकास आघाडी सरकार आले. त्यामुळे तुर्भे स्टोअर मधील रहिवाशांना चांगली घरे मिळावी म्हणून गणेश नाईक यांच्या सोबत फारकत घेत तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरेश कुलकर्णी यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. मात्र, जून २०२२ मध्ये राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना फोडून ‘भाजपा'च्या पाठींब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी सुरेश कुलकर्णी शिंदे सोबत राहिले. मात्र, ज्यांच्यासाठी भाजप आमदार गणेश नाईक यांची सुरेश कुलकर्णी यांनी साथ सोडली त्याच ‘भाजपा'च्या पाठिंब्यावर आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. परंतु, मुख्यमंत्री असून देखील कामे होत नसल्यामुळे सुरेश कुलकर्णी नाराज आहेत. सदरची नाराजी कुलकर्णी यांनी जाहीर कार्यक्रमातून बोलून दाखवल्याने गवते परिवारापाठोपाठ सुरेश कुलकर्णी देखील पुन्हा नाईक यांच्या तंबूत पुन्हा परततील का? अशी चर्चा आता नवी मुंबईत रंगू लागली आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून बाळाराम पाटील यांच्यावर दणदणीत विजय