खारघर: आगामी पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पनवेलमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नितळस येथील रामदास पाटील यांची पनवेल तालुका अध्यक्षपदी तर योगेश चिले यांची पनवेल शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, संदेश ठाकूर यांची रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर पनवेल आणि उरण तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रवीण दळवी यांची रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नितळस येथील रामदास पाटील हे यापूर्वी मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे संघटक म्हणून काम करत होते. तसेच नावडे विभाग अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या कार्याची दखल घेत रामदास पाटील यांची पनवेल तालुका अध्यक्षपदी बढती करण्यात आली आहे. याशिवाय रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाचे राज्य कार्याध्यक्ष योगेश चिले यांची पनवेल शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर पनवेल महापालिका क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत.