कबाब कॉर्नर

...मी त्या दुकानातून कबाब न घेता बाहेर पडलो. सर्वांचा निरोप घेतला व हळूहळू माझी पाऊले मुलं ज्या ठिकाणी बसली होती तिकडे वळू लागली. माझगाव नाक्यावरील तो कबाब कॉर्नर आपले तत्कालीन वैभव गमावून बसला असला तरी माझ्या रम्य आठवणीतला तो कबाब कॉर्नर आजही तसाच आहे.

खारघर-नवी मुंबई ते माझगाव हे अंतर तसे अगदीच जवळचे नाही; पण माटुंगा सिग्नल पासून एक्प्रेस-वे कडून नवीन रस्त्यामुळे तसा लांबचा प्रवास इतर वाहनांची वर्दळ दूर करून सहज चाळीस मिनिटांत माझगाव सर्कल इथवर पोहोचता येते. अरबी खबसा खाण्यासाठी म्हणून मुलांनी मला इथवर आणले खरे; पण माझी पायवाट इतरत्र जात होती. खबसाची ऑर्डर देऊन प्रत्यक्ष थाली समोर येईपर्यंत किमान अर्धा तास लागणार होता. माझ्या हायस्कूल-कॉलेजचे दिवस ज्या ठिकाणी गेले ती जागा मी शोधू लागलो... एका अनाकलनीय जागेकडे जाण्याची ओढ लागून राहिली. माझी पाऊले आपसूकच त्या पायवाटेवर जाऊ लागली. १३५ नंबरची विजेच्या तारांवर चालणारी बस माझगाव सर्कल ते दो-टाकी पर्यँतचा मार्ग आखून दिल्याने कायम त्याच रूटवर चालणारी मुंबईतली ती एकमेव बस असावी. त्या बसचा उपयोग नजीकच असलेल्या आयकर विभागीय कार्यालयात काम करणाऱ्या बहुतांशी कर्मचाऱ्यांना जास्त व्हायचा. डॉकयार्ड रोड, भायखळा व्हाया लव्हलेन यांच्या मधोमध आकार घेतलेला परिसर म्हणजेच माझगाव. पूढे विश्वासू पावलांनी चालत गेलो व मी त्याच सर्कलवर येऊन थांबलो. राणीबाग येथून व्हाया मुस्तफा बझार-नारळ वाडी ते माझगाव जाणारे बीईएस्टीचे दोन रुट्‌स पूर्वी असायचे. नंबर ३ तीन आणि १२६ वन-ट्‌वेन्टी सिक्स. त्या दोन्ही बसेस आजही सुरू आहेत. राणी बाग व्हाया मुस्तफा बझार बस सेवा सुरु असायची. मुस्तफा बझार येथे लाकडांची वखार होती. नजीकच समुद्र किनारा असल्याने असंख्य लहान-मोठ्या बोटी नांगर टाकून असत. त्यांना अपेक्षित बांबू आणि इतर लाकडी चिराऊ सामान ऑर्डरप्रमाणे मिळायचे.
बरीच वर्षे माझगाव येथील पदमसी वाडी येथे आम्ही रहालोय. त्या वाडीची मालकी ईगल पलास्क बनवणाऱ्या कंपनीचे मालक श्री. पदमसी यांची होती. खोजे, शिया, सुन्नी, पुणेकर, कोकणी, दिल्लीवाले, साऊथ इंडियन्स अशा अनेक विविध भागातील लोक तेथे रहायचे. ख्रिस्ती धर्मीय जास्त असल्याने माझगावात चर्च अनेक होते त्यांतच इंग्रजी माध्यमाच्या शाळाही खुप होत्या. आजही असतील. पण माझा हेतू गुलजार-ए- अहमदी या रेस्टोरंटमध्ये जाऊन कबाब कॉर्नर आज कसा असेल? ते पहायचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला कबाब कॉर्नर आजही सुरू आहे का? तळतानाचा तो खमंग वास, सोबत दिली जाणारी पुदिना चटणी आणि चार चौरस पाव! कबाब जरी आकाराने लहान असले तरी दोनपेक्षा जास्त त्या लंबापाव मध्ये कबाब बसत नसत. कबाबाची चव न्यारी लंबापावचा गंध वेगळा. स्लाइस्ड ब्रेड, वडापाव अशा इतर सर्व पावांपेक्षा लंबापावची चव फारच वेगळी असायची. त्यावेळी खानपान काय, कुठे खायचे? याची सक्त ताकीद आमचे कुटुंब प्रमुख आम्हा शाळकरी मुलांना देत असत. फक्त रविवारी आम्हांस कबाब आणि लंबापाव असे नाष्ट्यात मिळत असे. ती शिस्त होती. पैसा वारेमाप उधळण्यास त्यावेळी कुणाकडेच नसायचा. असल्यास जबाबदारीने खर्च करण्याची पध्दत होती. शिस्तबद्ध जगणे होते.

थेट त्या रेस्टोरंटमध्ये मी पाऊल ठेवले. मोठ्या कढइमध्ये कबाब तळणारी ती जागा आज स्पष्ट स्वछ दिसत होती. तळण्याचा वास किंवा इतर जेवणारी माणसं नव्हती. आता आतील भव्य अशा काचेच्या सुशोभित कपाटात विविध आकार अन प्रकारच्या मिठाई चिनी मातीच्या रकाबीमधून ठेवलेल्या दिसल्या. चारही बाजूने सुशोभित व्हावे या हेतूने त्यावर लाईटिंग करण्यात आलेली दिसली. क्षणभर मी दुसऱ्याच कुठल्या दुकानात आलो असल्याचा भास झाला. त्या मागून माझ्यासमोर शुभ्र कुर्ता-पायजामा मधला एक दाढीवाला इसम प्रश्नार्थक होऊन बघत होता. अर्थातच मिठाईच्या दुकानात भाजी कोण विकणार? गिऱ्हाईक समजून पुढे आला ...

”क्या चाहीए?” त्याच्या मुखी हेच शब्द अपेक्षित होते. मी गोंधळलो.  मलाच उत्तर सुचेना!
”कबाब-लंबापाव खतम हो गया?”
काही क्षण तो विचारत गुंतला. सुचेना उत्तर काय द्यावे...”मिठाई की दुकान है साहब...”  त्याचे ते शब्द ऐकून स्वतःला सावरले. पूर्वी येथे रेस्टॉरंट असायचे. लोक दुपार-रात्रीचे जेवण घ्यायचे. सकाळी  सात ते दहा कबाब-लंबा पावचा कॉर्नर सजायचा. खवय्यांची खूप गर्दी असायची. काही लोक तेथेच खायचे, तर काही पार्सल घेऊन जायचे. त्या वेळी आम्ही ईथेच जवळपास रहायचो. आठवतं मला. आता सर्वकाही बदलून गेले आहे....
समोरची व्यक्ती हसू लागली.

”आम्ही नवीन पिढीतले आहोत. आमच्या वडिलांनी हॉटेलिंगचा व्यवसाय केला. आता या एरियात अनेक टॉवर आलेत. हायफाय सोसायटी आली. शाळा-कॉलेज आलीत. कालानुरूप आम्हांस व्यवसायात बदल आणावा लागला..”

बोलता-बोलता त्याने मला खुर्चीत बसायला सांगितले. पाणी दिले. मला भावूक झालेला पाहुन तोसुद्धा गहिवरला. गुलजार-अहमदीचे रूप स्वरूप तुमच्या शब्दांत ऐकून मन भरून आले. शाळा-कॉलेज ह्याच भागात राहून पूर्ण केले. समोरचा बसस्टॉप त्यांस लागून पेपर स्टॉल, भटकुली हटेल, पुढे मुश्किल कुशां इराणी हॉटेल, मातार पखाडी, अलिकडे पेट्रोल पंप, त्याला लागून माझगाव पोस्ट ऑफिस. अलिकडच्या बस स्टॉपच्या कुशीत एक मराठी खानावळसुद्धा होती. अगदी लहानशी. लाडघरचे तत्कालीन समाजसेवक आमचे मित्र मोहन मयेकर ती खानावळ चालवायचे.

आसपासच्या सरकारी कार्यालयात नोकरी करणारे अनेक लोक या खानावळीत येऊन जेवायचे. इतरत्र नोकरी करणारे पण फावल्या वेळात खानावळीत येऊन बसणारे अवधूत बुआ मयेकर ही मंडळी लाडघर-दापोलीतली. अवधूत बुवा भजनी माणूस!  मस्त भजन गायचे. जेवणाच्या टेबलावर मी त्यांना नकळत ठेका द्यायचो. या सर्व आठवणी मिठाईच्या त्या दालनात गेलो असता एक-एक करून माझ्या समक्ष चलचित्रागत ये-जा करू लागल्या. भावूक मन स्थिरावले आणि मी त्या दुकानातून कबाब न घेता बाहेर पडलो. सर्वांचा निरोप घेतला व हळूहळू माझी पाऊले मुलं ज्या ठिकाणी बसली होती तिकडे वळू लागली. माझगाव नाक्यावरील तो कबाब कॉर्नर आपले तत्कालीन वैभव गमावून बसला असला तरी माझ्या रम्य आठवणीतला तो कबाब कॉर्नर आजही तसाच आहे. - इक्बाल शर्फ मुकादम 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कानडा राजा पंढरीचा