तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम

प्रपंचातील कर्तव्ये जशी अपरिहार्य असतात तशीच आपली साधनाही अपरिहार्य असावी. उपासना दृढपणे चालवली तरच फलदायी होते.सुरवातीला दृढता बळजबरीने आणावी लागते. पण सवयीने सहजता येते.

जगी होईजे धन्य या रामनामे।
क्रिया भक्ती ऊपासना नित्य नेमे।
उदासीनता तत्वता सार आहे।
सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे  । श्रीराम ५७।

सर्वोत्तम भगवंताचा सर्वोत्कृष्ट भक्त आपले जीवन कसे धन्य करून घेतो, त्याचे व्यक्तिमत्त्व कसे असते, त्याचा स्वभाव कसा असतो, आचरण कसे असते याचे वर्णन समर्थांनी दहा श्लोकांतून केले. आता त्याच्यासारखेच आपलेही जीवन धन्य करून मनुष्यजन्म सार्थकी लावायचा असेल तर साधकाने काय करावे याविषयी समर्थ बोलत आहेत.
सगळ्यात मुख्य साधन आहे ते नामसाधन. समर्थ म्हणतात, रामनामात रंगून जावे. नामाचा आश्रय करावा आणि जगात धन्य होउन जावे. भगवंताची पूजा, अर्चना अत्यंत श्रध्देने, प्रेमाने करावी आणि नित्यनेमाने करावी. कोणत्याही कारणाने त्यात खंड पडू देऊ नये. मनुष्य प्रपंचातील कामासाठी वेळ काढतो. मनोरंजनासाठी वेळ काढतो. पण पूजा, उपासना, साधना यांचा कंटाळा करतो. प्रपंचातील कर्तव्ये जशी अपरिहार्य असतात तशीच आपली साधनाही अपरिहार्य असावी. उपासना दृढपणे चालवली तरच फलदायी होते. सुरवातीला दृढपणा बळजबरीने आणावा लागतो. पण सवयीने सहजता येते. नित्य उपासनेने भगवंताचा सहवास वाढतो. प्रेम वाढते. प्रेमाच्या,आवडीच्या गोष्टींसाठी सवड आपोआप मिळते. उपासनेसाठी वेगळा वेळ काढता येत नसेल तर प्रपंचातील कर्तव्ये करताना तीच भगवंतासाठी म्हणून करावीत. त्याच्या स्मरणात राहून करावीत.भगवंताचे नाम घ्ोण्यासाठी कोणत्याही बाह्य साधनांची आवश्यकता लागत नाही. कोणतेही काम करत असताना मनात स्मरण करता येते. कोणतेही कर्म  भगवंतासाठी म्हणून केले तर सहजच त्यात प्रेमभाव तसेच निरपेक्षता येते. समर्पण भाव येतो. अशा कर्मांचे पाप-पुण्य बाधत नाही. समर्थ म्हणतात, खरोखर पाहता ‘उदासीनता' हेच परमार्थाचे सार आहे.जोपर्यंत मनात आशा, आकांक्षा, अपेक्षा आहेत तोपर्यंत संसाराची आसक्ती आहे. जोपर्यंत संसाराची आसक्ती आहे तोपर्यंत जन्म मरणाचे बंधन आहे. म्हणूनच उदासीनता अर्थात्‌ वैराग्य हेच बंधनातून सुटण्याचे गमक आहे. जो प्रपंचातून अनासक्त होतो तो सगळ्या गुंत्यातून मोकळा होतो.

विरक्ती येण्यासाठी संसारापासून विमुख होऊन भगवंताला सन्मुख झाले पाहिजे.संसाराचा सततचा विचार बाजुला ठेवुन भगवंताचा विचार करण्याची सवय लावून घ्ोतली पाहिजे. नामस्मरणाने ही सवय लागते. ‘मी', ‘माझे', ‘माझ्यासाठीच' ह्या भावनेने संसारातील कर्मे करत राहिल्यास त्यातून अहंता पोसली जाते, जी परमार्थाच्या मार्गातील मोठीच धोंड आहे. अहंकार आत्मकल्याणाचा शत्रू आहे. पापी अहंतेचा नाश करायचा असेल तर कर्ता-करविता एक भगवंत आहे ही भावना दृढ करावी. याचा अर्थ  ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी' असा करण्याची गल्लत करु नये. आपल्याला सावयव देह मिळाला आहे तो वापर करण्यासाठी आहे. केवळ पोसण्यासाठी आणि भूमीभार होण्यासाठी नाही. मात्र आपल्या इंद्रियांना शक्ती देणारा भगवंत आहे याचे कृतज्ञ भान नित्य असावे. जे कर्तव्य समोर उभे असेल ते भगवंताने नेमून दिले आहे या विचाराने अतिशय प्रामाणिकपणे, मनापासून, प्रेमाने आणि निःस्वार्थपणे करावे. अशा कर्माचरणाने अंतःकरणाची शुध्दी होते. नित्य उपासना,नामस्मरण याने अंतःकरणाला शांती मिळते. शुद्ध, शांत, स्थिर अंतःकरणात भगवंताचा स्पष्ट अनुभव येतो. आत्मस्वरूपाचे साक्षात ज्ञान होते. आत्मज्ञानी मनुष्य सर्व संगांचा त्याग करून मोकळा होतो. तो प्रपंचात राहतो, वावरतो, सर्व आवश्यक कर्मे करतो, पण ‘मी', ‘माझे'  याला चिकटून राहत नाही. विषयांची सारी बंधने तोडून तो फक्त भगवंताशी जोडून राहतो. असा सर्वथा निःसंग मनुष्य जन्म-मरणाच्या बंधनातून मुक्त होतो. आपल्याला महद्‌भाग्याने मिळालेल्या नरदेहाचे सार्थक करुन धन्य होतो.
जय जय रघुवीर समर्थ - सौ. आसावरी भोईर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

संपलं गं नवरात्र...