मुशाफिरी

आपल्या सणांची रचना, आखणी, निर्मिती ही निसर्गाधारित, पर्यावरणपूरक, स्वाभाविक, प्रकृतीला पूजणारी, पंचमहाभूतांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. निसर्गातून-प्रकृती-पुरुषाच्या मेळातून जन्माला यायचे, निसर्गाच्या साथीने वाढायचे, त्याच्याच जीवावर भरणपोषण करायचे, नावलौकिक मिळवायचा, पात्रता सिध्द करायची, निसर्गातून मिळवलेल्या संचितातून उतराई व्हायचा प्रयत्न करायचा व हा नश्वर देह थकल्यावर तो येथेच सोडून निघून जायचे अशी आपली भारतीयांची जीवनशैली आहे. प्रगतीशील व व्यापक विचाराचे असाल तर विविधधर्मियांच्या चांगल्या सणांचा आनंद घेताना आपली नजर विस्तारते. केवळ आपल्या जाती-धर्मापुरते संकुचित, मर्यादित, कुंपणापुरते उरत नाही. सगळ्यांच्या सणांची मजा घेता येते, त्यात सामील होता येते.

   आपण नुकताच गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या भारित वातावरणातून बाहेर येत आहोत. यानंतरचे मधले काही दिवस सोडल्यावर पुढील महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात घटस्थापना आणि मग त्या ‘नऊ रात्रींचा-स्त्रीशवतीच्या जागराचा' माहौल सर्वत्र असेल. आपल्याकडे एकदा का आषाढ -श्रावण मास सुरु झाला की सणांची, व्रतवैकल्यांची, सोहळ्यांची, मौजमजेची, एकमेकांकडे जाण्यायेण्याची, भेटीगाठींची, नवी वस्त्रे परिधान करण्याची रेलचेल आणि पर्वणी सुरु होते. हे सण पार होळीपर्यंत चालतात.

    गणेशोत्सवात आलेल्या रविवारी कल्याण, उल्हासनगर, पेण, उरण असा धावता दौरा करुन आम्ही विविध नातेवाईकांच्या घरच्या गणपतीला भेटी देत सहकुटुंब गणेशदर्शन घेतले होते. मागील आठवड्यातच माझ्या भावाच्या मुलीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला जायचा योग आला. खरे तर हा प्रसंग महिलांच्या पुढाकाराने साजरा होणारा. पण आता विभवत कुटुंब पध्दती, न्युविलयस फॅमिलीज, हम दो हमारे दो किंवा हमारा एकच, कामकाजी महिला, जो तो आर्थिकदृष्ट्या स्थापित होत गेल्यामुळे इतरांवर अवलंबून राहण्याची-नातेवाईकांच्या मदतीची आवश्यकता जवळपास संपुष्टात आलेली, तशात एकमेकांतील छुपे हेवेदावे, साडेबारा टक्के योजनेचा पैसा अथवा भूखंड,  बापाच्या संपत्तीत मुलींचा वाटा या व अशा कैक कारणांमुळे हल्ली कुणी कुणाकडे फारसे जात येत नाही. त्यामुळे अशा प्रसंगांनाही निवडक लोकांनाच बोलावले जाते. माझा परिवारही या निवडक लोकांत येत असल्याने मी तेथे हजर होतो. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी डोहाळजेवणाचे कार्यक्रम म्हणजे चंद्रकोर, धनुष्यबाण वगैरे गोष्टी मस्ट समजल्या जात. एक वेगळा फोटोग्राफर ते प्रसंग टिपण्यासाठी तैनात केला जाई. तेही शक्य नसेल तर गरोदर महिलेलाच थेट फोटोग्राफरच्या स्टुडिओत नेले जाई. तेथे चंद्रकोर, धनुष्यबाण वगैरे सारे मौजूद असे. मोबाईल आला, त्यात कॅमेऱ्याची सोय आली, स्टील आणि व्हिडिओज काढायची व ते त्या क्षणाला लागलीच जगभर कुठेही पाठवायची व्यवस्था आली आणि तिने पहिलाच बळी घेतला तो अशा स्टुडिओवाल्यांचा आणि व्हिजिट देऊन फोटो काढणाऱ्यांचा!...तर त्या प्रसंगाला मीही एक फोटोग्राफर-कम-पत्रकार-कम-अँकर-कम-मुलाखतकार-कम-मुलीचा काका म्हणून उपस्थित होतो. त्यावेळच्या जेवणावर ताव मारण्याची मौज काही वेगळीच! नाव त्या गरोदर पुतणीचे आणि उदरंभरणं मात्र माझ्यासारख्या खादाडपंथी लोकांचे...पण मजा आली. माझ्या या डॉक्टर पुतणीचा डॉक्टर नवरा त्यावेळी महाराष्ट्राबाहेरील राज्यात कर्तव्य बजावीत होता. त्यालाही त्या क्षणाला व्हिडिओ कॉलवर त्या साऱ्या प्रसंगाचे आभासी साक्षी होता आले.

त्याच संध्याकाळी माझ्या मेव्हण्याच्या घरी ओणम सणानिमित्त भोजन घेता आले. आता कुणी म्हणेल तुमच्या मेव्हण्याकडे ‘ओणम'चे जेवण कसे काय? तर त्याचे उत्तर असे की त्या मेव्हण्याची पत्नी केरळी (नायर परिवारातील) आहे. केळीच्या पानावर भात, सांबार, कोणत्याही प्रकारे गोडेतेल न वापरता केवळ नारळाच्या तेलात केलेल्या विविध भाज्या, लोणचे, केरळी पापडम, फणसाचे व केळीचे वेफर्स, कोशिंबिर असे बरेच काही असलेला जंगी बेत होता. हे सारे निसर्गाच्या अधिक जवळ नेणारे, तुमची प्रकृती निकोप ठेवणारे, तुमच्या आरोग्याला बळ पुरवणारे आहे यावर दुमत नसावे. फुलांच्या रांगोळीने भरलेल्या वर्तुळात एक तेवणारी समई, मोती रंगाच्या साड्या परिधान केलेल्या त्या केरळी गृहीणी आणि त्यांचे अगत्याने ते जेवण वाढणे, हवे नको ते पाहणे हे सारेच एका वेगळ्याच प्रसन्न विश्वात नेणारे! त्यांच्याकडचे पुरुष म्हणे भातावर सांबार ओततात आणि केळीच्या पानावर ते इकडे तिकडे दौडू लागण्याच्या आधीच व्यवस्थित घास उचलून तोंडात टाकतात. आमच्यासारख्यांना मात्र ते शक्य नसते. आपण जेवताना तळहातावरच्या रेषा न माखवता केवळ बोटांनीच घास उचलणारे लोक. सांबाराने लपथपलेल्या भाताचा घास केळीच्या पानावरुन उचलून आम्ही भुरकायला गेलो तर तळहातही माखायचा आणि तो हात तोंडाशी नेईपर्यंत त्यातले सांबार मनगट, कोपर, काखा असा प्रवास करुन छातीवरुन पोटापर्यंत आणि त्यानंतर त्याखालच्या प्रदेशाची कधी वाट धरील याचा नेम नसतो. माझ्या एका आतेभावाची सूनही केरळी आहे. हे एवढ्यावरच संपत नाही. माझ्या नात्यातील अनेकांनी आंतरजातीय विवाह केल्याने महाराष्ट्रातील व भारतातील ठिकठिकाणचे लोक माझे आपसूकच नातेवाईक बनले आहेत. त्यामुळे त्या साऱ्यांच्या सण-सोहळ्यांचा आनंद घेण्यातील मौज काही न्यारीच!

   ...ज्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचे जवळपास नवकी झाले आहे ते लोकनेते, माजी खासदार व महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते सन्मा. दि.बा. पाटीलसाहेब हे माझ्या आतेभावाचे सासरे. पण त्यांच्या दोन सुनांपैकी एक ब्राह्मण; तर दुसरी कोकणी. माझ्या धाकट्या बहिणीची जाऊबाई ब्राह्मण. माझ्या एका आतेभावाची पत्नी आंबेडकरी समाजातील. माझ्या चुलत भावाचा प्रेमविवाह मराठा समाजातील मुलीशी झालेला. माझ्या एका मामेबहीणीच्या मुलीचा विवाह कोळी समाजातील मुलाशी झाला आहे. माझ्या मोठ्या बहीणीच्या मुलीचा विवाह गुजराती मुलाशी झाल्याने ती २००२ पासून गुजरातमधील गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जुनागढ शहरात असते. माझ्या मोठ्या मामेभावाची सुन उत्तरप्रदेशी हिंदीभाषक आहे. माझ्या मावशीकडील नात्यामध्ये तर एक सुन चक्क मुस्लिम समुदायातील असून ती आमच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे संकष्टी, चतुर्थी, पौर्णिमा व इतर सणवारांचे रिवाज मनापासून पाळते म्हणे! आता बोला! यामुळे होते काय, की आपलीच नजर विस्तारते. आपण केवळ आपल्या जाती-धर्मापुरते संकुचित, मर्यादित, कुंपणापुरते उरत नाही. सगळ्यांच्या सणांची मजा घेता येते, त्यात सामील होता येते.

   प्रसारमाध्यमे असे सांगतात की आपल्या भारतात, त्यातही विशेषकरुन हिंदू धर्मात सण, उत्सव, सोहळे, समारंभ यांची वर्षभर चांगली रेलचेल असते. कोणताही महिना असा नाही की ज्यात एखादा सण आला नाही. पण इंग्लंड, अमेरिका वा अन्य तत्सम  पुढारलेल्या म्हणवून घेणाऱ्यांच्या देशात असेच असते असे नाही. प्रभू येशूचा जन्मदिन-नाताळ, मग थर्टी फर्स्ट, न्यु इयर, व्हॅलेन्टाईन डे, गुड फ्रायडे, होली क्रॉस डे, तसेच काही ख्रिस्ती संतांचे जन्मदिवस. बास! तिकडच्या लोकांना भारतीय लोकांच्या सणांचे, त्यानिमित्त निघणाऱ्या मिरवणूकांचे कोण आकर्षण असते. म्हणून अनेक विदेशी नागरिक पुण्यात गणेश फेस्टीव्हलला गर्दी करतात. इस्कॉनचा प्रसार परदेशातही मोठ्या प्रमाणावर झाला. ‘हरे रामा हरे कृष्णा' करीत अनेक ‘डिव्होटीज' विदेशात राम-कृष्णाला भजू आणि पूजू लागले आहेत. याचे कारण असे की सण हे मुळातच निसर्गाशी जवळीक साधणारे असतात. त्यामुळे अनेकजण एकत्र येतात. ‘एकमेकांपासून तुटणे' हेच ज्या काळाचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते अशा काळात लोकांचे असे जवळ येणे उर्जादायी ठरते. रोजमर्राच्या जिंदगीत सण एक चांगला विरंगुळा देतात. एकमेकांना पाण्यात पाहणे, दुसऱ्या धर्मियांचा तिरस्कार करणे, नातेवाईकांनाही चांगल्या प्रसंगांपासून दूर ठेवणे, असा खत्रुड माहौल जिकडे तिकडे मुळ धरत असताना रक्षा बंधन, भाऊ बीज, मातृदिन, पितृ पंधरवडा, जन्माष्टमी, रामनवमी, गणपती (माघी आणि भाद्रपदी) नवरात्री, दिवाळी, होलिकोत्सव, कोजागिरी, मकरसंक्रांत, गुढीपाडवा, हनुमानजयंती, अक्षय्यतृतीया, वटपौर्णिमा याशिवाय विविध गावच्या जत्रा, यात्रा...त्यासोबतच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय महत्वाचे सण केवळ परिवारातील व्यवतींनी घरातल्या घरातच नव्हे, तर समष्टीने एकत्र येऊन साजरे केले जातात. आणि असे एकत्र येताना अन्यधर्मीयांना शिवीगाळ किंवा केवळ आपलाच धर्म टिकावा आणि बाकीचे लोक मारुन टाकावेत अशा प्रकारची कोणतीच चिथावणीखोर शिकवण या सणांच्या साजरीकरणाच्या वेळी आपल्या धर्मस्थळांतून दिली जात नाही हे विशेष! म्हणूनच हे असे एकत्र येणे कोणत्याही देशाच्या एकसंघतेसाठी, समृध्दीसाठी, सामाजिक सलोख्यासाठी, परस्पर साहचर्यासाठी अत्यंत मोलाचे ठरते, यावर कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. बाकी धर्माच्या नावावर अघोरी कर्मे, राजकारण, भडकावू वक्तव्ये करणाऱ्यांना, अन्यधर्मियांना तुच्छ लेखणाऱ्यांना, आपल्याच धर्माचा टेंभा मिरवणाऱ्यांना कोण काय करणार? पण त्यांचीच दुष्कर्मे त्यांना योग्य वेळी संपवतील यावर आपण विश्वास ठेवू या. - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आंतरराष्ट्रीय शांतता दिवस : जागतिक सौहार्द जपण्याची गरज