दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
आधारवड...!
रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाखेत किमान एक तरी वडाचं झाड पहायला मिळेल. आज या झाडाविषयी मनात जिव्हाळा आहे. रस्त्यात कुठेही हे झाड दिसलं की, असं वाटतं अण्णांच उभे आहेत. अण्णासुद्धा असेच होते ना, उंच-धिप्पाड, भारदस्त. झाडाच्या पारंब्या म्हणजे अण्णांची दाढी. असं हे झाड कुठेही दिसलं तरी नतमस्तक व्हावंसं वाटतं.
आज आईसोबत सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात जाण्याचा योग आला. कर्मवीर अण्णांनी उभं केलेलं हे शिक्षण संकुल पाहता-पाहता वडाच्या झाडाखाली आले. झाडाच्या घेरावरुन ते झाड खूप जुनं असल्याचा अंदाज येत होता.
वडाचं झाडं हे रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह आहे. किती विचारपूर्वक अण्णांनी या झाडाची निवड बोधचिन्ह म्हणून केली असेल याचा प्रत्यय संस्थेचा पसारा पाहून येतो.
गोर गरीब जनतेच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून अण्णांनी खेडयापाड्यात शाळा सुरू करून शिक्षणाची ज्ञानगंगा समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
वडाचं झाडसुद्धा असंच असतं ना! जे जंगलात, रानावनात उगवतं. एकदा या झाडांनं आपली मूळ जमिनीत घट्ट रोवली की, अनेकवर्षे हे झाड ऊन, वारा पाऊस यांचा मारा झेलत खंबीरपणे उभं असतं.
या झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी असतात. म्हणजेच काय तर हे झाड जो कुणी येईल त्याला आश्रय देतं. अण्णांनी उभी केलेली ही संस्थादेखील तशीच आहे. या संस्थेने लाखो कुटुंबाना आधार देऊन त्यांना उभं केलंय.
संस्थेच्या प्रत्येक शाखेत किमान एक तरी वडाचं झाड पहायला मिळेल. आज या झाडाविषयी मनात जिव्हाळा आहे. रस्त्यात कुठेही हे झाड दिसलं की, असं वाटतं अण्णांच उभे आहेत. अण्णासुद्धा असेच होते ना, उंच-धिप्पाड, भारदस्त. झाडाच्या पारंब्या म्हणजे अण्णांची दाढी. असं हे झाड कुठेही दिसलं तरी नतमस्तक व्हावंसं वाटतं. कारण ते नुसतं झाड नाही तर ती आहे एक वृत्ती परोपकाराची, तो आहे एक आधारस्तंभ, जितक्या पारंब्या तितके विद्यार्थी अगणित मोजता न येण्याजोगे.
संस्कृतीने आखून दिलेल्या चौकटीत स्त्रियांच्या दृष्टीने वडाला अनन्यसाधारण महत्व दिले आहे. कारण सावित्रीने याच झाडाखाली सत्यवानाचा जीव परत आणला होता अशी अख्यायिका आहे; पण अण्णांनी याच वडाखाली अनेक ज्योतिबा आणि सावित्री घडविल्या. म्हणूनच या झाडाविषयी मला आदर वाटतो.
आज हे झाड पाहताना असं वाटतंय प्रत्यक्ष अण्णांच उभे आहेत आणि सांगत आहेत, मी जो यज्ञ सुरू केलाय तो कधीही न संपणारा आहे. या यज्ञात मी पणाच्या समिधा टाकून परोपकाराचं, समाजसेवेचं तूप ओता. म्हणजे हा यज्ञ असाच पेटत राहील विश्वाच्या अंतापर्यंत. हा यज्ञ तेवत राहण्यासाठी तुम्हा सर्वांचे प्रयत्न हवेत. ते तुम्ही करतच आहात; पण तुमच्या पुढील पिढीनेसुद्धा हा वसा घ्यायला हवा. मी इथे आधारवड बनून उभा असणारच आहे, फक्त तुमच्या प्रयत्नांची जोड द्या.
मनातल्या मनात अण्णांना वचन दिलं, हो, अण्णा आमची पुढची पिढीसुद्धा तुमचा वारसा पुढे चालवणार झाडाला नम्र अभिवादन करून पुढे निघाले. -ऋतुजा म्हात्रे - महामुनी