दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
कशाला तो अट्टाहास?
नोबेल पुरस्कार हा कधीही मरणोत्तर दिला जात नाही. नोबेलसाठी निवडण्यात आलेली व्यक्ती हयात असणं हा नियम फार महत्वाचा आहे. त्यामुळेच गांधीजींचा विचार शांततेच्या नोबेलसाठी होत असतानाच त्यांची हत्या झाली आणि ते नाव काढून टाकण्यात आलं. आज कोणालाही वाटलं तरी आता स्टीफन हॉकिंग यांना नोबेल मिळू शकणार नाही हे निश्चित.पद्म पुरस्कारांच्या बाबतीतही हा निकष असणं आवश्यक आहे. नाहीतर १९६६ साली प्रायोपवेशन करून देह ठेवणाऱ्या सावरकरांना आता भारतरत्न दिलं नाही म्हणून त्यांचं श्रेष्ठत्व कोणत्या अर्थानं कमी होणार आहे?
हार्मोनियम हे वाद्य हिंदुस्थानी संगीत मैफलींमध्ये एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात येऊन दाखल झालं. आधी ऑर्गन आणि त्याचीच लहान आवृत्ती म्हणता येईल किंवा मैफलीत गायकाच्या बाजूला मांडी घालून बसून वाजवता येईल अशी लघु आवृत्ती म्हणून हार्मोनियम आपल्या संगीतात आलं. खरतर हे युरोपियन वाद्य. ते यायच्या आधी आपल्या कंठ संगीतात ताल आधार म्हणून तबल्याचा वापर होत असे, स्वराधार म्हणून सारंगी मैफलींमध्ये होती. गळ्याच्या सगळ्यात जास्त जवळ जाणारं वाद्य म्हणून सारंगीनं एकछत्री अम्मल प्रस्थापित केला होताच आणि आधार स्वर म्हणून तानापुऱ्यांंमधून निघणारे धीरगंभीर षड्ज पंचम ब्रम्हांड व्यापून टाकत होते. अशा वेळी इंग्रजांनी ऑर्गन भारतात आणला. त्यात हिंदुस्तानी स्वर आधारित संगीतासाठी आवश्यक ते बदल करून तो आधी नाट्यसंगीतात स्थिरावला आणि नंतर शास्त्रीय संगीतात त्याच्या लघु आवृत्तीनं म्हणजे हार्मोनियनं जागा घेतली.
संगीत नाटकांच्या रंगमंचाचे अनभिषिक्त सम्राट बालगंधर्वही आधी कादरबक्ष यांच्या सारंगीत खुलायचे; पण नंतर त्यांच्या साथीलाही ऑर्गन आणि हार्मोनियम आलीच. ह्या हार्मोनियमला स्वरमंचावर मानाचं स्थान मिळवून देण्याचं काम पुढे पुरुषोत्तम वालावलकर, अप्पा जळगावकर, तुळशीदास बोरकर, नाना मुळे अशांनी केलं असलं तरी त्या सगळ्यांचं मूळ होतं ते दोन गोविंदांच्यात; पहिले गोविंदराव म्हणजे टेंभे आणि दुसरे म्हणजे अर्थात पटवर्धन. ह्याच दुसऱ्या गोविंदरावांच्या जन्मशताब्दी वर्षाला २१ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. हा प्रारंभ झाला आणि रसिकांकडून एक मागणी प्रकर्षानं पुढे आली ती म्हणजे गोविंदराव पटवर्धनांना पद्म पुरस्कार द्यावा.गोविंदरावांची एकूण कारकीर्द पाहिली तर हार्मोनियमशिवाय ह्या कलाकाराच्याआयुष्यात अन्य काही नव्हतच असं जाणवतं. स्वरमंचावर गोविंदराव आहेत हीच श्रोत्यांसाठी मोठी जमेची बाजू असे. आपलं काम साथसंगतीचं, मुख्य कलाकाराचं गाणं खुलवण्याचं याचं भान असलेला कलाकार म्हणजे गोविंदराव.
वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिली साथ केली ती संगीत वेणुनाद ह्या संगीत नाटकाला. ऑर्गनवर लीलया फिरणारी त्यांची बोटं पुढे हार्मोनियमकडे वळली. बालगंधर्वांचं नाटक आहे म्हणजे त्यांची पदं गोविंदरावांच्या साथीत खुलणार हे समीकरण अविभाज्य झालं होतं. वाजवताना गायकाला अडचणीत आण,त्याच्यावर कुरघोडी कर, टाळ्या मिळवण्यासाठी काहीतरी कर्णकठोर वाजव, आपली नाममुद्रा उमटवण्यासाठी प्रयत्न कर अशा सवंग गोष्टींकडे हा कलाकार कधीही आकर्षित झाला नाही. स्वरमंचावरचं आपलं स्थान, आपली जबाबदारी यांची पूर्ण जाणीव असलेला हा कलाकार होता. त्यामुळेच आधी ललितकलादर्शन, मुंबई मराठी साहित्य संघ अशा संस्थांचे संगीतनाटकांचे हजारो प्रयोग त्यांच्या ऑर्गनच्या साथीत खुलले आणि नंतर हिराबाई, कुमार, वसंतराव अशांच्या रागदारी मैफली त्यांच्याच हार्मोनियमच्या साथीत अधिक बहरल्या. वसंतराव आचरेकर आणि गोविंदराव पटवर्धन यांच्या निधनानंतर अस्वस्थ झालेले कुमार आणि त्यांची झालेली घालमेल त्याकाळी अनेकांनी पाहिली आहे. त्यामुळे अशा गोविंदरावांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पद्म पुरस्काराची मागणी रसिकांकडून होणं हे रास्तच आहे. पण प्रश्न आहे वेळेचा. एकाद्या गोष्टीचा गौरव कधी व्हावा ह्याचीही काही एक वेळ असते. ती टाळून गेल्यावर ना त्या गौरवाला काही अर्थ असतो ना त्याचं समाधान.
पद्म पुरस्कार हे शौर्य पुरस्कार नव्हेत. शौर्य पुरस्कार हे त्या त्या वेळी दाखवलेल्या शौर्याचा विचार करून दिले जातात. एकाद्या युद्धात सैनिकांनी दाखवलेलं अचाट शौर्य किंवा देशांतर्गत समस्यांमध्ये पोलिसांनी दाखवलेलं शौर्य. बऱ्याच वेळा अशावेळी त्या सैनिकांचं किंवा पोलिसांचं सर्वोच्च बलिदान म्हणजेच त्यांचं आयुष्य त्यात खर्ची पडतं. त्यामुळेच अशांना मरणोत्तर गौरवण्यात येतं. म्हणूनच आजवर दिलेली २१ परमवीर चक्र पदकांपैकी १८ पदकं ही त्या सैनिकांना मरणोत्तर देण्यात आली आहेत. कारण शौर्याची अत्युच्च सीमा गाठताना त्या सैनिकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. तुकाराम ओंबाळे हे अशांपैकीच एक नाव. त्यांना मरणोत्तर अशोक चक्र दिलं गेलं. निरजा भानोतही त्याच माळेतलं आणखी एक सन्माननीय नाव. तिला देण्यात आलेला अशोक चक्र सन्मान हा मरणोत्तरच होता. पण कलावंतांची कारकीर्द एखाद्या रात्री किंवा एखाद्या मैफलीत बहरत नाही, ती त्याआधी वर्षानुवर्ष केलेल्या तपस्येचं फळ असतं. त्यामुळे त्यांच्या कलेची, कार्याची दखल (पुरस्कार ह्या अर्थानं, रसिकांकडून सातत्यानं घेतली जातेच) योग्य वेळी घ्ोतली जाणं नितांत आवश्यक आहे. ही वेळ साधणं आजवर कितीवेळा जमलं आहे हा खरा प्रश्न आहे. बिस्मिल्लाखान यांना भारतरत्न दिलं खरं; पण ते त्यांच्या वयाच्या तब्बल ८४ व्या वर्षी. त्यावेळी त्यांच्या आयुष्यात व्हीलचेअर येऊनही काही वर्षं झाली होती. जी अवस्था बिस्मिल्ला साहेबांची तीच भीमसेनजींची; वयाच्या साधारण ८७व्या वर्षी शासनाला त्यांची आठवण भारतरत्नसाठी झाली. भीमसेनजींची अवस्था तर ते स्वीकारण्यासाठी समारंभात जाण्याइतकीही योग्यनव्हती. त्यांच्या घरीच हा सन्मान त्यांना देण्यात आली.
त्यामानानं लताबाई भाग्यवान म्हणायला हव्यात. २००१ साली त्यांना हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर बावीस वर्षांचं आयुष्य लताबाईंना लाभलं. सचिन तेंडुलकर तर हा सन्मान मिळवणारा सगळ्यात तरुण व्यक्ती आहे. पद्म पुरस्कार काय किंवा अन्य मोठी पुरस्कार काय, ते नाही मिळाले म्हणून अशांच्या यशाची ऊंची कमी होत नाही आणि मिळाले म्हणून वाढतही नाही. ती त्यांच्या कलेनं आधीचगाठलेली असते. पण पुरस्कार द्यायचेच झाले तर ते योग्य वेळी द्यावेत हेही तितकच खरं. वयाच्या खुणा आणि मर्यादा स्पष्ट झाल्यावर, जराजर्जर, विकलांग अवस्थेत असे पुरस्कार देण्यात काय अर्थ आहे? तो मिळाल्याचा आनंद ते कलाकार उपभोगू शकत नसतील तर कशाला द्यायचे हे पुरस्कार?
ह्याबाबत नोबेलचा नियम महत्वाचा वाटतो. नोबेल पुरस्कार हा कधीही मरणोत्तर दिला जात नाही. नोबेलसाठी निवडण्यात आलेली व्यक्ती हयात असणं हा नियम फार महत्वाचा आहे. त्यामुळेच गांधीजींचा विचार शांततेच्या नोबेलसाठी होत असतानाच त्यांची हत्या झाली आणि ते नाव काढून टाकण्यात आलं. आज कोणालाही वाटलं तरी आता स्टीफन हॉकिंग यांना नोबेल मिळू शकणार नाही हे निश्चित.पद्म पुरस्कारांच्या बाबतीतही हा निकष असणं आवश्यक आहे. नाहीतर १९६६ साली प्रायोपवेशन करून देह ठेवणाऱ्या सावरकारांना आता भारतरत्न दिलं नाही म्हणून त्यांचं श्रेष्ठत्व कोणत्या अर्थानं कमी होणार आहे? १९४५ साली आपल्यातून गेलेल्या सुभाषबाबूंना आता भारतरत्न दिलं नाही म्हणून त्यांच्या त्यागात कोणती कमतरता रहाणार आहे? आणि म्हणूनच गोविंदराव पटवर्धनांनाही आता पद्म पुरस्कार नको. तेराव्या वर्षी हार्मोनियमवर फिरणारी त्यांची बोटं सत्तराव्या वर्षी म्हणजे तब्बल पाच साडेपाच दशकांनी थांबली त्यालाही आता अडीच दशकं होऊन गेली आहेत. त्यामुळे आता त्यांना पुरस्कार देऊन शासनानं स्वतःची थट्टा करून घेऊ नये हीच अपेक्षा. - अमित पंडित