एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी....

प्रत्येक जण म्हणत असते की या जन्मी मला काही साध्य करता आले नाही तर मी नक्कीच पुढचा जन्म घेईन आणि मनासारखं जगेन. पण खरंच पुढचा जन्म मिळतो का? आणि मिळाला तरी मागील जन्मी काय घडले आहे हे आपल्याला आठवते का? तर नाही. जे काही कर्म करायचे आहेत ते आपल्याला या जन्मी करायचे असते. पुढचा जन्म कोणीच बघितलेला नाही.

 पहिली घंटा होते, दुसरी घंटा होते, आणि तिसरा घंटेला नाटक सुरू होते. तसेच आपल्या जीवनाचे देखील आहे. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याआधी पहिली घंटा होते आणि आपण सगळे आपापल्या जागेवर बसायला लागतो. मध्येच उद्‌घोषणा केली जाते की मोबाईल सायलेंटवर ठेवा किंवा स्विच ऑफ करा. तसेच आपल्या आयुष्याचे देखील झाले आहे. पहिली घंटा होऊन दुसरी घंटा होते तरी आपण लोक भानावर आलेलो नसतो. मग ते भान खऱ्या आयुष्याचं असो, की नाटकातलं असो. आपली आई आपल्याला जन्म देताना अनेक वेदना सहन करते आणि आपल्याला जन्म देते. त्यावेळी आपल्या जन्मासोबत आईचादेखील पुनर्जन्म झालेला असतो आणि प्रत्येक स्त्रीचा हा पुनर्जन्म होतोच असे नाही. यामध्ये काही स्त्रियांना आपला जीव गमवावा देखील लागतो. त्यामुळे पुरातन काळापासून बाळंतपण म्हणजे बाईचा नवीन जन्म असे म्हटले जाते. हे झाले आपल्या आयुष्यातील कटु पण गोड सत्य. डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलेलं आहे, कारण जीवनामध्ये इतके चढ-उतार येत आहे की कोणता निर्णय कोणत्या वेळी घ्यायला पाहिजे हे सुचत नाही.  

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. ते चढ-उतार प्रत्येक जण हसत खेळत पार करत असते पण प्रत्येकालाच जमते असे नाही. देव हा प्रत्येकाला संधी देत असतो, अर्थात त्यासाठी आपली कर्मदेखील तशी असायला हवी. म्हणजेच जेव्हा मृत्यू आलेला असतो तेव्हा मग तो कसाही येतो, नाहीतर आपण त्यातून बाहेर पडतो म्हणजेच आपला नवीन जन्म होतो. मग आता हा जो नवीन जन्म (बोनस लाईफ) म्हणून आपल्याला देवाने दिलेला आहे त्याचा उपयोग कसा करायचा हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. आधी जसे वागत होतो तसेच आता देखील वागले पाहिजे, की मिळालेल्या संधीचा उपयोग केला पाहिजे हे प्रत्येक जण त्यालां आलेल्या प्रसंगाच्या अनुभवातून ठरवत असतो.

प्रत्येक जण म्हणत असते की या जन्मी मला काही साध्य करता आले नाही तर मी नक्कीच पुढचा जन्म घेईन आणि मनासारखं जगेन. पण खरंच पुढचा जन्म मिळतो का? आणि मिळाला तरी मागील जन्मी काय घडले आहे हे आपल्याला आठवते का? तर नाही. जे काही कर्म करायचे आहेत ते आपल्याला या जन्मी करायचे असते. पुढचा जन्म कोणीच बघितलेला नाही.  ८४ लक्ष जीवन योनीचा फेरा पूर्ण करून आपल्याला मनुष्य जन्म मिळत असतो. मनुष्य जन्म मिळवत असताना आपण आपल्या कर्मानुसार प्रत्येक योनी पार करून आलेलो असतो. पाप-पुण्य समकृत्व म्हणजेच जेव्हा पाप पुण्य यांचा समतोल होतो तेव्हाच मनुष्य जन्म मिळत असतो. श्रीमद्‌भगवद्‌गीतेेत श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे की जे काही कर्म करायचे आहेत ते याच जन्मी कर. एकदा का शरीराने आत्मा सोडला की तो नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. मग आता तुम्ही म्हणाल की ‘एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी' याचा अर्थ काय आणि याचा संदर्भ इथे काय लागतो?  हा प्रश्नदेखील बरोबर आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येतात आणि ते प्रसंग आपण लक्षात ठेवतो. अर्थात वाईट प्रसंगांना आपण विसर करण्याचा प्रयत्न करत असतो पण वाईट प्रसंग जास्त लक्षात राहतात. आणि ते वाईट प्रसंग लक्षात ठेवूनच आपण पुढचा मार्ग शोधत असतो. तो मार्ग शोधत असताना आपली मनस्थिती इतकी खालवलेली असते की त्यावेळी जो कोणी आपल्याला सल्ला देईल तोच सल्ला योग्य वाटत असतो. त्या क्षणी आपली सद्‌सद्‌विवेक बुद्धी काम करणे बंद करते आणि इतरांचं ऐकण्यास भाग पाडते. आपल्याला मार्ग दाखवणारा, सल्ला देणारा हा देवदूत आहे असे आपण समजतो आणि कोणताही विचार न करता त्या व्यक्तीचा सल्ला ऐकतो. अर्थात निष्पन्न काही होत नसते; पण त्या तात्पुरते आपण शांत होतो.

कोरोना या महामारीनंतर सर्वांच्या जीवनामध्ये उलथापालट झाली आहे. सर्वांचेच शरीर स्वास्थ्य ढासळले आहे, मानसिकता बिघडली आहे. सर्वजण कोणत्या ना कोणत्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. मग ते व्यसन कोणत्याही प्रकारचे असो. या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक जण काकुळतिने प्रयत्न करत आहे. त्यात कोणाला यश मिळते तर कोणी अपयशी होत आहे. यात सगळ्यात जास्त हाल होत आहेत ते सामान्य वर्गाचे म्हणजेच मध्यम वर्गाचे. जे रोज काबाडकष्ट करून स्वतःचे घर चालवत असतात त्यांचे हाल आता सध्याच्या परिस्थितीत बघवत नाहीत. कारण कोरोना महामारी नंतर प्रत्येकाचा हा जन्म नक्कीच नवीन आहे. या काळात कोणाच्या नोकऱ्या गेल्या, तर कोणी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले. व्यक्तींना तर परत आणू शकत नाही, पण आता मात्र जी नोकरी मिळाली आहे तिच्यामध्ये तडजोडी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. मग नोकरी करत असताना आपण काय शिकलोय हेही ती व्यक्ती विसरत असते आणि प्रत्येक काम करायला तयार होते. आणि नक्कीच याचा फायदा उच्च पदावर असणारे उद्योजक किंवा मोठ्या पदावर असणारे अधिकारी घेत असतात. नोकरी करताना प्रत्येक जण एकच इच्छा मनात ठेवून काम करत असते, की आपण काम करत आहोत याचा मोबदला नक्की मिळेल. पण जेव्हा पाहिजे तसा मोबदला मिळत नाही तेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे खचून जाते, पण घर चालवायचे असते, हप्ते भरायचे असतात, मुलांच्या फी भरायच्या असतात, हे डोक्यात ठेवून ती व्यक्ती ते काबाडकष्ट करत असते. म्हणजेच गाढवाप्रमाणे ओझी वाहत असते.

ही ओझी वाहत असताना त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर असते ते फक्त त्याचे कुटुंब. आणि कुटुंबासाठी ती व्यक्ती कोणतेही काम करण्यास तयार होत असते. मग त्यासाठी त्याला दररोज मरावे लागते आणि सकाळ झाले की आपल्या नातेवाईकांसाठी, आप्तेष्टांसाठी, जिवलगांसाठी जगावे लागते. मग असे वाटते की खरंच गरीब माणूस गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत माणूस श्रीमंत होत चालला आहे. मग याला कारणीभूत कोण? सरकार? की आलेली वेळ? याचे उत्तर आजतागायत कोणालाही मिळाले नाही.
शेतात शेती करणारा शेतकरी रोज काबाडकष्ट करतो आणि ते काबाडकष्ट करत असताना तो त्यांच्या बैलांची काळजी घेतो, त्यांना काही दुखापत झाली किंवा कधी काही चारापाणी नीट मिळाले नाही तरी त्यांचे मन हलवून जाते. पण इथे आपण ज्या ठिकाणी नोकरी करत आहोत, त्या ठिकाणी उच्च पदावर असणारे अधिकारी आपल्याला एक यंत्र समजत आहेत. मग इतक्या मोठ्या उच्च पदावर असून तरी काय उपयोग ? माझा शेतकरीच बरा! बरा काय? उत्तमच!

माहित नाही, पण या जगात जगताना प्रत्येकाला असे वाटते की, स्वतःची पोळी भाजायची असेल, तर त्याची झळ दुसऱ्याला लागली पाहिजे तरच आपली पोळी भाजून निघेल. आपण जर विचार करत बसलो की, इथे आपण चुल पेटवली तर दुसऱ्या व्यक्तीला त्रास होईल, त्याच्या घरात चूल पेटणार नाही, तर आपण मात्र उपाशीच राहू. मग त्यासाठी मनावर दगड ठेवून रोज नवीन जन्म घेऊन नवीन विचारांना चालना देऊन जसा समोरचा प्रश्न आहे तसे प्रश्नाला उत्तर देऊन जगता आले पाहिजे. तरच या समाजात आपण टिकून राहू आणि जगू शकू. आताच्या पिढीला जगामध्ये वावरताना हेच सांगणे आहे की, प्रत्येकाने स्वतःचाच विचार न करता इतरांचा देखील विचार करणे गरजेचे आहे. नाहीतर पूर्वी इंग्रजांनी जसे राज्य केले तसे आता दुसरे जण येऊन आपल्या मनावर राज्य करू लागलेत.

सुखी माणसाचा सदरा हा चाकरमान्यांकडे आहे का ? तर हो, कारण त्यामुळे त्याला रात्री अंथरुणात पडले की लगेच झोप लागते. जी पैसेवाले माणसांना लागत नाही म्हणून तर म्हटले आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तुची शोधूनी पाहे. आपल्या मनालाच विचारलं पाहिजे की जगात सर्व सुखी कोण आहे? आणि याचे उत्तर आहे, आपण आणि आपणच. जसे मोठी माणसे म्हणतात हेही दिवस जातील, तसे म्हणत चाकरमानी प्रत्येक दिवस नव्याने जगतो जणू काही, एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेंन मी !!! - सौ. निवेदिता सचिन बनकर - नेवसे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पुस्तक परीक्षण  :