दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
चवदार, हवाहवासा चिवडा
दिवाळीत चिवड्याचे देखील किती प्रकार मिळतात. पातळ पोह्यांचा चिवडा, मुरमुऱ्याचा चिवडा, भडंग, भाजक्या पोह्याचा चिवडा, जाड दगडी पोहे तळून केलेला चिवडा! चिवड्यात फारसं तेल नसतं, त्यामुळे तब्येतीसाठी चिवडा चांगला असतो. अधिक तेल तूप असलेले ब्रेड बटर किंवा क्रीम बिस्कीट, वडे, भजी, कुरकुरे वगैरे पदार्थ खाण्यापेक्षा चिवडा खायला कधीही सोपा आरोग्यदायी, चवीला चांगला असतो.
बऱ्याच घरी पाहुणे आल्यावर समोर चिवड्याची डिश देतात. त्यात चिवडा, वेफर्स आणि एखादा छोटासा लाडू किंवा वडी ठेवली जाते. लग्नात देखील, लाडू चिवडा, वानोळा म्हणून द्यायची पद्धत आहे. प्रवासात नाश्ता म्हणून हा लाडू चिवड्याचा नाश्ता पोटभरू उपयोग वराडी मंडळींना होत असतो. माझी मैत्रीण त्या दिवशी सहज बोलता बोलता सांगत होती की तिच्याकडे एक मोठा ॲल्युमिनियमचा पिंप आहे. त्या पीपात पूर्वी भाजवया पोह्याचा चिवडा भरून ठेवला जाई. त्यात एक मापट असे. या मापट्याने, चिवडा काढून, लहान डब्यात अथवा वाढायला ताटलीत भरत. पोट भरण्यासाठी पुरवठा म्हणुन चिवडा वापरत असत. घरी केला असल्यामुळे, फारसा तिखट तेलकट आणि खारटपण नसे.
फार पूर्वीच्या काळी घरात महिलांना पोटभर खायला सहज सुलभतेने मिळत नसे. सर्व पंगती झाल्यावर महिलांना शेवटी जेवायला बसवत. महागाई असेल तर, तुटवडा असेल, जर कधी तोपर्यंत पोळ्या भाकऱ्या उरल्या नाही तर, त्या बाईला भात (कोरडा) मीठासोबत खाऊन किंवा नवऱ्याने टाकलेलं काहीतरी (ताटातलं उरलेलं) खाऊन राहावं लागत असे. नाहीतर नुसतच पाणी पिऊन उठावे लागे. अशावेळी पोटासाठी जमलं तर चिवडा खायला मिळेल तर बरं असे वाटे.
तेव्हादेखील अचानक पाहुणा आला की चिवडा पुढे करता येई. चिवडा शाळेत डब्यात सहज नेता येतो. त्यामुळे चिवडा घरी भरलेला असे. शिवाय दुपारी मुलं खेळायला आली की खायला, प्यायला तोंडात टाकायला, तो चिवडा उपयोगी होई. क्लासहून घरी, शाळेतून आल्यावर, पोटासाठी भुकबाई सतत काहीतरी मागत असत. ॲल्युमिनियमच्या पिंपभर भाजक्या पोह्याचा चिवडा महाग नाही म्हणून भरपूर केला जाई. वर्तमानपत्राची कागद किंवा पुड्याचे कागद याच्यावर घेऊन तो चिवडा घेऊन तोबरे भरून मुल खात असत. फरसाण किंवा बेकरी प्रॉडक्टस इतके या चिवड्यातील घटक पदार्थ आरोग्याला मारक घातक नसतात.
चिवडा संपण्याचा पण एक वेगळा आलेख असतो. केल्या दिवशी भराभर चिवडा खाण्याच प्रमाण गती, खाणाऱ्या व्यक्तीचा आकडा वाढत असतो. चिवडा संपत असतो. मधल्या काळात ते प्रमाण कमी होतं किंवा स्थिर होतं. शेवटी शेवटी तो चिवडा खायचा कंटाळा येतो; पण मग आई आजी, गृहिणी एखाद्या डोंगरावर एखाद्या बागेत फिरायला घेऊन जातात. हा चिवडा किरकोळ खाऊ, लिंबू कापून उरलेलं घरातलं सणासुदीचा फराळ, गोडधोड घेऊन जात असत. त्या दिवशी तो चिवडा संपतो. हल्लीसारखे पूर्वी बाजारात वडापाव वगैरे मिळत नसत आणि बेकरी प्रॉडक्ट्सला बहर आला नव्हता. चिवड्याच्या डब्यात खाली उरलेलं तिखट मीठ मसाला जो असतो, तो फोडणीच्या भातात किंवा खिचडीत घालून संपवला जातो. अगदीच एखाद्या खास मोठ्या व्यक्तीला म्हणजे घरात काका, आजोबा, अचानक आलेला पाहुणा याला चिवडा द्यायचा असेल, तरच कांदा टाकून, लिंबू पिळून, चिवडा देत असत. बाकी तो नुसताच चिवडा भरभर संपत असे. कधी कधी मटकी उसळ टाकून चिवडा खाल्ला जाई.
नाशिकचा चिवडा खूप प्रसिद्ध आहे. तो चिवडा बनवण्यासाठी खास नाशिक चिवडा मसाला म्हणून देखील विकत मिळतो. बारीक चिरलेला कांदा, लसूण उन्हात सुकवून नंतर तळून खरपूस करून या चिवड्यात घातला की त्याला अधिकच चव येत असते. दालचिनी आणि किंचित गोडसर चवेचा नाशिकचा चिवडा, कांदा घालूनदेखील सुंदर लागतो काल वर्तमानपत्रात एक बातमी होती की कोल्हापुरी भडंग हल्ली फार लोकप्रिय झाला आहे. कारण राजकीय पक्ष खूप वाढले. त्यांमुळे प्रचार आणि प्रवास वाढलाय. पक्षाच्या प्रचारासाठी रात्री बे रात्री कार्यकर्त्यांना फिरावे लागत आणि भूक लागते. पूर्वी बिर्याणी, खिचडा। वडापाव असं दिले जायचं. पण रात्री अप रात्री अवेळी आणि ग्रामीण आणि खूप अंतर्गत भागात हे ओले जेवण उन्हामुळे खराब होऊ शकते. त्यामुळे भडंग बनवून सोबत पाकीट करुन घेतले जातात. लाडू चिवडा, चॉकलेट चिवडा आवडीने खाल्लं जातं.
राजस्थानी मजुर कामाला आले की त्यांना तर नाश्ता भाजक्या पोह्याचा चिवडा किंवा नुसते भाजके पोहे आणि वर तरीदार रस्सा हा खाताना बघितले आहे. कधी सोबतीला मोड आलेली कडधान्ये, उसळ, पापड असतो. कोल्हापूरच्या ज्या भडंग बनवणाऱ्याची मुलाखत आली होती, त्यांनी सांगितलं की आम्ही वॉशिंग मशीनमध्ये फिरवून चिवडा बनवतो. जेणेकरून मसाला आणि तेल तिखट व्यवस्थित सर्व मुरमुरे यांना लागावं.
सुरुवातीला अगदी जी ए कुलकर्णींची जोडवी ही कथा आठवा. त्यात तेल तिखट पोहे, म्हणजे थोडक्यात चिवडा चवीने खाल्ला जात असे. चव वाढविण्यासाठी म्हणुन, सुरवातीला, फक्त तेल तिखट मसाला कालवलेल्या या मुरमुरे-पोहेचिवडा मध्ये पुढे पुढे बदल होत गेले. तेल, हिरवी मिरची लाल मिरची, मिरी, अधिक मसाला, कढीपत्ता, सुकलेला कांदा, तळलेला कांदा मेतकूट किंचित गोडसर चव, दालचिनी पावडर असे वेगवेगळे मसाले घालून चिवड्याची चव काळानुसार वाढवली जात होती. भडंग मशीनमध्ये फिरवल्यावरसुद्धा ते खाली काढून, मोठ्या मोठ्या पातेल्यात ठेवल्यावर हाताने हलवलं जात. जेणेकरून त्या भडंगचा मसाला नीट लागतो आणि हाताची माया तो स्पर्शदेखील त्या भडंगला मिळतो, असे एका जुन्या जाणत्या चिवडा बनवणाऱ्यांनी सांगितलं. नाशिकला पूर्वी बांबूच्या टोपल्यांमध्ये चिवडा कालवलेला बघितला होता.
एका कथेनुसार दादर शिवाजी पार्क जवळ एक चिवडा विकणारा असे. तो सकाळी घरून चिवडा विक्रीसाठी घेऊन जाई. दिवसभर तो चिवडा विकून संध्याकाळी परत येत असे. त्याची भरपूर विक्री होत असे. आतासारखे अन्यप्रांतीय भेळ विकणारे तेव्हा नव्हते. त्यावेळी हा चिवडा लोक आवडीने खात असत. जमलं तर त्याच्यात कांदा टाकून, लिंबू पिळून किंवा वाटलेली हिरवी चटणी कालवून देखील हा चिवडा पटकन संपत असे
दिवाळीत चिवड्याचे देखील किती प्रकार मिळतात. पातळ पोह्यांचा चिवडा, मुरमुऱ्याचा चिवडा, भडंग, भाजक्या पोह्याचा चिवडा, जाड दगडी पोहे तळून केलेला चिवडा! चिवड्यात फारसं तेल नसतं, त्यामुळे तब्येतीसाठी चिवडा चांगला असतो. अधिक तेल तूप असलेले ब्रेड बटर किंवा क्रीम बिस्कीट, वडे, भजी, कुरकुरे वगैरे पदार्थ खाण्यापेक्षा चिवडा खायला कधीही सोपा आरोग्यदायी, चवीला चांगला असतो. मुरमुऱ्याचे या चिवडा नावाचे पदार्थाला कुठे कुठे मुरी, मुडी, भेळ भत्ता, शेव मुरमुरे अशा नावाने नावाजले जात.
एकदा मी अगदी ग्रामीण भागात असताना भेळभत्त्याचं पाकीट घेतलं होतं. अतिशय चवदार होतं. जुन्नरची पण भेळ, मिसळ, भत्ता, नाशिकचा भेळभत्ता प्रसिद्ध असते. मिसळ पाव याचा मूळ भेळ भत्ता त्यासोबत वाटण लावलेला जाड रस्सा त्याच्यात आहे. पुण्यातील चितळेंचा चिवडा, लक्ष्मीनारायण चिवडा असे वेगवेगळे चिवड्याचे प्रकार हल्लीच्या काळात आले. पूर्वीच्या काळी फक्त हा ॲल्युमिनियमच्या पिंपातला आजीचा चिवडा हेच आवडतं खाद्य असे.
समुद्रकिनारी गेल्यावरसुद्धा, खारे शेंगदाणे जसे माणूस खातो, असे आता भेळ खातात. तशी कुल्फी आईस्क्रीम हे प्रकार श्रीमंतांचे आणि आत्ता आत्ता आलेले आहेत. खरा पूर्वीचा दुपारच्या वेळी खाण्याचा स्नॅक्स नावाजलेला प्रकार हा चिवडा हाच आहे. चवदार या शब्दाचा अपभ्रंश होऊन चिवडा शब्दाला असावा. पिंप भरलेला चिवडा हल्ली नसला तरी, जेवणाच्या टेबलाच्या आजूबाजूला पिशवी किंवा डब्यामध्ये चिवड्याची पाकीटे असतात.
दिवाळीचे चकली, चिवडा सगळे उरलंच असेल ना! चला, उरलेला चिवडा कांदा लिंबू घालून खाऊ या. - शुभांगी पासेबंद