डाग तोंडाला, दोष आरशाला

राजकारण्यांनी आपल्या कृतीबद्दल पश्चाताप व्यवत करुन ती सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. आपली जबाबदारी ओळखून विनम्रता अंगीकारावी अशी अपेक्षा आहे. चूक करणे गुन्हा नाही, पण चूक मान्य न करणे गुन्हा आहे आणि हाच गुन्हा पुन्हा पुन्हा नेते करताना दिसतात. स्वतःची चूक दुसऱ्याच्या माथी मारण्याचे काम सध्या नेत्यांकडून होताना दिसत आहे.

सध्या गणेशोत्सवासह विविध सणावारांचे दिवस आहेत. त्याचबरोबर पावसाचेही दिवस आहेत. यंदाचा पावसाळा तसा काही भागात चांगला आहे, तर त्याने काही भागात हाहाकार माजवला आहे. काही भागातील जनता खुश आहे, तर काही भागातील जनता त्रस्त आहे. तोच सिलसिला पकडून राजकारणही तापत आहे.

देशातील काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत, तर काही राज्याच्या निवडणुकांचे वेळापत्रक ठरण्याच्या मार्गावर आहे. हाच धागा पकडून विविध पक्षाचे नेते, आपापल्या कामाला लागले आहेत. तर काही राजकारणी दौऱ्यावर दौरे करत आहेत.

गत महिन्याच्या २१ तारखेपासून आपले पंतप्रधान पोलंड, युक्रेन, बु्रनेई आणि सिंगापूर दौऱ्यावर होते. तर विदेश मंत्री जयशंकर मालदीव कुवैतला गेले होते. तर पुढील महिन्यात जयशंकर व मोदी यांचा अमेरिका दौरा करण्याच्या तयारीत आहेत. नेमकी हीच संधी साधून देशातील विरोधी पक्ष नेते व कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेला जाण्यात अग्रक्रम मिळवला. त्यांचा हा तीन दिवसाचा अमेरिका दौरा सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. सत्ताधाऱ्यांकडून राहूल गांधीवर विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या विदेशी दौऱ्यातील भाषणाच्या विलप्स बाहेर काढल्या जात आहेत. त्यामुळे देशातील जनता भांबावून गेली आहे. तीला कोण खरे अन्‌ कोण खोटे बोलतोय हे कळेनासे झाले आहे. तरीही देशातील बहुतांश जनता आता शहाणी झाली आहे. नेत्यांचे खरे खोटे जाणू लागली आहे.

या सणासदुीच्या दिवसात नेहमीप्रमाणेच, गरजेच्या वस्तूंचे व खाण्याच्या वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. सामान्य माणूस चक्रवून गेला आहे, तर व्यापारी व बाजारातील दलाल मंडळी काही प्रमाणात मालामाल होत आहे. मात्र शेतकऱ्यांना त्या प्रमाणात लाभ होताना दिसत नाही.

शेतकऱ्यांच्या मालाला काही प्रमाणात चढा भाव मिळत असला तरी, शेतकऱ्याला इतर गरजेच्या वस्तूही चढ्या दरानेच खरेदी कराव्या लागत आहेत. एकीकडे गोर-गरीबासह मध्यमवर्गातील लोकही महागाईने त्रस्त आहेत. त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि काळजात दुखणे आहे. तर राजकारणी आपल्या विजयासाठी विविध योजना व नाऱ्यांच्या घोषणा करत आहेत. जिंकण्याच्या नादात काही गमावून बसले आहेत. तरीही आशेच्या किरणाची वाट पहात आहेत. ही स्थिती तरुणांची झाली आहे. अनेक तरुण-तरुणी नोकरीच्या आशेवर आहेत. तर, राजकारणी व त्यांचे कार्यकर्ते, निवडणूकीत पक्षाचे तिकिट मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. सर्वांची स्थिती एक सारखीच आहे.

सध्या विविध पक्षाच्या पार्टी कार्यालयात व नेत्यांच्या घरांसमोर गर्दी वाढताना दिसत आहे. ज्यांच्याकडे पैसा आणि ताकद आहे, त्यांची सध्या चलती आहे, तर जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे, त्याच्या पदरी निराशाच पडत आहे.  बेरोजगार तरुणांची व प्रामाणिक कार्यकर्त्यांची एकच गत आहे. नोकरीसाठी, लाचेसाठी पैसा हवा आहे तर तिकिटासाठी मोठ्या नेत्यांची शिफारस हवी आहे. नुसती शिफारस कामाला येत नाही तर शिफारशीच्या जोडीला धनाचीही गरज आहे. लोकांकडे धनाची कमतरता असल्याचे पाहून लबाड व धुर्त नेत्यांनी लोकांना निरनिराळ्या योजना मार्फत धन पुरवण्याच्या पुड्या सोडल्या आहेत आणि लोक या पुड्याच्या मागे सैरावैरा पळत सुटले आहेत. लोकांच्या गरजाच एवढ्या वाढल्या आहेत की त्या पूऱ्या करण्यासाठी, आपली विचारशवती गमावून बसले आहेत. खासकरुन महिला वर्ग, लबाड राजकारण्याच्या गळाला लागला आहे.

