संत आनंदाचे स्थळ। संत सुखचि केवळ

ज्यांना भगवंत ‘समजतो, ते आपल्या देहासकट संपूर्ण अस्तित्व भगवंताचे आहे असे निःसंशयपणे मानतात. आपली प्रत्येक कृती भगवंताची सेवा म्हणून करतात. त्यांना प्रत्येक कणांत, प्रत्येक क्षणात भगवंत जाणवतो. प्रत्येक घटनेत भगवंताची कृपा जाणवते. म्हणूनच ते स्वतःही कृपावंत होतात.

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू।
स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू।
तया अंतरी क्रोध संताप कैचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा । श्रीराम। ५६

सर्वोत्तम भगवंताच्या धन्य दासाचे व्यक्तिमत्त्व वर्णन करताना समर्थांनी आत्तापर्यंत अनेक लक्षणे सांगितली. त्याचा सगुण-निर्गुणाचा निश्चय, सेवाधर्म, नित्य ध्यान, वैराग्य, नम्र-मधुर-सत्य बोलणे, तत्वचिंतनात वेळ सार्थकी लावणे, भगवंताप्रति आत्यंतिक भक्तीभाव इ. आता भक्ताच्या हळुवार अंतकरणाचे वर्णन करताना समर्थांचे शब्दही हळुवार झाले आहेत. दयाळू, मवाळू, स्नेहाळू, कृपाळू असे शब्द ज्ञानेश्वर माऊलींची आठवण करून देतात. ज्याच्या अंतःकरणात भगवंत स्थिर झाला आहे, खरे तर ज्याला हृदयस्थ परमात्म्याची स्पष्ट जाणीव झाली आहे, त्याला स्वतःच्या सच्चिदानंद स्वरूपाची ओळख पटलेली असते. तो स्वतःच आनंदस्वरूप होऊन नित्य समाधानाचा अनुभव घेत असतो.

 साहजिकच त्याच्या मनात क्रोध, संताप या भावनांचे अस्तित्व नसते. कोणाविषयी द्वेष, असूया, मत्सर नसतो. कुठल्याही इच्छा अपेक्षा नसतात. सर्वांमध्ये भगवंताचे दर्शन होत असते. सर्व परिस्थितीत भगवंताची इच्छा दिसत असते. त्यामुळे कोणाच्याही कोणत्याही वर्तनाचा क्रोध येणे, कोणत्याही घटनेमुळे संताप येणे असे त्याच्या बाबतीत घडत नाही. आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर भक्ताचे जीवन धन्य होते. कृतार्थ होते. आता तो स्वतःसाठी जगत नाही. केवळ परोपकारासाठी आपला देह झिजवतो. आयुष्य खर्ची घालतो. अनाथ, दुःखी जनांचे दुःख समजून घेतो. त्यांचे दुःख-दैन्य कायमचे दूर व्हावे यासाठी प्रयत्न करतो. त्यांचे प्रापंचिक तसेच पारमार्थिक कल्याण व्हावे यासाठी त्यांना प्रयत्नांचे महत्त्व, भक्तीचे महात्म्य, संसाराची नश्वरता, वैराग्याची गरज, साधनेची आवश्यकता याविषयी प्रबोधन करतो. लोकांचे दैन्य संपावे, त्यांचा हरवलेला आनंद त्यांना परत मिळावा, भरकटलेल्या लोकांना वाट गवसावी, त्यांचा ढळलेला तोल सावरावा, यासाठी या संत सद्‌गुरूंना अखंड तळमळ लागते. रात्रंदिवस ते लोकांच्या भल्याची चिंता वाहतात.

त्या तळमळीतूनच मग संतांच्या अभंगांची रचना होते. ज्ञानेश्वरी-दासबोध यासारख्या ग्रंथांची रचना होते. मनाने अत्यंत मवाळ, हळुवार असलेले संत- सद्‌गुरू लोकांना आपल्या मृदू, प्रेमळ बोलण्याने आपलेसे करून घेतात. त्यांच्यातील दुर्गुण जाऊन तिथे सद्‌गुण रुजावेत यासाठी उपदेश करतात. त्यांच्या अपराधांना क्षमा करतात. त्यांना सावरतात. आपुलकीचे, मैत्रीचे बंध निर्माण करतात. लोकांना प्रेमाने वश करून घेतात. अशा प्रकारे वश झालेल्यांना योग्य ते मार्गदर्शन करता येते. त्यांच्याकडून योग्य ते कार्य करून घेता येते. त्यांच्या विचार-वर्तनात परिवर्तन घडवता येते. लोकांवर परम कृपा करण्यासाठीच सद्‌गुरूंचा अवतार असतो. त्यांना मोठ्या श्रद्धेने शरण आलेल्यांचा ते संपूर्ण सांभाळ करतात. त्यांच्या ऐहिक आणि पारमार्थिक कल्याणाची व्यवस्था पाहतात. भगवंताचे न्यायदान कठोर असते. ”करावे तसे भरावे” हा कर्म सिद्धांत अंमलात आणला जातो. मात्र सर्वोत्तम भगवंताचा सर्वोत्कृष्ट भक्त अर्थात संत किंवा सद्‌गुरु असे कठोर नसतात. क्षमाशील असतात. पश्चात्तापाने दग्ध होऊन शरण आलेल्यांची ते कधीही उपेक्षा करीत नाहीत. ज्याला अत्यंत अनुताप झाला आहे आणि सद्‌गुरूंनी सांगितलेली साधना जो पराकाष्ठेच्या तळमळीने, दृढपणे करत आहे त्याचे प्रारब्ध बदलण्याचे सामर्थ्य सद्‌गुरूंच्या ठायी असते. त्यासाठी वेळ प्रसंगी सद्‌गुरू स्वतःची पुण्याई खर्ची घालतात; पण आपल्या शरणागताचा सांभाळ करतात. त्याला भवसागरातून पार करतात. त्यांच्या दयेला, कृपेला सीमा नसते. ”अशक्य ही शक्य करतील स्वामी” ही भक्ताचीही श्रद्धा असते. या श्लोक दशकात समर्थांनी ‘जगी धन्य तो ”दास” सर्वोत्तमाचा” असा चरण लिहिला आहे. त्यांनी भक्त, संत, सद्‌गुरु, योगी असे शब्द न वापरता भगवंताचा ‘दास म्हटले आहे. कारण जोआत्मज्ञान प्राप्त करून अनन्य होतो त्याने भगवंताचे कार्य समजून आपले ज्ञान इतरांना प्रदान करून त्यांचेही जीवन धन्य करावे ही अपेक्षा असते. ज्यांना भगवंत समजतो ते आपल्या देहासकट आपले संपूर्ण अस्तित्व भगवंताचे आहे असे निःसंशयपणे मानतात. आपली प्रत्येक कृती भगवंताची सेवा म्हणून करतात. त्यांना प्रत्येक कणात, प्रत्येक क्षणात भगवंत जाणवतो. प्रत्येक घटनेत भगवंताची कृपा जाणवते. म्हणूनच ते स्वतःही कृपावंत होतात. आत्मनिवेदनाने स्वतःची भक्ती परिपूर्ण करून आपल्या आचरणातून तोच संदेश लोकांना देतात. भगवंत त्यांनाआपला सखा-सुहृद अवश्य मानतो, पण अनन्य भक्त स्वतःला भगवंताचे दास मानतात. आपण ज्यांना ‘समर्थ म्हणतो, ते स्वतःला रामदास म्हणवून घेतात. श्रीरामाने ज्याला परममित्र मानले, आपला प्राणसखा मानले, तो हनुमंत नित्य हात जोडून रामा पुढे दास होऊन उभा राहतो.

 या दोन्ही ‘रामदासांनी आपले जीवन रामकार्यासाठी वाहून धन्य करून घेतले. या श्लोकांच्या प्रत्येक चरणातून श्रीसमर्थांचे व्यक्तिमत्त्वच डोळ्यांसमोर उभे राहते. अनंत जन्माच्या पुण्याईने, भगवंताच्या कृपेने सद्‌गुरु भेटतात. सद्‌गुरूंच्या कृपेनेच भगवंताचे ज्ञान होते. मोक्ष मिळतो . सद्‌गुरु श्रीसमर्थ रामदास स्वामींना शरण जाऊन आपणही ते ज्ञान मिळवायचा प्रयत्न करू या. समर्थ भक्तिमार्गावरून आपल्याला घेऊन निघाले आहेत. ती भक्ती कशी असावी, कशीकरावी, हे पुढच्या काही श्लोकातून ते उलगडून दाखवत आहेत. आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू या.
जय जय रघुवीर समर्थ -सौ. आसावरी भोईर 

 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 शक्तीरूपेण संस्थिता