मुशाफिरी

मुले जन्माला घालणे खूपच सोप्पे. पिल्लं तर काय, तशी कुत्र्यामांजरांना, साप-उंदरांनाही होतात. त्यांना त्यांचा योग्यरित्या सांभाळ करता येतोच असे नाही. मानवी जीवनाचे वेगळे आहे. मुलांचे संगोपन, पालनपोषण, देखभाल हा पूर्ण वेगळा व अधिकाधिक अवधान देण्याचा विषय आहे. त्यामुळे मुले ही उदंड नव्हे, तर मर्यादितच असायला हवीत. पण के मर्यादित असूनही विषय संपत नाही. ती सुजाण, संस्कारी, सुशिक्षित, देशप्रेमीही बनवायला हवीत.

   लेकुरे उदंड जाली । तो ते लक्ष्मी निघोन गेली ।

   बापडी भिकेस लागली । काही खाया मिळेना ।

   लेकुरे खेळती धाकुटी । येके रांगती येके पोटी ।

   ऐसी घरभरी जाली दाटी । कन्या आणि पुत्रांची ।

   दिवसेंदिवस खर्च वाढला । यावा होता तो खुंटोन गेला ।

   कन्या उपवरी जाल्या। त्यांला उजवावया द्रव्य नाही।

   वरील रचना समर्थ रामदासांच्या दासबोधातील आहे. लेकुरे उदंड जाली या नावाचे नाटक विख्यात नाटककार वसंत कानेटकर यांनी लिहीले व त्यात प्रारंभी श्रीकांत मोघे व दया डोंगरे यांनी काम कले होते. त्यानंतर सुमित राघवन व त्याची पत्नी चिन्मयी सुमित यांनी काही प्रयोग केले. प्रशांत दामले यानेही 'लेकुरे'चे काही प्रयोग केले आहेत. पण शीर्षकाला छेद देणारे कथानक त्यात असून त्यातील प्रमुख जोडप्याला मुल नसतं व त्यांच्या मालमत्तेवर मग भरपूर मुले असणारे त्यांचे नातेवाईक डोळा ठेवून असतात अशी ती कहाणी आहे. पण रामदास म्हणतात त्याप्रमाणे लेकुरे जर का उदंड जाली तर लक्ष्मी निघून जाणार याबाबत कुणाचेही  दुमत नसावे.

   आपला भारत देश हा बऱ्याच वर्षांपासून शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतीसाठी मनुष्यबळ लागते. मग ते घरातल्या घरातच उपलब्ध व्हावे म्हणून जास्त मुले जुन्या काळी जन्माला घातली जात असे इतिहास सांगतो. मग जेव्हढ्या चोची तेव्हढे दाणे लागणारच. मग ती शेती किफायतशीर न होता ‘पिकवले व खाऊन टाकले' याच सूत्राभोवती फिरत असे. कारण खाणारी तोंडे अधिक असत. शिवाय जुन्या काळात संतती नियमनाची साधने नव्हती. मनोरंजनाची माध्यमे नव्हती. मग पति-पत्नीला एकमेकांपासून मिळणारे लैंगिक सुख हेच आनंद देण्याघेण्याचे मुख्य कारण उरत असल्याने जन्मदर अधिक राहात असे. आरोग्याच्या प्रगत व अत्याधुनिक सुविधा आजच्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे बाळंतपणानंतर अनेकदा नवजात अर्भके दगावत. त्यामुळेही जास्त मुले जन्माला घालण्याचा प्रघात असे. मात्र यात महिलावर्गाचे पार हाल होऊन जात. यात अनेक विवाहितांना बाळंतपणातच मृत्युने गाठलेले असे.

