दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
नव दैत्याच्या नाशासाठी, नवदुर्गेची गरज!
पूर्वी देवसुध्दा आपल्या बायकांचा मान राखून ‘देवी' या नावाने संबोधायचे. त्यांचा कुठेही अपमान होणार नाही असे वागायचे. आजची स्थिती नेमकी उलटी आहे. स्त्रियांच्या अपमानाची संधी सोडली जात नाही. पूर्वीच्या दैत्याच्या मनोवृत्ती आजच्या जास्तीत जास्त पुरुषांच्या मनात जागृत होत आहेत. त्यातूनच स्त्री अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पूर्वीच्या दैत्याच्या वागण्यात आणि आत्ताच्या तथाकथित शिकल्या-सवरलेल्या पण, पशूतुल्य वागणाऱ्या लोकांत काय फरक आहे?
नवरात्री-नवरात्रीचा जयघोष संपत चाललाय, देवीचे महात्म्य सर्वांनी ऐकले, वाचले, त्याचा आनंदही घेतला. पण देवीने केलेले कर्तव्य आपण नीट ऐकले नाही किंवा समजून घेतले नाही असेच म्हणावे लागेल. त्या काळात देवी-देवतांनीही असेच केले होते, तेव्हा सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले; पण कोणीही ऐकले नाही. तेव्हा सुमेघा त्रषींनी देवीच्या सात शौर्यकथा सांगितल्या. ते म्हणाले ‘चंड मुंड वधानंतर शुंभ राज दैत्याच्या रागाला पारावार उरला नाही. देवीचा पाडाव करण्यासाठी आपला अद्भूत सेनानी रक्तबीज याची शुंभाने योजना केली. रक्तबीज अजय सेनानी होता. त्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबात अद्भूत शक्ती होती. त्याच्या बरोबर वीर्यकुल, दैह्यकुल, कालकेलय कुल असे अनेक राजे आपल्या महाप्रचंड सेनागरासह आले होते.
देवीला देवदेवतांनी ज्या ज्या शक्ती प्रदान केल्या, त्यांनाही दुर्गेने आवाहन केले. त्यांनी अवतीर्ण होऊन समूहपणाने रणभूमीत प्रवेश केला. देवीच्या शक्ती मायांनी आसूरांचा प्रचंड प्रमाणात संहार केलेला पाहून दैत्य सैन्यात घबराट पसरली. सैन्य कच खाऊन माघारी वळेल या भीतीने रक्तबीज स्वतः देवीशी लढण्यासाठी रणांगणात आला. ज्या प्रकारांनी दुर्गा, काली, देवीच्या निरनिराळ्या शक्ती स्वरुपा, योगमाया व मातृका या ईर्षेने राक्षस सैन्याशी लढू लागल्या. देवी स्वतः रक्तबीजाशी लढत होती. शक्तीबीजावर देवीने बाणाने जितके शस्त्राघात केले व जखमातून आलेल्या रक्ताच्या थेंबागणिक पुनःपुन्हा नवे दैत्य निर्माण होऊन वाढता वाढता ही संख्या एवढी वाढली की, या राक्षस वीरांना उभे राहण्यासाठी पृथ्वीतल अपूरा पडू लागला. हे पाहून सर्व इंद्रादि देव चिंतित झाले. खुद्द देवीलाही क्षणभर या पुढे काय करावे ते सुचेना. तिने चामुंडा-कालीच्या विचाराने भगवान शंकराला आपला दूत म्हणून राक्षसराज निशुंभाकडे पाठवून निरोप दिला की, शुंभ-निशुंभानी देवाचे राज्य व त्यांचे सर्व यज्ञादि अधिकार परत देऊन आपल्या पाताळ लोकांत तिथून जावे, अन्यथा देवी व देवीच्या संख्या, योगमाया, असूर सैनिकाचे कच्चे मांस खाऊन राक्षस वंश नष्ट करतील. भगवान शंकराची दूत शिष्टाई सफल झाली नाही. राक्षसाने रक्तबीजाला युद्ध करण्याची आज्ञा केली. भगवान महादेवांना दूत म्हणून शत्रूकडे पाठविणाऱ्या देवीला त्रिलोकातील प्राणिमात्र शिवदंती म्हणून ओळखू लागले.
देवी दुर्गेने काली व चामुंडेच्या मदतीने रक्तबीजाच्या सैन्यातील प्रत्येक सैनिकाचा व निर्माण होणाऱ्या सैनिकाचा संहार केला. प्रत्येकाचा शिरच्छेद दुर्गा करी. शत्रूच्या मानेतून गळणारे रक्त काली व चामुंडा घटाघटा पीत व उरलेले निःसत्व कलेवर खाऊन फडशा पाडल्यानंतर रवतबीज एकटा पडला व स्वतः रक्त बीजावर सामुहिक चाल करुन त्याला शस्त्रमारांनी असंख्य जखमा केल्या. त्याचे गळणारे रक्त वरचेवर पिऊन त्याचे मांस खाऊन या महापराक्रमी आणि शक्तीशाली शत्रूला त्यांनी ठार केले. त्यामुळे मानव, यक्ष, गंधर्व, किन्नरादी देवदेवतांची रक्तबीजाच्या संकटातून मुक्तता झाली. पण, हे सर्व इथेच थांबले नाही उरले सुरले राक्षसही देवदेवतांना छळू लागले, पुढेही हे युध्द सुरुच राहिले व शेवटी देवीने (दुर्गेने) महाबली दैत्य महिषासूर या राक्षसाचा वध केला, तो दिवस म्हणजे विजयादशमी यालाच शारदोत्सवही नाव पडले. नवरात्रीत मानवाच्या संसारिक इच्छा पूर्ण होतात, तर चैत्र नवरात्रीत आध्यात्मिक इच्छांची पूर्तता होते. म्हणूनच यास शारदीय नवरात्री म्हणून संबोधले जाते.
असूर रंभासूरचा मुलगा दैत्य महिषासूर खूप बलवान होता. त्याचा जन्म रंभासूर व महिषी (म्हैस) यांच्या संयोगातून झाला म्हणून तो अर्धा माणूस व अर्धा रेडा (म्हैसा) होता. त्याच्या कठीण तपाने त्याला ब्रम्हाने वरदान दिले की, त्याचे मरण देव, दानव वा मनुष्य यांच्या हातून होणार नाही किंवा हे सर्वजण त्याला मारु शकणार नाहीत. त्याला फक्त एक स्त्रीच मारु शकते. पण महिषासूराला वाटत होते की, एक स्त्री त्याला कधीच मारु शकणार नाही. त्यामुळे त्याने देवांबरोबर युद्ध करुन देवांना हरवले व त्यांना स्वर्गातून हाकलून दिले. इंद्रासह सर्व देव भगवान शिव आणि विष्णूकडे गेले.
शिव आणि विष्णूला माहित होते की, महिषासूराचे मरण फवत स्त्रीच्याच हातात आहे. म्हणून सर्वांच्या शवितने मिळून एका तेजस्वी देवीची निर्मिती केली व तिच्या हाती शंकराने त्रिशूळ व विष्णूने चक्र, वायुने धनुष्य-बाण, हिमालयाने सिंह दिला. अशाच प्रकारे अन्य इतर देवतांनीही आपापले शस्त्र आणि शक्ती देऊन देवीला सर्व तऱ्हेने मदत करुन तिला अधिक बलवान केल्याने, देवीला अधिक प्रोत्साहन व मनोबल मिळाल्याने देवीने सरळ महिषासूरला युध्दाचे आव्हान दिले. या दोघांमध्ये नऊ दिवस भयंकर लढत झाली, दहाव्या दिवशी महिषासूर देवीच्या हातून मारला गेला. देवीने महिषासूराला मारल्याने सर्वांनी देवीला ‘महिषासूर मर्दिनी' या नावाने बोलायला सुरुवात केली. देवी दुर्गा सतत नऊ दिवस लढत होती, देवीच्या विजयासाठी सर्वांनी नऊ दिवस उपवास केला. त्या उपवासाचे फलित म्हणून की काय, देवीचा विजय झाला. म्हणूनच दसऱ्याला ‘विजया दशमी' या उपाधिनी हे ओळखले जाऊ लागले. त्रेता युगातही रामाने नवरात्रीचा उपवास केला व रावणावर विजय मिळवला. राम-रावण युद्धही नऊ दिवस चालले व दहाव्या दिवशी विजय प्राप्त झाला. पुढे श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन पांडवानीही युघ्दा अगोदर देवीचा उपवास केला व त्यांनाही विजय प्राप्त झाला व सर्व कौरव मारले गेले. तेव्हापासून नवरात्रीत उपवासाची परंपरा चालत आली आहे.
आजच्या या युगात पूर्वीच्या परंपरांची जपणूक तर केली जाते, पण श्रध्दा मात्र पाळली जात नाही. उपवासाच्या नावाखाली विविध पदार्थांवर ताव मारला जातो. निती, नियमांना तिलांजली दिली जाते, महिला भगिनींचा अपमान केला जातो. मान-सन्मानाने वागवण्याऐवजी स्त्रियांना अपमानजनक वागवले जाते. तिच्याकडे फवत भोगवस्तू म्हणून पाहिले जाते. वर सांगितले जाते की, काळ बदलला आहे. खरं तर काळ कधी बदलत नाही, बदलते ती ‘विचारसरणी.'
पूर्वी जसे लोक होते, तसेच आजही आहेत, प्रत्येक व्यक्ती हातानेच जेवतो, नाकानेच श्वास घेतो, दातानेच चावतो. पण पूर्वी देवसुध्दा आपल्या बायकांचा मान राखून ‘देवी' या नावाने संबोधायचे. त्यांचा कुठेही अपमान होणार नाही असे वागायचे. आजची स्थिती नेमकी उलटी आहे. स्त्रियांच्या अपमानाची संधी सोडली जात नाही. पूर्वीच्या दैत्याच्या मनोवृत्ती आजच्या जास्तीत जास्त पुरुषांच्या मनात जागृत होत आहेत. त्यातूनच स्त्री अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पूर्वीच्या दैत्याच्या वागण्यात आणि आत्ताच्या तथाकथित शिकल्या-सवरलेल्या पण, पशूतुल्य वागणाऱ्या लोकांत काय फरक आहे?
शाळेत असताना गुरुजी शिकवायचे, आम्ही सर्व भारतीय आहोत, भारत माझा देश आहे. वर्गात शिकणारे आम्ही सर्व, बंधू-भगिनी आहोत. पण, सध्या परिस्थिती काय आहे, बरोबरच्या पोरींचीच छेड काढली जाते, तिच्यावर एकतर्फी प्रेम लादण्याचा प्रयत्न केला जातो. तिने न ऐकल्यास तिच्या आगळीक केली जाते. वेळ पडल्यास शिवीगाळ, मारहाण, एवढ्यावर नाही भागले तर ॲसिड फेकी किंवा सरळ बलात्कार करुन ठार मारण्या सारखे प्रकरणे रोज घडतांना दिसतात, यावर कुठेही नियंत्रण आणण्याचा साधा प्रयत्नही होताना दिसत नाही. बऱ्याच वेळा, रक्षकच भक्षक बनतांना दिसतात. जवळच्या कडूनही अत्याचाराचे प्रकार होताना, पहायला, ऐकायला मिळतात.
सर्व माता-पिता आपल्या मुलींवर विविध नियंत्रणे घालतात मात्र मुलांना त्यातून सुटका मिळते, मुलांकडे ‘म्हातारपणाची काठी किंवा वंशाचा दिवा' म्हणून पाहिले जाते. त्यांचे कोणतेही अपराध ‘क्षम्य' मानले जातात. त्यातूनच मुलांच्या दैत्य मनोवृत्तीला खतपाणी मिळते, हे खतपाणी घालण्यात महिलांचाच मोठा वाटा असतो, म्हणून खऱ्या अर्थाने महिलाच-महिलांच्या खऱ्या शत्रू असल्याचे चित्र आहे.
नवरात्रीचे उपवास खासकरु न महिलाच जास्त करतात. त्यात पुरुषांचे प्रमाण नगण्य आहे. हे वृत्तवैकल्ये करुन ही मंडळी नेमके काय साधतात हा संशोधनाचा विषय आहे. देवीची आराधना करतांना, देवीच्या निती-नियमांचे पालन होणेही तितकेच गरजेचे आहे. शंभर टक्के नको, पण, किमान पाच टक्के तरी आपली वर्तवणूक, आपले विचार व त्यामागचा हेतू सुधारणे ही काळाची गरज आहे. पण ही गरज पूर्ण होणे शवय नाही; कारण मुलां-मुलींवर विविध प्रकारांचा प्रभाव आहे. त्यात चित्रपट, टिव्हीवरील मालिका, पाश्चिमात्य संस्कृती व आता मोबाईलच्या माध्यमातून प्रसारीत होणारे कार्यक्रम. यु ट्युबवरील विविध कथा त्याही ‘द्विअर्थी शब्दजंजाल' पोर्न फिल्मचा प्रभाव एवढा वाढला आहे की, त्यातून कोणत्याही वयोगटातील व्यवित सुटू शकत नाही. त्यात खतपाणी घालणारे राजकारणी, कायद्याचा धाक कोणालाही राहिलेला नाही, अपराध्यांना शिक्षा देण्यात न्यायालयेही कमजोर ठरत आहेत. म्हणून त्या काळातील दैत्यात आणि आजच्या या दैत्यात फरक काय? या दैत्यांचा नाश करणेसाठी स्त्रियांनी दुर्गावतार धारण केलाच पाहिजे. - भिमराव गांधले