काही दिवसातच सरकारची काळी कृत्य अधिवेशनात सर्वांना दिसून येतील

पनवेल: देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांचा महाघोटाळा बाहेर काढल्यामुळे राज्य सरकारमध्ये असलेल्या लोकांचे धाबे दणाणले आलेत. जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्याचे पवित्र काम आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते असल्या नोटिसला अजिबातच घाबरत नाहीत. जे सत्य आहे ते लोकांसमोर आणण्याचे आमचे काम आहे आणि आम्ही ते करतो, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नविन पनवेल येथे केले. त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भाजप नगरसेविका राजश्री वावेकर यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू व कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या. यावेळी चित्रा वाघ यांनी कार्यक्रमाच्या आयोजिका नगरसेविका राजश्री वावेकर व महेंद्र वावेकर यांचे तोंड भरून कौतुक केले व यापुढेही महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या अशाप्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनाही दिल्या.
 
  माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामागे पनवेलकरांनी ताकद लावली आहे. कारण त्यांनी पनवेलचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे, असे अभिमानाने चित्रा वाघ यांनी आपल्या मनोगतात सांगितले. याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, उपमहापौर सीताताई पाटील, शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, तेजस कांडपिळे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, रत्नप्रभा घरत, महिला बालकल्याण हर्षदा उपाध्याय, नगरसेविका ऍड वृषाली वाघमारे, दर्शना भोईर, विद्या गायकवाड, पुष्पा कुत्तरवाडे, सभापती संजना कदम, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे, अमरीश मोकल यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
      चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. आणि येणाऱ्या काही दिवसात तुम्ही बघाल की, सरकारची जी काही काळी कृत्य असतील ती पुढे आणण्याचे काम चालू असलेल्या अधिवेशनात सर्वांना दिसून येईल. आत्तापर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीच्या चौकशी झाल्या त्या सत्ताधारी पक्षातील एकाही नेत्याने असे म्हटले नाही की आमच्यावर विनाकारण रेड झाली. एवढेच नाही तर शिवसेनेचे खासदार सर्वज्ञानी संजय राऊत यांनाही ईडीला ५५ लाख रुपये भरायला लागले. त्यामुळे ज्या काही गोष्टी पुढे येत आहेत त्या पुराव्यासकट येत आहेत. ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे ज्यांच्याबद्दल गोष्टी तिथपर्यंत जातात त्याअनुषंगाने कारवाई होते. यात भारतीय जनता पार्टीचे काही हात नाही आणि असण्याचे काही कारणही नाही असेही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.
Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शिवाई महिला मंडळाच्या महिला मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद