आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याने नवी मुंबईत भगवा जल्लोष

नवी मुंबईत भगवे वादळ...

नवी मुंबई ः जनतेचा पैसा कसा वापरला जात आहे यावर सध्या कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे राज्यातील ईडी सरकार अत्यावश्यक असलेल्या प्रकल्पांचा पैसा गरज नसलेल्या ब्युटीफिकेशनवर खर्च करीत आहे. अल्पायुशी खोके सरकार कडून होणारी पैशांची उधळपट्टी थांबवण्यासाठी निवडणुका होणे गरजेचे आहे. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी आले तरच या उधळपट्टीवर नियंत्रण येणार आहे. मात्र, जनतेच्या दरबारातील निकाल अल्पायुशी सरकारच्या विरोधात जाणार असल्याने त्यांच्यामध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही. खरे विषय लपवण्यासाठी शिंदे गटातील गद्दार उठसुठ शिवसेना पक्षावर टीका करीत आहेत, असा घणाघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबईत केला.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत १४ जानेवारी रोजी नवी मुंबईत विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. वास्तविक पाहता या निवडणुका तातडीने घेणे गरजेचे आहे. लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मात्र, जनतेच्या दरबारातील कौल भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात जाणार आहे. त्यामुळे ते निवडणुका घेण्याची हिंमत करीत नाहीत. महागाई, बेळगावचा प्रश्न यावरील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी शिंदेे गट आणि भाजपवाले वादग्रस्त विधाने करीत आहेत. स्वतःचा पगार वाढवून चांगली पदे पदरात पाडण्यासाठी शिंदे गटातील गद्दारांनी शिवसेनेवर टीका करणे सुरु केले आहे. मात्र, ते जास्त दिवस चालणार नाही. राज्यातील ईडी सरकार अल्पायुशीच आहे. निवडणुकांमध्ये ईडी सरकारला जनता त्यांची जागा दाखवणार आहे, असाही विश्वासही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी शिवसेना खासदार राजन विचारे, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, नवी मुंबई संपर्कप्रमुख निलेश पराडकर, जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, द्वारकानाथ भोईर, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, युवा सेना सहसचिव करण मढवी, उपजिल्हाप्रमुख मिलिंद सुर्यराव, शहरप्रमुख विजय माने, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, जिल्हा युवती अध्यक्षा पुनम आगवणे, विधानसभा युवाधिकारी चेतन नाईक, आदि उपस्थित होते.  

नवी मुंबईत भगवे वादळ...
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला १४ जानेवारी रोजी दुपारी ऐरोली येथून सुरुवात झाली आणि नवी मुंबईत भगवे वादळ उसळले. मोठ्या संख्येने तरुण आणि तरुणी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात सहभागी झाले. मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली. ठिकठिकाणी युवा सेनाप्रमुखांचे भव्य स्वागत करण्यात आले. आदित्य ठाकरे यांना मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी तरुण-तरुणींची आणि विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली. ‘कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला' अशा गगनभेदी घोषणांनी सर्व नवी मुंबई दणाणून गेली.

आपली एकजुट अशीच ठेवा...
शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यात आलेले ईडी सरकार लवकरच पडणार आहे. या सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी आपली एकजूट अशीच ठेवायची आहे. शिंदे गटाने स्वतःसाठी खोके घेऊन महाराष्ट्राला धोके दिले आहेत. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार पाडायचे आहे. त्यासाठी आपली एकजुट अशीच राहू द्या, असे उपस्थितांना आवाहन करुन आदित्य ठाकरे यांनी गद्दारांचा जोरदार समाचार घेतला. ‘पन्नास खोके...' या त्यांनी दिलेल्या  घोषणेला जमावाने ‘एकदम ओके' असा जोरदार प्रतिसाद दिला.

नवी मुंबई ढवळून निघाली...
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला ऐरोली येथून सुरुवात झाल्यावर दिवा कोळीवाडा चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. वाशीमधील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सानपाडा येथे सोमनाथ वास्कर आणि मिलिंद सुर्यराव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नेरुळ गावात नव्याने उघडण्यात आलेल्या शिवसेना शाखेचे उद्‌घाटन झाले.

क्रिकेटचा आनंद लुटला...
सीबीडी-बेलापूर येथील राजीव गांधी स्टेडीयमवर शहाबाज गावातील ग्रामस्थांचे गावकीचे क्रिकेट सामने सुरु आहेत. या स्टेडियमला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन खेळाडुंशी संवाद साधला. त्यांना मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी तरुणांची एकच झुंबड उडाली. यावेळी राजीव गांधी स्टेडीयमवर युवा सेनाप्रमुखांनी क्रिकेट खेळण्याचाही आनंद लुटला. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महविकास आघाडीचे उमेद्वार आमदार बाळाराम पाटील यांच्या समोर तगडे आव्हान