पुस्तक परीक्षण  : 

सुनीता डागा हे मराठीमधील अनुवादाच्या क्षेत्रातील महत्वाचे नाव. त्यांच्या स्वतंत्र मराठी कवितादेखील अनेक नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. नुकताच त्यांचा ‘तुझं शहर हजारो मैलांवर' हा पहिलाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. पहिल्याच वाचनात, या कविता मनाच्या कोंदणात कोंबून ठेवलेल्या कोलाहलाला दिलेले काव्यरूप आहे असे मत होते. कवितासंग्रह परत परत वाचताना ते दृढतम होत जाते.

 पहिल्याच मौनाचा सागर याकवितेत त्या म्हणतात, ”भरभरून बोलण्याचे दिवस इतिहासजमा होत जाण्याच्या या काळात चहुबाजुंना पसरलेला हा मौनाचा अथांग सागर याला ओलांडवून आता परत तो किनारा गाठणं कितपत शक्यय माहित नाही मला” (पान सात - मौनाचा सागर ) अशी काहीशी पराजित अवस्था असतानाही, हताश न होता, शेवटी त्या उपाय शोधतात आणि याच कवितेत शेवटी म्हणतात, ‘संवादाचे सगळेच किनारे धूसर होत जाण्याच्या या काळात मौनाचा हा समुद्रच पैलतीरावर नेईल आपल्याला.' (पान ८) आशानिराशेच्या हिंदोळ्यावर असतानाच पुन्हा ‘कवितागत मी,' एका कोमेजलेल्या क्षणी म्हणते, ‘एकामुळे दुसऱ्याचं कमी होत जाणं योग्य वेळेवर अस्तित्वाचे धागेदोरेच न सापडणं एका आदिम पोकळीत निव्वळ चाचपडत राहणं..' (पान १० आदिम बंध ) ‘युद्ध होत आपल्याच आत दडलेल्या आपल्याच बेईमानीशी' (पान १६ पडझड ) अशी प्रामाणिक कबुली त्या देतात. नातेसंबंधांचे ठिसूळ बुरुज कोसळत असताना पुढे याच कवितेत त्या म्हणतात, ‘त्यापेक्षा हेच योग्य नव्हे का, की आपापल्या राखेतून निमूटपणे बाहेर पडावेत आता झेप घेणारे आपापले फिनिक्स..' (पान १६) आणि अलिप्ततेची परीपक्व जाणीव घेऊन भावनिक पुनर्वसन करण्याच्या प्रक्रियेच्या मानसिकतेकडे वळतात. सर्वसाधारपणे रात्र म्हणजे मनातील सर्व संघर्ष बाजूला ठेऊन निद्रेच्या मखमली प्रदेशात प्रवेश करण्याची शुभ्र वेळा. पण कवयित्रीला मात्र, ‘थोडं थोडं दुःख पचवत जाते रात्र थोडं थोडं दुःख नव्यानं उगवून आणते रात्र' या अनोख्या प्रकारे रात्रीची क्लेशकारक अनुभूती येते. ( थोडं थोडं दुःख पान २२ र्) अदृश्य प्रतिबिंब; हीही अशीच एक कविता. त्यात त्या व्याकुळतेने लिहितात, ‘खरं तर दुःखांनीदेखील घ्यायला हवी होतो थोडी उसंत मात्र ती अधिकच बेदरकारपणे भिडत गेली मला'  (पान १२९) अपेक्षाभंगाचे असंख्य जीवघेणे घाव झेलूनसुद्धा तिच्या  काळजातील करुणा किंचितही कमी झालेली नाही. संवादाला सुतक लागलेले दिवस (पान ३३ पोट्रेट ) ‘शांतपणे साध्वीच्या सहनशीलतेने सहन करत, एक क्षमाभाव पेरावा माझ्या आत' (पान १३२ काळाच्या बाहेर ) असं कारुण्यपूर्ण मागणं आर्ततेने त्या मागतात. जाणून घेईन ही सुद्धा अशीच स्वप्नभंगाची तरल, धूसर कविता. त्याचं बोलणं ऐकून घेण्यासाठी आतूर झालेल्या तिच्या असफल स्वप्नांचं सावट या संग्रहातील बऱ्याच कवितांवर दाटपणे पसरलेलं दृष्टोत्पत्तीस येतं ( पान ४२  ‘माझ्याशी बोल' ) ‘एक एक कप चहा (पान ११५) पिण्याच्या बहाण्याने काहीच काळ एकत्र आल्यावर सुद्धा  निवत जाणाऱ्या चहासोबत निवत गेला संवाद एक मौन उतरत गेलं चहाच्या दोन कपात' अशी तुटलेली, क्लेशकारक अवस्था अमानुषपणे दैव कवयित्रीच्या झोळीत टाकतं.

हा संग्रह म्हणजे उदासी, वेदना, टोकदार संघर्ष, दुःख, अपेक्षाभंग आणि त्यावर मात करण्याची विजिगिषु प्रवृत्ती (काही अंशी) अशा संमिश्र भावभावनांची पालखी आहे. पण दुःखाला झुंबरं न लावता, कवितेच्या अंगभूत सौंदर्याचा तोल न ढळू देता कवयित्रीने तिचे वजन डौलदारपणे सांभाळले आहे, सोसले आहे. यातील कविता इतक्या मनस्वी आणि प्रामाणिक आहेत की कवयित्रीने आपले अवघे भावविश्व सोलून रसिकांसमोर काव्यात्मकरीत्या शब्धबद्ध केले आहे. निर्मितीची ही प्रक्रिया जीवाला अतिशय कळा देणारी असते याचा मला अनुभव आहे. भळभळणाऱ्या क्षोभकारक अंतर्मनाला इतक्या संयतपणे, साधेपणाने अभिव्यक्त करणं ही कठीण गोष्ट असते. एकंदरीतच या संग्रहातील सर्वच कविता; ‘स्व'च्या भावविश्वात उगम पाऊन, ‘स्व' च्या भोवती फिरत, ‘स्व' मध्येच विलीन होताना दिसतात. पण याचमुळे आजकाल लिहिल्या जाणाऱ्या सद्यस्थितीवरील कवितांपेक्षा त्या काहीशा वेगळ्याही वाटतात. अलंकारविरहित साधी, सरळ, थेट भाषाशैली हेही या संग्रहाचे वैशिष्ट्य. भविष्यातील त्या ओळींना ज्या या कविता ओलांडून जातील... ही संग्रहाची वेगळी अर्पण पत्रिकासुद्धा कवयित्रीचा अढळ आशावाद अधोरेखीत करते. वर उल्लेख केल्याप्रमाणे कवयित्रीचा हा पहिलाच कवितासंग्रह. पण यातील कविता वाचताना याचा क्वचितच प्रत्यय येतो हेच या कवयित्रींचे यश आणि कविता या काव्यप्रकाराची ताकद त्यांना कळली आहे याची पावती. आणखी एक जाणवलेली वेगळी गोष्ट म्हणजे कवयित्रीने संग्रहात आपला फोन नंबर,पत्ता, फोटो वगैरे काहीच दिलेले नाही, जे सर्व कवी लेखक आपल्या पुस्तकातून सर्रास देतात. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा कवयित्रीचे वेगळेपण अधोरेखित होते.

अशोक भौमिक यांनी काढलेले, हाती एकतारी घेऊन मुक्तीच्या शोधात अनंताच्या प्रवासाला निघालेल्या साध्वीचे मुखपृष्ठ संग्रहाच्या अंतर्प्रवाहाला साजेसे. पुस्तकाची देखणी निर्मिती हे डॉ. विनायक सोपानराव येवले यांच्या हस्ताक्षर प्रकाशन गृहाचे भरीव योगदान. लेखिका नीरजा यांची गोळीबंद पाठराखण संग्रहाचं वाङ्‌मयीन मूल्य वाढवणारी असफल नातेसंबंधांचे भग्नावशेष हाती घेऊन, हजारो मैलावर असलेले, आपले शहर शोधण्याच्या प्रवासाला निघालेल्या या कवयित्रीला माझ्या मनापासून शुभेच्छा..

तुझं शहर हजारो मैलांवर (कवितासंग्रह)
प्रकाशकः हस्ताक्षर प्रकाशन गृह, नांदेड  किंमतः रु. २९९/-
मुखपृष्ठः अशोक भौमिक पाने १३२
-अशोक गुप्ते 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

१० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष