मुशाफिरी

आपणा सर्वांनाच जसा पालकांचा, नातेवाईकांचा सहवास हवा असतो, तसाच तो मित्र मैत्रीणींचाही हवाच असतो. एकवेळ बाकीचे सारे पाठ फिरवतील; पण मित्र-मैत्रीणी खंबीर साथ देतात असा अनुभव अनेकांनी घेतला असेल. शाळकरी जीवनापासूनचे हे मित्र-मैत्रीणी सध्या करतात तरी काय, असा प्रश्न काहीजणांना पडू शकतो.

    ‘पुस्तकातील गणित सोडवायला सुत्र आणि आयुष्यातील गणित सोडवायला मित्र हवे असतात',  ‘मैत्री एक सॅलरी आहे आणि या सॅलरीला कुणी विसरत नाही. जी कालांतराने वाढतच जाते. जुनी मैत्री पेन्शनसारखी असते जी रिटायरमेन्ट नंतरही चालतेच.'  ही आणि या सारखी अनेक सुभाषिते मैत्रीचा गोडवा आणि प्रभाव अधोरेखित करणारी आहेत. मैत्रीबद्दल देशविदेशातील विचारवंतांनी तर लिहुन ठेवले आहे. देश, काल, धर्म, प्रान्त, भाषा, जात, लिंग यांच्या जुल्मी सीमा भेदून मैत्री जुळते, जमते, अभेद्य राहते, याचाही अनुभव घेता येईल. जे रवताच्या नात्यांना जमत नाही ते काम मित्र-मैत्रीणी फारसा गाजावाजा न करताही झटकन करुन टाकतात. रोज भेटले पाहिजे असेही काही नाही, रोज फोन केला पाहिजे असाही काही अट्टाहास नाही, पत्रं पाठवलीच पाहिजेत असेही टुमणे नाही; तरीही मैत्रीचे नाते टवटवीत राहते, टिकते, वृध्दींगत होते. मराठी,  हिंदीसह विविध भाषांतील साहित्यिक, पटकथाकार, नाटककार, चित्रपट-मालिका निर्माते यांच्यावर या मैत्रीची भुरळ कायम राहिली असल्याचे पाहायला मिळते. दोस्त, दोस्ती, जिगरी दोस्त, दोस्ताना, याराना, दोस्त होत तो ऐेसा, दोस्ती-दुश्मनी, यार दिलदार, याराेंका यार, यारी, दो यार, दिल चाहता है, थ्री इडियट्‌स, जिंदगी ना मिलेगी दोबारा, दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी, मैत्री जिवाची अशा  अनेक कलाकृती या मैत्रीभोवती फिरताना दिसतील.

   ‘ती सध्या काय करतेय?' नावाचा एक मराठी चित्रपट येऊन गेला, ज्यात अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान यांनी भूमिका केल्या होत्या.  विवाह होऊन बरीच वर्षे झाल्यानंतर आपल्या तरुणवयात आवडणारी एखादी मैत्रीण जी आपली होऊ शकली नाही, ती यानंतरच्या काळात एक मैत्रीण म्हणून तरी आपल्या आयुष्यात कायम राहील या मध्यवर्ती कल्पनेवर तो बेतला होता. या प्रकारची हळहळ खरेतर नंतर उपयोगाची नाही. ती किंवा तो आपल्या जीवनात कायमच जोडीदार म्हणून हवे असल्यास योग्य त्या जलद हालचाली वेळीच करायला हव्यात, नाहीतर तिला/त्याला दुसऱ्याचे होताना मुकाट पाहावे लागते. पण मैत्रीचे असे नसते. मैत्री ही त्याग, समर्पण, दुसऱ्यासाठी झटणे, दुसऱ्याच्या सुखात आनंद मानणे, मित्र-मैत्रीणीला सुखी असताना पाहणे, त्यांचे दुःख वाटून घेणे या व अशा बाबींना अधिक महत्व देत असते. आपल्याला त्याच्या/तिच्याकडून काय मिळेल यापेक्षा आपण तिच्या/त्याच्यासाठी कशा प्रकारे उपयोगी पडू शकतो याला मैत्री प्राधान्य देते. ज्याला/जिला मित्र किंवा मैत्रिणीच नाहीत अशा अभागी जीवांना खुशाल अरसिक, रुक्ष, माणूसघाणे, एकाकी, घरकाेंबडे, तुसडे, एकलकाेंडे समजावे. मैत्री तुमच्या आयुष्याचा एक मोठा भाग व्यापते. बालपण, तरुणपण, गृहस्थी आणि वृध्दावस्था या साऱ्या टप्प्यांत मैत्री आपली साथ निभावते. असे हे वेगवेगळ्या टप्प्यांतील तुमचे मित्र, मैत्रीणी सध्या करतात काय, असा प्रश्न कुणालाही पडणे स्वाभाविक आहे. आता वयाची साठी ओलांडल्यानंतर तर माझ्यासारख्या अनेकांना बालपणापासूनचे अनेक मित्र, मैत्रीणी जसेच्या तसे आठवतात व ते जर आजमितीस या जगात नसतील तर त्यांच्या आठवणींनी जीव व्याकुळ होऊन जातो.

   दोस्ती, मैत्री, यारी वगैरे जडजड शब्दही माहित नव्हते, त्या काळातील..म्हणजे माझ्या बालपणातील १९६७-६८ च्या सुमाराची एक आठवण माझ्या मनात घर करुन राहिली आहे. तेंव्हा आम्ही डोंगरी, मुंबई येथे राहायला होतो. शेजारील घरातल्या ठाकूर परिवारातील बंडु नावाच्या मुलाशी माझी गट्टी जमली. आम्ही सोबत खेळत असू. खाऊ वाटून खात असू. एके दिवशी तो आजारी पडला. त्याला जे.जे.हॉस्पिटलला नेण्यात आले. (त्याचा आणि माझा जन्मही जे.जे. हॉस्पिटलचाच!) दोन तीन दिवसांनी त्याला घेऊन एक गाडी आली. तेंव्हा त्याच्या नाकात कापूस घातलेला होता आणि त्याचे आई-वडील, माझे आईवडील व बाकीचे शेजारी रडत होते. मी जेमतेम चार-साडेचार वर्षांचा असेन. मी आईचा हात खेचून विचारले, ‘हे काय चालले आहे? बंडु झोपलेला का आहे आणि त्याच्या नाकात कापूस का? तो उठून माझ्यासोबत कधी खेळेल?' आईने माझ्या चेहऱ्यावरुन मायेने हात फिरवत सांगितले...‘राजा, आता बंडु तुझ्यासोबत खेळणार नाही, तो देवाघरी चालला आहे. परत येणार नाही.'

   यातला एकही शब्द मला कळला नव्हता. जेंव्हा हे सारे कळले तेंव्हा खूपच उशिर झाला होता. आज तर माझ्या त्या पहिल्यावहिल्या मित्राचा चेहराही मला स्पष्टपणे आठवत नाही. नंतरचा माझा पुढचा शैक्षणिक प्रवास कल्याण भागात झाला. तेथे ज्ञानमंदिर हायस्कूल येथे शालेय शिक्षण घेत असताना मला अनेक मित्र मैत्रीणी लाभल्या. विशेष म्हणजे १९७२ ते १९७८ ही पाचवी ते दहावी अशी केवळ सहाच वर्षेच आम्ही एकत्र होतो. पण मला सांगायला आवडेल की यातले आजही आम्ही वीस ते पंचवीस जण एकमेकांना धरुन आहोत. मधल्या काळात दहावीनंतर सारे विखुरले. मुलींची नावे, गावे, आडनावेही बदलली. मित्र नोकरी शिक्षणानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी गेले. माझ्यासोबत पुढचा महाविद्यालयीन प्रवास करायला दहावीच्या बॅचमधले कुणीही नव्हते आणि झुक्याने व्हाट्‌स अपचा शोधही लावला नव्हता. पण किशोर मार्कंडे या माझ्या शाळासोबत्याने चिकाटी ठेवली आणि २००७ साली तो मला शोधत कल्याणहुन नवी मुंबईत पोहचला. पण पुन्हा बाकीच्यांना जमवेपर्यंत २०१६ साल उजाडले आणि आम्ही दहावी बॅचवाले अनेकजण संजय गवळी या आमच्या वर्गमित्राचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर एकत्र आलो. आज मला सांगायला आनंद होतो की आम्ही केवळ एका वर्गात शिकलेले मित्र मैत्रीणीच एकत्र आलो नाही तर आमचे परिवारही यामुळे एकमेकांना परिचित झाले. किशोर मार्कंडे हा माझा मित्र त्याच्या पत्नी, मुलींसह २०१७ साली वैष्णोदेवी, हिमाचल प्रदेश सहलीत आमच्यासोबत होता. शरद ननावरे, मीनल कर्णिक (विवाहापूर्वीची मंगला गुप्ते), पद्मिनी गुंजाळ (आधीची साळुंखे) नितीन सावंत, निवृत्ती झनकर, दिलीप पवार, मधु सुर्यवंशी, लता जोशी ( विवाहापूर्वीची लता काकडे), शुभांगी बोरिशा (आधीची सितापराव) राजश्री सुर्यवंशी (विवाहापूर्वीची काटकर) विनायक कुलकर्णी, सुनिल कुलकर्णी, सुरेखा घुले (विवाहापूर्वीची सुर्यवंशी), पुष्पा गवळी (विवाहापूर्वीची पाल्हाळ), शालिनी झिपरे (विवाहापूर्वीची इंद्रप्रभा धोंडगे),  मीना जाधव (विवाहापूर्वीची जना वक्टे) विजया मोरे ( पूर्वाश्रमीची रामराजे)  सुरेश महाजन, अँथनी साळवे या आणि अशा अनेक मित्र-मैत्रीणींना आम्ही झुक्याच्या मदतीने शोधले. मधल्या काळात आमच्या त्या १९७२ सालच्या बावन्न वर्षापूर्वीच्या वर्गातील काहीजण वेगवेगळ्या आजारांमुळे हे जग सोडुन गेले होते.

   माझ्या या साऱ्या मित्र-मैत्रीणींनी माझ्या नातेवाईकांइतकेच प्रेम, माया, ममता, आपुलकी, आतिथ्यशीलता, आदरभाव, स्नेह दिला. मी सुमारे १४ वर्षे स्व-मालकीचे साप्ताहिक "वार्तादीप" हे वर्तमानपत्र चालवले. त्याच्या विविध कार्यक्रमांसाठी निधीची गरज भासे, तेंव्हा माझे हे बावन्न वर्षांपूर्वीचे शाळकरी मित्र-मैत्रीणी खंबीरपणे उभे राहिले व मला मदत केली याची कृतज्ञ जाणीव मला आहे. आजही यातले अनेकजण माझ्या थेट संपर्कात आहेत. एकमेकांच्या सुखादुःखाचे आम्ही आत्ताही साक्षीदार आहोत. एकमेकांच्या मुलांच्या विवाहांना, नातवंडांच्या वाढदिवसांना, मातापित्यांच्या अंत्यविधींना, सांत्वनाला एकमेकांच्या घरी जाणेयेणे  असतेच. पण दरवर्षाला किमान दोन ते तीन वेळा आम्ही जवळच्या ठिकाणी सहलीनिमित्त निघून मनसोवत भटकतो. आमची सीकेपी मैत्रीण मीनल कर्णिक आमच्यासाठी अन्नपूर्णा आहे.  आम्ही जातो त्या ठिकाणच्या स्वयंपाकघरात कंबर खोचून उभी राहुन एकापेक्षा एक चवदार पदार्थ तर ती रांधतेच; पण त्या आधीच्या खरेदीसाठीही बाजारात, मासळी मार्केटमध्ये आता साठीनंतरच्या वयातही पायपीट करताना अजिबात दमत नाही हे विशेष! तर शरद ननावरे हा आमचा शाळासोबती आम्ही जिथे सहलीनिमित्त जाऊ तिथे स्वतःची म्युझिक सिस्टीम, माईक, स्पीकर हे सारे घेऊन येतो व कराओकेवर एकाहुन एक सरस गाणी गात आमचे पोटभर मनोरंजनही करत असतो. आमच्या दहावीच्या वर्गातील निवडक मंडळी तर माझ्यासमवेत जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश, केरळ अशाही पर्यटनासाठी सोबत आली असून आता  लवकरच पुढील लांबवरच्या सहलीचे नियोजन केले जात आहे.

   हे झाले दहावीच्या बॅचवाल्यांचे ! मी अकरावी सायन्स, बारावी आर्ट्स, बी.ए.मानसशास्त्र, एम.ए. मराठी साहित्य, एलएलबीचे एक वर्ष, जर्नालिझमचे एक वर्ष असा वळणावळणाचा शैक्षणिक प्रवास केल्याने त्या त्या वर्गांमधील मोठ्या प्रमाणावरील मित्रमैत्रीणींचा सहवास, सानिध्य मला लाभले आहे. आजही त्यातले अनेकजण झुक्यामुळे संपर्कात आहेत. त्यातील काही प्राध्यापक, डॉवटरेट पदवीधारक, संगीत-गायन संस्थाचालक, लेखक, चळवळीतील आंदोलक वगैरे बनले होते. आता सारेचजण शासकीय नियमांमुळे वयोमानपरत्वे सेवानिवृत्तही झाले आहेत.  दहावीच्या बॅचचे जसे "पुनर्भेट संमेलन" तसेच ,"मैत्रीची पन्नाशी" हे कार्यक्रम आखून ते यशस्वीपणे पूर्णत्वास नेता आले;  त्याचप्रमाणे एम.ए.च्या सोबत्यांचे (१९८३-१९८५) पुनर्भेट संमेलन घेण्यासाठी काय करता येईल यासाठी माझी चाचपणी सुरु आहे.   -राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कबाब कॉर्नर