   तुम्ही इंग्रजकाळात तरुण असलेल्या पिढीच्या माता-पित्यांना झालेल्या मुलांचा हिशेब जाणून घेतला तर दहा, बारा, चौदा मुले एकेका जोडप्यास असत अशी माहिती समोर येईल. शाहजहान याने त्याची पत्नी मुमताझ हिच्यावरील नितांत प्रेमापोटी तिच्या मृत्युनंतर ताजमहाल बांधला असे सांगितले जाते. वास्तविक पाहता या शाहजहानला एकूण ९ बायका होत्या. त्यातली मुमताझ ही तिसरी! तीही त्यांच्या तेराव्या (की चौदाव्या?) मुलाला जन्म देताना मेली. आता बोला! काय ते अफाट प्रेम बरे! त्यानंतरही तो लग्नं करीत राहिला व ढीगभर मुलांना जन्म देत राहिला. आज प्रगतीपथावर असल्याचे सांगणाऱ्या भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला पिछाडीवर टाकून जगात पहिला नंबर पटकावला आहे. सध्याच्या भारतात दर दिवशी अंदाजे ६७,३८५ मुले जन्माला येतात. त्यातही राज्यवार पाहायचे झाल्यास बिहारचा नंबर पहिला आहे. त्यानंतर उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानचा नंबर लागतो. अलिकडे त्यातल्या त्यात शिक्षणाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढत असल्याने कुटुंब मर्यादित ठेवण्याकडे कल वाढला आहे. किमान शहरी भागात तरी कमी मुले जन्माला घालणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. तत्कालिन पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांनी आणीबाणी काळात कुटुंब नियोजनाची मोहिम तीव्रपणे राबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सुवयाबरोबर ओलेही जळले. अनेक ज्येष्ठ, वृध्दांचीही नसबंदी करुन त्या मोहिमेला जुंपलेल्या काही शिक्षकांनी नियोजित लक्ष गाठल्याचे दाखवण्याचा खटाटोप केला होता म्हणे.

   सद्यकाळात ‘हम दो हमारे दो' किंवा ‘हम दो हमारा एकच' किंवा ‘हम दो और बालबच्चा नहीच मंगता' म्हणजेच ‘डबल इन्कम नो किड' अशी मानसिकता बाळगणारी अनेक जोडपी असल्याचे मी पाहतो. काही मुस्लिम परिवारांत किंवा अनेक अन्यधर्मीय परिवारांतही पुरुषाने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करवून घेणे म्हणजे त्याची मर्दानगी, पुरुषत्व कुठेतरी कमजोर करवून घेणे हा अपसमज दृढ आहे. सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी माझ्या परिचयातील एका मुस्लिम गृहस्थाने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करवून घेतली. त्याची लगेच कंपनीने गुणवंत कामगार म्हणून शिफारस केली व त्याला महाराष्ट्र शासनाचा तो पुरस्कार मिळाला सुध्दा. आज हे लिहायला, बोलायला, वाचायला सोप्पे वाटतेय. पण तेंव्हा ते अप्रूपच होते. मुले जन्माला घालणे खूपच सोप्पे. पण त्या मुलांचे संगोपन, पालनपोषण, देखभाल हा पूर्ण वेगळा व अधिकाधिक अवधान देण्याचा विषय आहे. त्यामुळे मुले ही उदंड नव्हे, तर मर्यादितच असायला हवीत. पण केवळ मर्यादित असूनही विषय संपत नाही. हल्ली कमी मुले जन्माला घालण्याचा जमाना आल्याने ती लाडोबा होण्याचा संभव वाढत चालला आहे. अनेक घरांतून भावाला बहीण नसते की बहीणीला भाऊ नसतो. कारण एकच मुल जन्माला घालण्याकडे कल अधिक आहे. त्यातही पति-पत्नी जर उच्चशिक्षित असतील व पत्नी नोकरीला जाणारी असेल तर तिच्यासाठी गरोदरपण व बाळंतपण हे तिच्या करिअरमधले अडथळे असल्याचे काहीजण मानू लागले आहेत.

 त्यामुळे असलेल्या एखाद दुसऱ्या मुलाचे अति लाड करण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. त्या मुलाला हवे तेवढे कपडे, खेळणी, खाऊ देणे, त्याने मोबाईल, टीव्हीचा रिमोट, एसीचा रिमोट असे काहीही मागितले तर लगेच त्याच्या हातात ते देणे, असे मुल चूकले तर त्याला/तिला दम न देणे, त्याला/तिला शिस्त न लावणे, मोठ्या-ज्येष्ठ व्यक्तींशी त्याची/तिची वागणूक उध्दटपणाची असली तरी त्याच्यावर योग्य ते संस्कार न करणे असे अनेक घरांमधून पाहायला मिळते. मागील पिढीमध्ये पुतण्या-पुतणी, शेजारचा मुलगा, मुलगी चुकली तर काका-काकीने, शेजारी-शेजारणीने त्याला/तिला फटकावले, दम दिला तरी कुणाला काही वाटत नसे. ‘पुन्हा चुकल्यास खुशाल चारचौघात चोपून काढा' असे त्या मुला-मुलीचे आई-बापच सांगत असत. सद्यकाळात शाळेतल्या शिक्षकाने रास्त कारणाने जरी कुणाच्या लाडोबाला फटकावले तर त्याच्यावर पोलीसी कारवाई करण्यापर्यंत अलिकडच्या विद्वान पालकांनी मजल मारली आहे. आपल्या लाडोबाला कुणी किती डोक्यावर बसवून घ्यावे हा त्या त्या जोडप्याचा प्रश्न आहे. मात्र त्याचा उपद्रव इतरांना कशाला? हल्ली अनेकांची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे जो तो आपापले घर सजवतो, अत्याधुनिक उपकरणांनी ते सुसज्ज करायला मागतो. यात गैर काहीच नाही. पण बऱ्याचदा अशा घरी नातेवाईकांची लाडोबा मुले जातात. मग किचनमध्ये जाऊन फ्रीझच उघड, त्यातले सामानच सांडव, एसीचा रिमोट हातात घेऊन वाट्टेल ती बटणेच दाब, दुसऱ्याच्या घरातला कॉम्प्युटर सुरु करायचा हट्ट करुन त्यावर गेमच खेळ, महागड्या टीपॉयवरील काचेवर भरलेले ग्लास आपट, सुंदर रंग दिलेल्या भिंतींवर रेघोट्याच ओढ असले प्रकार ही लाडोबा मुले करतात. यातही वैषम्याची गोष्ट ही की असे केल्यावर त्यांचे पालक त्यांना आवरत किंवा ओरडत नाही. दम देऊन गप्प बसवत नाहीत. म्हणे तसे केल्याने मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. मग ते चाळे तुमच्या घरी करा की! ही पनवती इतरांच्या घरी त्रास द्यायला नेताच कशाला? माझ्या एका नातेवाईकाच्या लाडोबाने माझ्या बेडरुमचा रिमोट वाट्टेल तसा चालवून एसी बिघडवला. त्याला रिपेअर करायला मला कित्येक हजार मोजावे लागले. ही ब्याद पुन्हा माझ्या घरी न येईल तेच बरे असेच मला वाटून गेले. ‘मुलांना काही कळत नाहीत, ती लहान आहेत', असा पवित्रा असल्या कारट्यांचे कवतिक असलेले काही आईबाप यावर घेतात. पण आईबापांना तर कळते ना! त्यांनी तरी दुसऱ्याच्या घरी आपण आहोत याचे भान बाळगले पाहिजे. असले पनवती नातेवाईक व त्यांची उपद्व्यापी कारटी दुसऱ्या कुणाकडे मुक्कामाला न गेलेलीच बरी!

अशी लहानपणची अनेक लाडोबा मुले वेळीच योग्य ते संस्कार न झाल्याने ‘आपण करतो ते बरोबरच' या मानसिकतेतून मोठी होत जातात. मग पुढे समाजात वावरताना त्यांचे व त्यांच्या आईबापांचे हसे होते. कारण इतर ठिकाणी त्यांचे घरच्यासारखे लाड कुणी चालवून घेत नाहीत. ‘अरे'ला ‘कारे'ने उत्तर मिळते. अनेक मुले पुढे जाऊन हट्टी, हटवादी, दुराग्रही, अहंकारी, आक्रमक होतात. बऱ्याचदा घरातच आई-वडील, आजी-आजोबा यांच्यावर धावून जातात, हल्ले करतात. त्यांच्यात गुन्हेगारी वृत्तीचा शिरकाव कधी होतो ते कळतही नाही. मानसशास्त्राच्या अभ्यासात बालगुन्हेगारी असा एक विभाग आहे. आधुनिक काळात विभक्त कुटुंबपध्दतीमुळे सोबत काका, काकी, मामा, मावशी, चुलत भावंडे नसतात व  त्यातही माता-पिता दोघे नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असल्याने मोकाट सुटलेल्या अशा मुला-मुलींमध्ये ‘माईट इज राईट' या वृत्तीचा प्रभाव वाढतो, नकार ऐकायची सवय नसते आणि त्यातूनच कुसंगतीच्या सहवासात गेल्यास बालगुन्हेगारी वाढीला लागते. ...आणि मग त्यांना समजवायला, संस्कार करायला गेल्यास फार उशिर झालेला असतो. बऱ्याचदा मग समाज, आईवडील, नातेवाईक, यंत्रणा आपल्या विरोधातच आहेत असा समज करुन काही मुले नैराश्य येऊन आत्महत्येचा मार्गही चोखाळतात.

तुमच्या परिचयात अशी लाडोबा टाईपची लेकुरे असल्यास त्यांच्या पालकांना आगामी काळातील हे सारे धोके वेळीच समजावून सांगण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

टाटांचा टाटा...!