दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
प्राजक्त
सकाळी पारिजात, फुलांचा सडा टाकून मोकळा होतो त्याचा भार हलका करतो ! अर्थात....फुलंच ती....इवलुशी...नाजुक....त्यांचा भार तो कितीसा असणार ! आणि काहीही झालं तरी ‘सृजनाचा' कुठे कधी भार होत असतो का ? ‘हलका झाला'... पण म्हणून पोकळी नाही निर्माण झाली. ‘मोकळा' झाला पण रिता झाला असेल का खरंच ? मला नाही तसं वाटत !
खरं सांगायचं तर आमच्या छोट्याशा परस बागेत, माझ्या आवडीचं प्राजक्ताचं झाड नाही, याचं कधी कधी मन खिन्नही होतं ! पण आमच्या अगदी समोरच्या बंगल्यात पारिजातक उर्फ प्राजक्ताचं छानसं झाड आहे. बऱ्याचदा या सुगंधी व नाजुक फुलांचा वर्षाव रस्त्यावर, छानशा रांगोळीसमान पडलेला असतो व मन प्रसन्न होत असते आणि मनात सहजच एक आवडती चारोळी पुटपुटाविशी वाटत असतेः
”सकाळी अंगणातला पारिजात
फुलांचा सडा टाकून मोकळा होतो
रिते होण्यातले समृध्दपण
तो किती सहजपणाने दाखवतो”
एके दिवशी कधी नव्हे ते अस्मादिक लवकर ऊठले आणि सहजच गल्लीत चकरा मारू लागले... आणि समोरच्या बंगल्याच्या फेन्सिंग जवळून जातांना अचानक झाडावरून प्राजक्ताचे फुल अचानक माझ्या ओंजळीत पडले! मी जरासा आश्चर्यचकीतच झालो! व त्या प्राजक्ताच्या फुलाकडे सारखं निरखून बघतच सुटलो ! खरंतर असंख्य प्राजक्ताच्या फुलांचा सडा आजुबाजुला पडला होतां , अक्षरशः पायदळी तुडवला जात होता. पण ते ओंजळीत आलेलं प्राजक्ताच फुल मात्र राहुनराहुन माझं मन सारखं विचलित करत होतं.
अन काय सांगु त्या क्षणैक वेळेत मला माझी ओंजळ सुगंधाने भरून गेल्यासारखी वारंवार वाटू लागायला लागली होती. ते प्राजक्ताचं फुल ,पडतांना त्याला कदाचित वाटले असेल, त्याचे जीवन सार्थकी लागले कारण जाता जाता..त्याने मला सुगंधाचे दान दिले ...पण खरं सांगु , माझ्या अल्पशा बुध्दिला असं त्याक्षणी वाटलं की ते प्राजक्ताचे फुल जाता जाता मला बरेच काही शिकवूनही गेलं. आणि मलाही दातृत्वाचे दान देऊन गेलं. पण मला आता या प्रसंगा नंतर वाटायला लागलं आहे की, त्या प्राजक्ताच्या फुलाने दिलेले दान आपल्याला रोजच्या जीवनात स्वीकारायचे आहे...अंमलात आणायचेही आहे..कोमेजून जाण्याआधी कोमेजलेल्या चेहऱ्यांना हास्य द्यायचं आहे..आणि जमलंच तर प्राजक्ताच्या सुगंधासारखे त्यांच्या मनात दरवळत राहायचे आहे...
सकाळी पारिजात, फुलांचा सडा टाकून मोकळा होतो त्याचा भार हलका करतो ! अर्थात....फुलंच ती....इवलुशी...नाजुक....त्यांचा भार तो कितीसा असणार ! आणि काहीही झालं तरी ‘सृजनाचा' कुठे कधी भार होत असतो का ? ‘हलका झाला'... पण म्हणून पोकळी नाही निर्माण झाली. ‘मोकळा' झाला पण रिता झाला असेल का खरंच ? मला नाही तसं वाटत ! ‘रितं' होण्यासाठी ‘रिकामं' असावं लागतं मुळात. प्राजक्ताकडे हे रिकामपण नक्कीच नाही. . तो केव्हाच पुन्हा सृजनाच्या त्या सुंदर प्रक्रियेत मशगुल होत असतो, नाही कां? उद्यासाठी तेवढ्याच कळ्यांना खुलवायचंय....फुलांना फुलवायचंय....प्रत्येकात सुगंधाची कुपी लपवायची आणि ...शिवाय देठादेठात केशरपण !
मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला...तो काही माणूस नाही नं. जणु ज्या क्षणी ती फुलं फांदीपासून सुटतात, तत्क्षणी तो त्या फुलांवरचे, सारे हक्कही सोडतो...आजची फुललेली सारी फुलं, वर्तमानाच्या त्या क्षणाला वाहून तो मोकळा होतो. गुंतून नाही पडत तो त्या फुलांमध्ये. म्हणून विरहाचं दुःख त्याला ठाऊक नाही. आणि म्हणूनच रितेपणाची भावना मुळ धरत नाही. तो अनुभवतो ..ती फक्त बहरण्यातली परिपूर्णता आणि ‘देण्या'तलं समाधान असतं !
आपल्यालाही, आयुष्य असंच जगता आलं तर? तो तो क्षण, वर्तमानाला अर्पण करून टाकायचा. आणि मोकळं व्हायचं त्या क्षणातून ! गुंतून नाही रहायचं त्यात. पुढचा नवा क्षण ..खुलवायला..फुलवायला... नव्याने सज्ज व्हायचं. फक्त आपलंच नाही तर जमलंच तर इतरांचही आयुष्य सुगंधी करायचा मनापासून प्रयत्न तरी करायचा.
जमेल का, असं ‘प्राजक्त' व्हायला ? आपल्याला !
हो, जरा अवघडं आहे, पण ‘रितं' होण्यातला आनंद ..
खरंच अलौकिकच असेल .. -अनिल देशपांडे