दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
टाटांचा टाटा...!
...त्यानंतर ज्या ज्या वेळी त्यांची गाडी दुकानावरुन जात असे तेव्हा ते दुकानाकडे बघून हात वर करायचे. अर्थात मला हे माहितच नव्हतं. एक दिवशी त्यांना मांडव्याला सोडून परत येताना त्यांचा ड्रायव्हर दुकानात आला आणि म्हणाला, ‘अरे क्या सेठ, हमारे साब आते जाते समय आपको टाटा करते है और आप देखतेही नही' मी त्याचं बोलणं ऐकून चाटच पडलो. टाटा साहेब चक्क मला टाटा करतात ! मी त्याला बोललो, ‘मुझे कैसा पता लगेगा की, आपकी गाडी जा रही है और साब टाटा कर रहे है; मै तो काममे बिझी रहता हूँ' मला खूप शरमल्यासारखं झालं.
वीस एक वर्षांपूर्वीची एक सुंदर, अनोखी अशी आठवण. चोंढीतील माझ्या ‘अरुण स्टोअर्स' या दुकानाचा नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा झाला होता. जनरल-मेडिकल आणि सिझनल वस्तू मिळण्याची खात्री आणि त्याचबरोबर वृत्तपत्र एजन्सी असल्याने माझ्याकडे सर्व प्रकारचे ग्राहक होते. किहीम बीच वरील बंगलेवाले माझे खास गि-हाईक, ज्यात पक्षीतज्ज्ञ सलीम अली, माजी राज्यपाल साद अली अशी मातब्बर मंडळी होती, त्यांना हवं ते नि हवं त्या क्वालिटीचं मी देत असल्याने दुकानाची ‘माऊथ पब्लिसिटी' आपोआप होत होती. केवळ दुकानदार नि गि-हाईक एवढेच संबंध न राहता त्यापलिकडे एक नातं निर्माण झालं होतं सर्वांशी !
टाटा समूहाचे उत्तराधिकारी म्हणून समजले जाणारे सायरस मिस्त्री यांचे बंधुराज मिली मिस्त्री यांचा किहीमला बंगला होता. वीकेंडला ते येण्यापूर्वी फोनवरुन सामानाची यादी देत. माझ्याकडील वस्तू आणि भाजीपाला, किराणा, मटण मच्छी वगैरे बाहेरुन आणून बंगल्यावर पोहोच करत असे. दोन दिवसांनी परत जाताना बिल पेमेंट करत. त्यावेळी कार्ड पेमेंटची सुविधा फक्त माझ्या दुकानात बँक ऑफ इंडियामार्फत चालू होती. त्यांच्याशी खूप सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते.
एका शनिवारी ते किहीमला येण्यापूर्वी नेहमीप्रमाणे यादीनुसार सामान पोहोच केले होते. ते आले, गाडी उभी केली, मला विचारलं, सामान गेलं का ? मी ‘होे' म्हटलं. इतक्यात ते म्हणाले, ‘विलासभाई ,मैने आज तुम्हारे लिए एक सरप्राईज लाया है, देखो तो सही!' काय सरप्राईज असेल असा विचार करणार एवढ्यात गाडीतून खुद्द रतन टाटा उतरुन आले. मी बघतच राहिलो. क्षणभर विश्वासच बसेना. मिली सरांनीच विचारलं, ‘आप पहचानते है ये आदमीको ?' मी म्हटलं, ‘सर, इन्हे कौन नहीं पहचानता? बचपनसे लेकर आजतक किताबोंमे, अखबारमे या टिव्ही पर जिन्हे देखा है, वो साक्षात टाटा साहब मेरे सामने, मेरे दुकानमे देखकर मै धन्य हो गया' इतकं मोठ्ठं व्यक्तिमत्व समोर पाहून मी गांगरलोच. त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला. त्यांनी दुकान पाहिलं. त्यांच्या चेह-यावर समाधान दिसलं. अर्थात येण्यापूर्वी मिलीसरांनी त्यांना कल्पना दिली असणारच.
खेडेगावातील असं दुकान पाहून त्यांना आश्चर्य वाटलेलं दिसत होतं. जुजबी चौकशी करुन मी मेडिसीनही ठेवतोय हे पाहून अगदी सहजपणे त्यांनी एका ओऔषधाच्या गोळ्या आहेत का', म्हणून चौकशी केली. मी सदर चार गोळ्यांची स्ट्रीप फ्रिजमधून काढून दिली. त्याची किंमत त्यावेळी साडेचारशे रुपये होती. त्यांनी पैसे दिले नि विचारलं ‘एवढी महाग औषधे घेणारे पेशंट इथे आहेत का ?' मी म्हटलं, ‘सर तुमच्यासारख्या गाडीवाल्यांसाठी सगळं ठेवावं लागतं.' माझं उत्तर त्यांना खूप भावलं. त्यांचं ते स्मितहास्य मला बरंच काही सांगून गेलं. पंधरा वीस मिनिटांनी ते निघून गेले.
त्यानंतर ज्या ज्या वेळी त्यांची गाडी दुकानावरुन जात असे तेव्हा ते दुकानाकडे बघून हात वर करायचे. अर्थात मला हे माहितच नव्हतं. एक दिवशी त्यांना मांडव्याला सोडून परत येताना त्यांचा ड्रायव्हर दुकानात आला आणि म्हणाला, ‘अरे क्या सेठ, हमारे साब आते जाते समय आपको टाटा करते है और आप देखतेही नही' मी त्याचं बोलणं ऐकून चाटच पडलो. टाटा साहेब चक्क मला टाटा करतात ! मी त्याला बोललो, ‘मुझे कैसा पता लगेगा की, आपकी गाडी जा रही है और साब टाटा कर रहे है; मै तो काममे बिझी रहता हूँ' मला खूप शरमल्यासारखं झालं. शेवटी यावर एक आयडिया ( तीही त्यांच्या ड्रायव्हरनेच) काढली. यापुढे जेव्हा त्यांची गाडी दुकानासमोर यायची त्याआधीच ड्रायव्हर दोनतीनदा हॉर्न वाजवायचा. त्या हॉर्नचा आवाजही वेगळा असल्याने मला लगेच कळायचं की, गाडी आली. मग मी टाटा साहेबांना आणि ते मला टाटा करायचे. असं पुढे खूप दिवस चालू होतं. टाटा साहेबांचा रामनाथ मध्ये बंगला असून त्यांचं तिथे येणं जाणं असतंच.
मी दुकान बंद केलं आणि चोंढी सोडून नवी मुंबईत आलो. टाटांबद्दल कुठे काही वाचलं, ऐकलं किंवा पाहिलं की मला हा किस्सा आठवतो आणि नकळत उद्योग क्षेत्रातील या अनभिषिक्त सम्राट, अतिशय निगर्वी नि साध्या सरळ सज्जन माणसासमोर मी नतमस्तक होतो. त्यांनी ९ ऑवटोबर रोजी आपली इहलोकाची यात्रा संपवली. त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली. - विलास समेळ