फुटबॉल टर्फ १५ दिवसांत निष्कासित करा; अन्यथा करारनामा रद्द ‘सिडको'ची शैक्षणिक संस्थांना नोटीस

नवी मुंबई ः सार्वजनिक वापरासाठी असलेल्या मैदानांवर अवैधरित्या फुटबॉल टर्फ उभारन नवी मुंबईतील मैदाने बळकावल्याप्रकरणी खाजगी शिक्षण संस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'ने ‘सिडको'च्या सामाजिक सेवा विभागाच्या महाव्यवस्थापकांकडे केली होती. याची दाखल घेत सिडको प्रशासनाने १८ जानेवारी २०२३ रोजी संबंधित खाजगी शिक्षण संस्थांना नोटीस काढून फुटबॉल टर्फ १५ दिवसांत निष्कासित करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय तसे न केल्यास सिडको प्रशासन संबंधित शिक्षण संस्थांचे करारनामे रद्द करेल, असा इशारा देखील सदर नोटीस द्वारे देण्यात आल्याचे ‘मनसे' म्हटले आहे. दरम्यान, शिक्षण संस्थांनी ‘सिडको'च्या आदेशाचे पालन न केल्यास मनसे तीव्र आंदोलन करुन बेकायदेशीर फुटबॉल टर्फ उखडून टाकेल, असा इशारा ‘मनसे'चे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे.

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने ‘सिडको'ने शिक्षण संस्थांना मैदाने उपलब्ध करुन दिली आहेत. शैक्षणिक वेळे व्यतिरिक्त सदर मैदाने सर्वसामान्यांसाठी खुली ठेवणे सिडको सोबत केलेल्या करारनाम्यानुसार बंधनकारक आहे. परंतु, नवी मुंबईतील अनेक शिक्षण संस्थांनी सार्वजनिक मैदाने बंदिस्त करुन त्यावर पक्के बांधकाम करीत फुटबॉल टर्फ उभारले आहेत. तसेच फुटबॉल टर्फ त्रयस्थ संस्थांना भाडे तत्वावर देऊन या सार्वजनिक मैदानांचा आर्थिक फायद्यासाठी गैरवापर सुरु केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना या बंदिस्त मैदानांचा वापर करण्यास सदर शिक्षण संस्था मज्जाव करीत असतात. याबाबत ‘मनसे'कडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे गजानन काळे यांनी सांगितले.

फुटबॉल टर्फच्या माध्यमातून लाखोंचा मलिदा खाण्याचे काम राजरोसपणे शिक्षण संस्था चालक करीत आहेत. या फुटबॉल टर्फ वर १० ते १२ तास फुटबॉल खेळण्याकरिता तासाला १८०० ते २००० रुपये इतके शुल्क शिक्षण संस्था चालक बेकायदेशीरपणे आकारत आहेत. त्यातून दिवसाला १८००० ते २०००० रुपयांपर्यंत तर महिन्याला जवळपास सहा ते आठ लाखांची कमाई करीत आहेत. त्यामुळे ‘मनसे'बरोबर केलेल्या करारनाम्याचे सरळपणे उल्लंघन आहे. ‘सिडको'ने दिलेल्या या मैदानांचा व्यावसायिक वापर करण्याचा अधिकार शिक्षण संस्थांना नसल्याचे नाही. तरी देखील सदर खाजगी शिक्षण संस्था चालक मुजोरपणे खेळाची मैदाने बंदिस्त करुन त्यावर काँक्रीटीकरण आणि कृत्रिम गवत लावून फुटबॉल टर्फ बनवत आहेत. तसेच ते टर्फ त्रयस्थ संस्थांना भाडे तत्वावर देत आहेत. त्यामुळे स्थानिकांना आणि विद्यार्थ्यांना देखील या मैदानांचा वापर करता येत नसल्याचे ‘मनसे विद्यार्थी सेना'चे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी सांगितले.

‘मनसे'च्या पाठपुराव्यानंतर ‘सिडको'ने या शिक्षण संस्थांना नोटीस जाहीर केल्या आहेत. या नोटीसद्वारे दिलेल्या  आदेशानुसार येत्या १५ दिवसांत सर्व फुटबॉल टर्फ निष्कासित करण्यात यावेत. तसे न केल्यास सिडको आपला करारनामा रद्द करेल. यावर आक्रमक भूमिका घेत ‘मनसे'ने देखील सदर सर्व दोषी शिक्षण संस्थांनी १५ दिवसांत फुटबॉल टर्फ निष्कासित न केल्यास तीव्र आंदोलन करुन फुटबॉल टर्फ उखडून टाकू. गजानन काळे, शहर अध्यक्ष - मनसे, नवी मुंबई.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘आप'तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा