दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
गाभाऱ्यातली संजीवन माऊली
‘आळंदी' नावं डोळ्यासमोर आलं की सहजपणे हात जोडले जातात! माउलींच्या संजीवन समाधीवर डोकं ठेवावंसं वाटतं! तेथील अजाण वृक्षाखाली बसून एकांती ज्ञानग्रहण करावस वाटतं! भार्वाथदिपीका, ज्ञानेश्वरी एकचित्ती वाचून काढावेसे वाटतात! आपभाव समाधीवर वाहून द्यावासा वाटतो! कमी वयातल्या जगाच्या माऊली अन प्राचीन काळापासून उभा असलेल्या सुवर्णपिंपळास मनोभावे फेऱ्या माराव्याशा वाटतात! तेथे उभ्या असलेल्या दिपमाळेकडे एकटक बघत राहावेसे वाटतं! विस्कटलेल्या मनास शांत करून घ्यावंसं वाटतं!
एकेक पायऱ्या खाली उतरून आलं की इंद्रायणीचं विशाल पात्र दिसतं! सह्याद्री कुशीतून वाहात येणारी इंद्रायणीनदी आळंदीला स्पर्श करून खाली वाहात राहते! वाहत्या पात्राकडे दूरवर दृष्टी जात असतें! इंद्रायणी आपल्या पोटात पवित्र जलस्त्रोत घेऊन वाहतांना दिसते! खळखळ नाही! अति ओढा नाही! अगदी शहाणपणे वाहणारी इंद्रायणी नदी माउलींच्या समाधीवर अभिषेक करून पुढे निघून जाते! भिमेला जाऊन मिळते! चंद्रभागेला जाऊन मिळते! पांडुरंगाकडे पंढरपूरी वाहात निघून जाते! आळंदीचा निरोप पंढरपूरला घेऊन जाते! माऊलींचा निरोप पांडुरंगास देत असतें! अनंत काळापासून अनाकलनीय अनुभूती सुरूच आहे!
समर्पणाने आत्मिक सुख मिळत असतं! माउलींच्या समाधीवर समर्पित होऊन, नतमस्तक होऊन हस्तस्पर्श करीत डोकंही ठेवत असतो! माझ्यातील ‘मी'पण गळू लागतं! गाभाऱ्यातील समाधीत एकरूप होवून जावसं वाटतं! समाधीत विलीन होऊन जावंसं वाटतं! आत्मिक मंनचक्षुने संजीवन देह पहावासा वाटतो! त्यांच्या समाधीवर डोकं ठेवून आपला देह अर्पण करावासा वाटतो! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या कनवाळूपणात, निरागस सुंदर रूपात एकरूप होऊन जावसं वाटतं! माऊलींच्या मुखावरील दिव्य तेज उघड्या डोळ्यांनी पाहत राहावंसं वाटतं! त्या विष्णू रूपास अर्पण करावस वाटतं!भागवत धर्माची भगवी पताका हाती घेतलेली माऊली वारीतील दिंडीत दिसते! पंढरपूराकडे,विठोबा माऊलीकडे प्रवास सुरू असतो! अंतःकरणी कीर्तन, भजनात रंगून जावसं वाटतं!
माऊलींचीं समाधी गाभाऱ्यातून दिसू लागते! पसायदान दिसू लागतं! जो जे वाहिल तो ते लाभो.. दिसू लागतं! निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई डोळ्यातं येऊन बसतात! भाव भावनेचा उमाळा अंतरी वर येऊ लागतो! डोळे, अश्रूतलाव होऊन जातात! चौघे दिव्य स्वरूपांचा जीवन संघर्ष डोळ्यात तरळू लागतो!बाल वयातील वेदनेची संघर्षयात्रा दिसू लागते! इंद्रायणी काठी आळंदी दिसू लागते! मला संजीवन समाधी दिसू लागते!
झालं असं की..... आम्ही काही दिवसांपूर्वी काशी, प्रयागराज, चित्रकूट अन अयोध्या यात्रा करून आलो होतो! भक्तीअमृत घेऊन आलो होतो! ईश्वर कृपेनें यात्रा सफल झाली होती! घरी ‘आईचा' पाया पडलो! चरणावर डोकं ठेवलं! आशीर्वाद घेत असतांना आई बोलली, ‘आळंदीला माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवावंसं वाटतं!' १०१ वर्षांची जन्मदाती आमची माय, आमची माऊलीं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर माथा टेकवणार होती! माझी माय जगाच्या संजीवन माऊलीं समोर डोकं ठेवणार होती!
आम्ही दिनांक ८ सप्टेंबर २०२४ च्या ऋषींपंचमी दिवशी आळंदीला गेलो होतो! सकाळी ०७ वाजता आळंदीला पोहचलो! आई सोबत होती! थोडं चालावं लागलं! इंद्रायणी नदी स्वच्छ पाणी घेऊन वाहात होती! पावसाळ्याचा समारोप होणार असावा म्हणून इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहात होती! दगडी पायऱ्या उतरून एका पायरीवर थांबलो! वाहणाऱ्या इंद्रायणी आईकडे पाहात बसलो! स्वतः च्या पोटात जगाचें उणेधुणे घेऊन वाहात असतें! इतरांना शुद्ध,स्वच्छ करीत असतें! स्वतःच्या पोटात जगाचं सुख दुःख घेऊन इंद्रायणीमाय वाहात असतें! आयुष्याचें ऋण आहेत इंद्रायणी मातेचे! इंद्रायणी मातेच्या वाहत्या पाण्यात आमच्या आईने हात पाय धुतले! इंद्रायणीचें काही पवित्र जल ओंजळीत घेऊन डोक्यावर शिंपडले!! सुप्रभाती उगवत्या सूर्यदेवास हात जोडून नमस्कार केला!
इंद्रायणी नदीतून एक एक पायऱ्या वर चढत माऊलींच्या समाधीकडे निघालो! मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावर मनोभावे डोकं ठेवलं! तेथून आत उजव्या बाजूला सुवर्णपिंपळ दिसला! एक प्रदक्षिणा घातली! चौथऱ्यास नमन केले! वर मान केली! सुवर्णपिंपळ उभाचं होता! प्राचीन भूतकाळ अंगावर घेऊन साक्षीदार उभा होता! आतल्या बाजूस अजाणवृक्ष दिसला! ज्ञानवृक्ष दिसला. हस्त स्पर्शून नमन केलं! हळूहळू गाभाऱ्यात माउलींच्या समाधीस्थळी पोहचलो! एका आईने दुसऱ्या आईच्या समाधीवर डोकं ठेवलं! आमच्या १०१ वर्षीय आईने संतश्रेष्ठ माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवलं होतं! आई अन संजीवन माऊलीं एकरूप होतांना पाहिले! डोळे भरून पाहात होतो! दोन माऊलींची भेट ही अरुपातून रूपात बदलत होती! दोन्ही माऊलीं तिसऱ्या माऊलीचें प्रवासी वाटले! आई अन ज्ञानोबा माऊलीं...विठूमाऊलीच्या यात्रेतील वारकरी वाटले! आई माऊलींच्या कुशीत होती! ज्ञानोबा माऊलीं विठूमाऊलीच्या खांद्यावर दिसली! हा अजब प्रवास डोळ्यांनी पाहात होतो! आई कनवाळू माझी, माऊलीं ममतामयी झाली! ममता विठू माऊलीच्या अंतःकरणात जाऊन बसली! इंद्रायणी चंद्रभागेत एकरूप होत होती! व्याकुळ करणारी भक्तीतहान संतुष्टी देऊन गेली होती! माऊलीमय झाली होती! हरीमय झाली होती! संजीवन समाधीतून ‘माऊली!माऊली' ध्वनी कानी पडत राहिला! इंद्रायणीकाठी माऊलींचा संजीवन निवास अंतरी बसवत राहिलो! - नानाभाऊ माळी