‘महायुती'चे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ कोपरखैरणेत सभा संपन्न

नवी मुंबई ः शिक्षकांच्या कथा आणि व्यथा जाणून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम करणारे कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील ‘भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिक्षक परिषद आणि मित्रपक्ष महायुती'चे उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. शिक्षकांसाठी शिक्षकच उमेदवार आमदार झाला पाहिजे आणि ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षक असल्याने त्यांचा विजय आता केवळ औपचारिकता असल्याचेही नाईक यांनी सांगितले.

‘महायुती'चे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारसभेचे आयोजन २४ जानेवारी रोजी ‘भाजपा-नवी मुंबई'च्या वतीने कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयामध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग ठाणे जिल्ह्यातून उपस्थित होता. माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपा समन्वयक प्रा. वर्षा भोसले यांच्यासह ‘महायुती'चे ठाणे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांचे प्रतिनिधी सद सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित देश म्हणून भारताची दमदार वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे  आणि देवेंद्र फडणवीस सरकार शिक्षक वर्ग आणि संबंधित घटकांचे प्रश्न सोडवीत आहे, असे सांगत आमदार नाईक यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रुपाने एक अभ्यासू आणि शिक्षकांसाठी अविरत कार्यरत असणारा उमेदवार कोकण विभाग मतदार संघासाठी आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

कोकणातील पाचही जिल्ह्यातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदार नोंदणी झाली असून ठाणे जिल्हा ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयासाठी आघाडी मिळवून देईल, अशी खात्री देखील नाईक यांनी दिली. आपल्या मनोगतातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मागील आठ वर्ष सातत्याने शिक्षक वर्गांचे प्रश्न सोडवीत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करुन शाळा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावला आहे. सुमारे ११०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाल्यावर यासंबंधीचा जीआर सरकार काढेल, अशी माहिती त्यांनी दिली.

अनुदानानंतरचा सर्वात महत्त्वाचा शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय निवृत्ती वेतन असून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू असून शिंदे-फडणवीस सरकार या दृष्टीने सकारात्मक आहे. वरिष्ठ शासकीय अधिकारी स्तरावर या विषयाचा अभ्यास सुरु आहे. जुनी पेन्शन योजना देखील शिक्षकांना लागू होईल, असा विश्वास ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बोलून दाखवला.

२०१७ च्या कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुकीमध्ये मत विभाजनाचा फायदा मिळवून विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून आला होता. मात्र मागील सहा वर्षे या आमदाराने शिक्षक हिताचे कोणतेच काम केले नाही अशी शिक्षक वर्गाची तक्रार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र आम्ही सर्व एकजूट असून शिक्षक असलेला उमेदवारच आमदार म्हणून निवडून देण्याचा निर्धार शिक्षकांनी केलेला आहे आणि त्यामुळे मला विजयाची खात्री आहे, अशा भावना ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केल्या.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 फुटबॉल टर्फ १५ दिवसांत निष्कासित करा; अन्यथा करारनामा रद्द ‘सिडको'ची शैक्षणिक संस्थांना नोटीस