सध्या अनेक राज्यात ‘लाडकी बहिण योजना' राबवली जात आहे. या माध्यमातून महिलांना १५०० रुपयात विकत घेतले जात आहे किंवा त्यांच्यावर विविध अटी-शर्तीचा भार टाकला जात आहे. ‘आमचे सरकार आणा, तरच तुमची योजना चालू, अन्यथा भाऊ विसरा, ओवाळणी विसरा.' खरं तर देशातील सर्वच राज्य सरकारे, कर्जाच्या ओझ्याने दबलेले आहेत. त्याची आमदानी णी और खर्चा रुपय्या हैं। फिर भी सरकार साहूकार हैं। नेत्यांना पदाचा आणि सत्तेचा अहंकार चढला आहे. या अहंकारांच्या धुंदीत आपल्या विरोधकांवर असंविधानिक भाषेत बोलत आहेत, व वागतही आहेत. नितिमत्ता केव्हाच रसातळाला पोहोचली आहे. अनेक नेते, आज इथे तर उद्या तिथे करत आहेत. सत्तेत राहून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा कमावणे एवढेच कार्य नेत्यांकडून होतांना दिसत आहे.

प्रत्येक धर्मात दुसऱ्यांशी चांगले वागण्याची शिकवण दिली जाते. क्षमा करण्याचेही धडे दिले जातात. पण सध्या राजकारण सुडाने भरलेले आहे. सत्तेवर विराजमान होताना,  शपथ घेऊन वचन दिले जाते की, ‘मी देशाच्या संविधानातील प्रत्येक गोष्टीचे सचोटीने व इमानदारीने पालन करीन. कोणाशीही दृष्ट भावना ठेवणार नाही व सुड भावनेने वागणार नाही, पण प्रत्यक्षात सुडाचेच राजकारण खेळले जात आहे. प्रत्येक सत्ताधारी स्वतःला सदाचारी समजत आहे. प्रत्यक्षात तो सतत व्यभिचारात वावरताना दिसतो. बऱ्याच वेळा राजकारण्याकडून गुन्हेगार व व्यभिचारी लोकांना, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देण्याचे काम सध्यातरी जोरावर आहे. गुन्हेगार सहीसलामत मोकाट फिरत आहेत, तर बदल्यात दुसऱ्यांनाच संशयाच्या भोवऱ्यात उभे केले जात आहे.

सामान्य राजकारणी किंवा त्यांचे चेले-चपाटे सत्तेच्या मस्तीत आहेत. देशाच्या राष्ट्रपती या महिला व त्यातून आदिवासीतून आलेल्या असूनही त्या मूग गिळून गप्प का आहेत किंवा महिला-बालकांवरील अत्याचाराविषयी बोलत का नाहीत? किंवा त्या राजकारण्यांच्या दबावाखाली तर नाहीत ना असा अनेकांना संशय येऊ लागला आहे. पूर्वीची सरकारे राष्ट्रपतीची बूज राखून असायचे, आताची नेते मंडळी किंवा आत्ताचे सरकार राष्ट्रपतीलाही भीक घालत नसल्याची लोकांत भावना आहे. सध्या लोकांत विशेषतः राजकारणातील क्षमा पर्वात राजकीय ‘डावपेच' पर्व सुरु झाले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह देशाच्या पंतप्रधानांनी, मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिवरायांची व जनतेची माफी मागितली, पण, माफी सोडाच राजकीय वादळ सुरु झाले आहे. दोषींना शिक्षा मिळायलाच हवी. तसेच देशात महिला बालक-बालिकांवरील अत्याचारात वाढ झालेली दिसून येत आहे. पण त्यासाठी प्रशासन व राजकारण्यांकडून दोषींना पाठीशी घालण्याचे प्रयत्न असल्याची भावना लोकांत पसरु लागली आहे. याला न्यायपालिकाही मोठ्या प्रमाणात कसूरवार आहे, असेच म्हणावे लागेल. त्याच्याच जोडीला मानवाधिकारवालेही दोषी आहेत. ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांच्या मानवधिकारांबाबत काही बोलले जात नाही, मात्र दोषींना शिक्षेपासून वाचवण्याचे प्रमाणही वाढले आहे.

आज आपल्या संपूर्ण राजकारणाची ओळख ठरली आहे की, नेते स्वतःला जनतेचा सेवक असल्याचे सांगतात; पण त्यांचे पूर्ण वागणे मालकाप्रमाणे असते. ते स्वतःला राजा, किंवा तानाशाह समजून वागतात. ते बदलण्याची खरी गरज आहे.

राजकारण्यांनी आपल्या कृतीबद्दल पश्चाताप व्यवत करुन ती सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा आपली जबाबदारी ओळखून विनम्रता अंगीकारावी अशी अपेक्षा आहे. चूक करणे गुन्हा नाही, पण चूक मान्य न करणे गुन्हा आहे आणि हाच गुन्हा पुन्हा पुन्हा नेते करताना दिसतात. स्वतःची चूक दुसऱ्याच्या माथी मारण्याचे काम सध्या नेत्यांकडून होताना दिसत आहे. त्यांना दुसऱ्याचा डोळ्यातील कुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही यालाच म्हणतात डाग तोंडाला दोष आरशाला. -भिमराव गांधले 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

हिंदी भाषेचा प्रसार करून तिला आंतरराष्ट्रीय वैभव प्राप्त करून द्यावे (हिंदी दिवस .. १४ सप्टेंबर)